South Solapur Constituency  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Assembly Election 2024 : माने, मिस्त्रीनंतर हसापुरे, कोंगनुरेंचाही काँग्रेस उमेदवारीवर दावा; उमेदवारीचा फैसला शिंदेंच्या हाती!

South Solapur Constituency : काँग्रेसचे सोलापूर शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्याकडे महादेव कोंगनुरे यांनी उमेदवारी मागणीचा अर्ज दाखल केला आहे. विशेष म्हणजे कोंगनुरे यांनी शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी मागणीचा अर्ज दाखल केला आहे.

Vijaykumar Dudhale

Solapur, 01 August : लोकसभा निवडणुकीतील यशानंतर आत्मविश्वास वाढलेल्या काँग्रेस पक्षाकडे विधानसभेसाठी इच्छुकांच्या रांगा लागल्या आहेत. दक्षिण सोलापूर मतदारसंघातून लोकसभेला काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना मताधिक्य मिळाल्यानंतर या मतदारसंघातूनही अनेकांनी विधानसभेसाठी शड्डू ठोकला आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदे कोणाला उमेदवारी देतात, याकडे सोलापूरचे लक्ष असणार आहे.

माजी आमदार दिलीप माने, माजी नगरसेवक बाबा मिस्त्री, काँग्रेसचे (Congress) सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे यांच्यानंतर या मतदारसंघातून इच्छुक असणारे उद्योजक महादेव कोंगनुरे यांनीही आज अधिकृतरित्या शक्तिप्रदर्शन करत दक्षिण सोलापूरमधून (South Solapur) काँग्रेसकडे उमेदवारी मागणीचा अर्ज दाखल केला आहे.

काँग्रेसचे सोलापूर शहराध्यक्ष चेतन नरोटे (Chetan Narote) यांच्याकडे महादेव कोंगनुरे यांनी उमेदवारी मागणीचा अर्ज दाखल केला आहे. विशेष म्हणजे कोंगनुरे यांनी शक्ती प्रदर्शन करत काँग्रेसकडे उमेदवारी मागणीचा अर्ज दाखल केला आहे. या वेळी मतदारसंघातील ज्येष्ठ समाजसेवक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने काँग्रेस भवनामध्ये उपस्थित होते.

लोकसभा निवडणुकीत दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून प्रणिती शिंदे यांना सुमारे दहा हजारांचे मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे काँग्रेसच्या इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. या मतदारसंघात सध्या भाजपचे सुभाष देशमुख आमदार आहेत. विद्यमान आमदार भाजपचे असूनही लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून काँग्रेसला मताधिक्य मिळाले होते.

काँग्रेस पक्षाकडून आतापर्यंत दक्षिण सोलापूर मतदारसंघातून माजी आमदार दिलीप माने, माजी नगरसेवक आणि मागील विधानसभा निवडणूक लढविलेले बाबा मिस्त्री, काँग्रेसचे सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे आणि उद्योजक महादेव कोंगनुरे यांनी काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागणीचा अर्ज दाखल केला आहे.

दिलीप माने यांनी २००९ ते २०१४ या पाच वर्षांत दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस पक्षाकडून प्रतिनिधीत्व केले आहे. मोदी लाटेत २०१४ मध्ये दिलीप माने यांचा दक्षिण सोलापूरमधून पराभव झाला. त्यानंतर २०१९ च्या निवडणुकीत माने यांनी सोलापूर शहर मध्य मतदरसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती.

दिलीप माने यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर दक्षिण सोलापूर मतदारसंघातून २०१९ मध्ये माजी नगरसेवक बाबा मिस्त्री यांनी विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीत कोणताही मोठा सोबत नसताना मिस्त्री यांनी विधानसभेला तब्बल ५८ हजार मते घेतली हेाती, त्यामुळे आता मिस्त्री यांनीही विधानसभेला काँग्रेसच्या तिकिटावर दावा ठोकला आहे.

दक्षिण सोलापूर मतदारसंघातून दिलीप माने, बाबा मिस्त्री यांच्यानंतर दक्षिण सोलापूरचे सुपुत्र तथा काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे यांनीही विधानसभेच्या तिकिटावर दावा केला आहे. हसापुरे यांनी जिल्हा बॅंक आणि जिल्हा परिषदेत काम केले आहे. महादेव कोंगनुरे यांनी लोकसभा निवडणुकीत प्रणिती शिंदे यांच्यासाठी ताकद पणाला लावली होती. तसेच, अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत, त्यामुळे माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदे कोणाच्या पारड्यात दक्षिण सोलापूरची उमेदवारीचे माप टाकतात, हे पाहावे लागेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT