Solapur, 11 May : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी अपेक्षेप्रमाणे माजी आमदार दिलीप माने यांची, तर उपसभापतिपदी भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे समर्थक सुनील कळके यांची बिनविरोध निवड झाली आहे. ही निवड दोन वर्षांसाठी असणार आहे, त्यानंतर नव्या संचालकांना संधी मिळणार आहे.
सोलापूर बाजार समितीतील (Solapur Bazar Samiti) विजयानंतर आमदार कल्याणशेट्टी, माजी आमदार माने, सुरेश हसापुरे, राजशेखर शिवदारे यांनी दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत जाऊन भेट घेतली. त्यावेळीही सभापती आणि उपसभापती कोण होणार, याची चर्चा झाली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच सभापती ठरविणार, असे सांगण्यात आले होते. त्यानुसार आज सकाळी माने आणि सुनील कळके यांची नावे जाहीर करण्यात आली.
जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली आज सकाळी अकरा वाजता बाजार समितीच्या नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या बैठकीला सुरुवात झाली. सचिन कल्याणशेट्टी (Sachin Kalyanshetti) यांनी दिलीप माने यांचे नाव सभापतिपदासाठी, तर उपसभापतिपदासाठी सुनील कळके यांचे नाव जाहीर केले. त्यानुसार दोघांनीच सभापतिपद आणि उपसभापतिपदासाठी अर्ज दाखल केले.
निर्धारित वेळेत माने आणि कळके यांच्याशिवाय इतर कोणाचे अर्ज आले नाहीत, त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी गायकवाड यांनी माने आणि कळके यांची बिनविरोध निवड जाहीर केली आहे. माने आणि कळके यांची ही नियुक्ती दोन वर्षांसाठी असणार आहे. त्यानंतर इतर संचालकांना संधी दिली जाणार आहे, असे कल्याणशेट्टी यांनी जाहीर केले.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी माजी आमदार माने, सुरेश हसापुरे, राजशेखर शिवदारे यांना सोबत घेऊन पॅनेल बनविले होते. त्यांच्या विरोधात भाजप आमदार सुभाष देशमुख आणि विजयकुमार देशमुख यांनी एकत्र येऊन निवडणूक लढवली होती. निवडणुकीत कल्याणशेट्टी, माने, हसापुरे यांच्या पॅनेलने १८ पैकी १३ जागा जिंकत बाजार समितीवर वर्चस्व मिळविले होते.
आमदार कल्याणशेट्टी यांनी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने, सुरेश हसापुरे यांच्याशी केलेली युती मान्य नसल्याचे सांगून दक्षिण सोलापूरचे आमदार तथा माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख, माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी एकत्र येत पॅनेल उभे केले होते, त्यांच्या पॅनेलला तीन जागा मिळाल्या होत्या. उर्वरीत दोघे हे अपक्ष आहेत.
सत्ताधारी गटातील राजशेखर शिवदारे अनुपस्थित
सभापती आणि उपसभापती निवडीच्या कार्यक्रमाला सत्ताधारी गटातील संचालक राजशेखर शिवदारे हे अनुपस्थित होते, त्यामुळे शिवदारे यांच्या नाराजीची चर्चा रंगली आहे. निवडणुकीवेळी शिवदारे गटाला दोन जागा देण्यात आल्या होत्या. त्यातील एका जागेवर माने समर्थकाला उमेदवारी देण्यात आली होती. त्यामुळे शिवादारे नाराज होते. आताही त्यांचे नाव सभापतिपदासाठी चर्चेत होते. मात्र, संख्याबळ पाहता त्यांना सभापतिपद मिळणे अशक्य वाटत होते. मात्र, त्यांची आजची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.