Raj Thackeray-Dilip Dhotre Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

MNS First Candidate : राज ठाकरेंनी भाजपविरोधात शड्डू ठोकला; पंढरपूर-मंगळवेढ्यातून एकनिष्ठ नेत्याची उमेदवारी जाहीर

Vijaykumar Dudhale

Solapur, 05 August : सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या दोन निष्ठावंत शिलेदारांची उमेदवारी जाहीर केली आहे. यामध्ये मुंबईच्या शिवडी मतदारसंघातून बाळा नांदगावकर, तर पंढरपूर-मंगळेवढा मतदारसंघातून दिलीप धोत्रे यांच्या नावाची घोषणा राज ठाकरे यांनी केली आहे.

भाजप आमदाराच्या मतदारसंघात धोत्रे यांच्या रुपाने पहिला उमेदवार जाहीर करून ठाकरेंनी भाजपच्या विरोधात शड्डू ठोकल्याचे मानले जात आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) हे दोन दिवसांच्या सोलापूर दौऱ्यावर आहेत. सोलापुरातील मान्यवरांशी रविवारी सायंकाळी चर्चा केल्यानंतर आज सकाळपासून ते जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहेत. या ते पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करत आहेत.

या आढावा बैठकीनंतर सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील किती मतदारसंघात मनसे निवडणूक लढवणार, हे जाहीर निश्चित होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी मतदारसंघाचा आढावा घेत असतानाच राज यांनी दोन मतदारसंघातील उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे.

दिलीप धोत्रे (Dilip Dhotre) यांच्याकडे नुकतेच विधानसभा निवडणुकीसाठी नागपूरचे निरीक्षक म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. नागपूरमध्ये त्यांनी पक्षाच्या आढावा बैठका घेतल्या आहेत. तसेच, पक्षसंघटना वाढीसाठी भाजपचा बालेकिल्ला असलेल्या नागपूरमध्ये कार्यकर्त्यांना कामाला लावले आहे.

दिलीप धोत्रे हे राज ठाकरे यांचे निष्ठावंत म्हणून ओळखले जातात. राज ठाकरे हे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर दिलीप धोत्रे यांनीही त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. राज ठाकरे यांनी त्यावेळी दिलीप धोत्रे यांच्यावर मनसे विद्यार्थी सेनेची जबाबदारी सोपवली होती. याशिवाय दिलीप धोत्रे यांच्याकडे मनसे सहकार आघाडीच्या प्रमुखपदही देण्यात आलेले आहे.

निष्ठावंतांना मानाचे पान

राज ठाकरे यांनी विधानसभेसाठी आपल्या जुन्या आणि निष्ठावंत कार्यकर्त्याची उमेदवारी जाहीर केले आहे. बाळा नांदगावकर आणि दिलीप धोत्रे हे दोघेही राज ठाकरे यांचे एकनिष्ठ सैनिक समजले जातात. या दोघांची उमेदवारी घोषित करून राज ठाकरे यांनी आपल्या एकनिष्ठ सैनिकाला न्याय दिल्याची भावना मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे.

पंढरपूरची लढत बहुरंगी होणार

पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात सध्या भाजपचे समाधान आवताडे आमदार आहेत. भाजपच्या विरोधात उमेदवार देऊन राज ठाकरे यांनी शड्डू ठोकल्याचे मानले जात आहे. या मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून भगीरथ भालके यांनी विधानसभेची पोटनिवडणूक लढवली होती. आता पुन्हा ते विधानसभेसाठी इच्छूक आहेत.

दुसरीकडे विद्यमान आमदार असल्याने समाधान आवताडे यांचा भाजपच्या तिकिटावर पहिला अधिकार असणार आहे. पण, भाजपकडून माजी आमदार प्रशांत परिचारक हेही इच्छूक आहेत. याशिवाय विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनीही विधानसभा निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे पंढरपूरची लढत बहुरंगी असण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT