Solapur, 11 November : काँग्रेसच्या उमेदवारीसाठी करावे लागलेले कष्ट...उमेदवारी जाहीर होऊनही पक्षाचा एबी फार्म न मिळाल्याने पदरी पडलेली निराशा आणि शेवटी अपक्ष उमेदवारी अर्जही वरिष्ठांच्या सूचनेनुसार माघारी घ्यावा लागला. अर्ज मागे घेतल्यापासून अलिप्त वागणारे काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांनी अखेर कार्यकर्त्यांशी संवाद साधला आहे. त्यात त्यांनी विधानसभा उमेदवारी न मिळण्याला वरिष्ठांना जबाबदार धरले आहे. ‘वरीष्ठ पातळीवरील समन्वयाच्या अभावामुळे आपल्या वाट्याला अकारण उपेक्षा आली आहे,’ अशी शब्दांत माने यांनी नाराजी व्यक्त केली.
सोलापूर दक्षिण मतदारसंघातून माजी आमदार दिलीप माने (Dilip Mane) महाविकास आघाडीकडून इच्छुक आहेत. मात्र, आघाडीच्या जागा वाटपात हा मतदारसंघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे गेला, त्यामुळे माने यांच्या पदरी निराशा पडली आहे. महाविकास आघाडीच्या धर्मानुसार माने यांना अपक्ष भरलेला उमेदवारी अर्जही मागे घ्यावा लागला. त्यानंतर राजकीय घडामोडींपासून लांब असलेले माने यांनी पत्राच्या माध्यमातून कार्यकर्त्यांशी संवाद साधला आहे.
पत्रात दिलीप माने यांनी म्हटले आहे की, (कै.) ब्रम्हदेवदादांच्यानंतर त्यांच्या इतकेच नव्हे तर काकणभर जास्तच प्रेम, आदर, सहकार्य आपल्याकडून आजतागायत कायम मिळत आहे. त्याच ताकदीवर मी सामाजिक व राजकीय जीवनात झेप घेऊ शकलो. या वाटचालीत आपली साथ पदोपदी सोबत राहिली आहे. ही सोबत करताना आपण स्वतःच्या प्रपंचाकडे प्रसंगी कमी लक्ष दिले असेल पण माझ्याशी असणारी बांधीलकी कमी होऊ दिली नाही.
आपल्या जीवनातील अनेक अडचणी माझ्या निवडणुकीसाठी (Election) गेली दहा वर्षे तुम्ही बाजूला ठेवल्या. पदरमोड करून माझे कार्यकर्ते म्हणून समाजासमोर ठामपणे उभे राहीले आहात. छातीचा कोट करून विरोध अंगावर घेतला आहेत. माझी प्रतिमा उंचावण्यासाठी जीवाची बाजी लावली आहे. एक एक मत माझ्या बाजूला वळविण्यासाठी तुम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे. शब्दांनी व्यक्त करण्यापलीकडे असे तुमचे ऋण आहे. जोपर्यंत तुमची शक्ती माझ्यासोबत आहे, तोपर्यंत मी कोणत्याही परिस्थितीत डगमगणार नाही, हे सर्वकालीन सत्य आहे.
घोड्यावर बसण्यासाठी धडपडणाऱ्या स्वाराची एखाद्या क्षणी पकड निसटणेसुद्धा शक्य असते; जो सतत रांगत सरपटत चालतो तो कशाला निसटेल? एखादी गोष्ट शंभराव्या घावाने तुटते, याचा अर्थ नव्याण्णव घाव वाया गेले असा होत नाही. तुमचे माझ्यासोबतचे समाजातील गोरगरीब जनतेसाठी केलेले कष्ट देखील वाया जाणार नाहीत. आपली तपश्चर्या एके दिवशी फळाला आल्याशिवाय राहणार नाही.
आपल्या हक्काच्या विधानसभा उमेदवारीबाबत झालेल्या अन्यायाची वेदना तीव्र आहे; हे मान्य करावेच लागेल. तुमच्यापैकी हजारोंना त्यादिवशी अश्रू अनावर झाले, हे मी विसरू शकत नाही. तुमचा मुक आक्रोश तुमच्या डोळ्यातून, चेहऱ्यावर व्यक्त होत होता. वैयक्तीक स्वतःचा घात झाला असे समजून तुम्ही कासावीस झाला होता. तरीही माझ्या विनंतीला मान देऊन तुम्ही संयम सोडला नाही.
गेल्या दहा वर्षापासून तुम्ही माझ्या आमदारकीसाठी मनापासून वाट पाहिली होती. तिकीटाचा निरोप येताच तुम्हाला स्वतःला तिकीट मिळाले असे समजून आनंद तुम्ही साजरा केला. साहजिकच आहे कारण त्या संधीसाठी तुम्ही अनेकदा तडजोड केली होती. अनेकदा मान्य नसलेल्या गोष्टी मान्य केल्या होत्या.
हे सगळे एखाद्या 'सतीचे वाण' समजून तुम्ही माझ्या आमदारकीसाठी जीव पाखडला आहे. तथापि वरीष्ठ पातळीवरील समन्वयाच्या अभावामुळे आपल्या वाट्याला अकारण उपेक्षा आली आहे. आपली काहीच चूक नसताना व कर्तृत्व सिध्द अधिकार असतानाही आपल्याला संधी मिळाली नाही; हे अतिशय दुर्दैवी आहे! यासाठी जबाबदार असणाऱ्या सर्वच संबंधितांना एके दिवशी रास्त जनभावना आपल्या बाजूने होती ही जाणीव होईल होईल, हे निश्चित आहे. परंतु वेळ निघून गेलेली असेल.
परमेश्वरच आपल्या सर्वांच्या बाजूने न्याय करेल, अशी खात्री बाळगावी. कोणाला प्रायश्चित्त मिळाल्याने आपली हानी भरून येणार नाही, हेही शाश्वत सत्य आहे. परंतु राजकारणात कोणतीही स्थिती अंतिम स्थिती नसते. बदल घडत असतो. परिस्थितीचे संदर्भ बदलत असतात. आपण त्यासाठी आशावादी असले पाहिजे.
आपले नाते आभाराचे प्रदर्शन करण्याइतके कृत्रिम नाही आपण एका मोठ्या कुटुंबाचे सदस्य आहोत. तुमच्या योगदानाची दखल अंतःकरणात आहे. सातत्यपूर्ण संपर्क, उपक्रमशील संघटन, दुर्दम्य इच्छाशक्ती या त्रिसूत्रीवर भविष्यात आणखी खंबीरपणेवाटचाल सुरू ठेवण्याचा निर्धार यानिमिताने करुया..!
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.