
Solapur, 10 May : डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणी 22 दिवसानंतरही पोलिसांच्या हाती ठोस पुरावे सापडू शकले नसल्याचे दिसून येत आहे. अटकेत असलेली संशयित आरोपी मनीषा मुसळे माने हिच्या विरोधातही डॉक्टरांच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठीशिवाय दुसरा कोणता पुरावा सापडला आहे का, याची माहिती पोलिस देऊ शकलेले नाहीत.
दरम्यान, मनीषा मुसळे माने (Manisha Musale-Mane) हिला पुन्हा एकदा पोलिस कोठडीत घेऊन आर्थिक प्रकरणांत तपास करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मुसळे माने हिच्या जामीन अर्जावर म्हणणे मांडण्यासाठी सरकारी पक्षाने तब्बल आठवड्याची म्हणजेच 17 मेपर्यंत मुदत वाढवून मागितली आहे, त्यामुळे सुनावणी लांबली आहे. मुसळे माने हिला आजही (ता. 10 मे) न्यायालयात हजर केले नाही, त्यामुळे येत्या मंगळवारी (ता. 13 मे) तिला न्यायालयात हजर करण्याची शक्यता आहे.
डॉ. शिरीष वळसंगकर (Dr. Shirish Valsangkar) यांनी १८ एप्रिल रोजी रात्री आत्महत्या केली. डॉक्टरांच्या पॅंटच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठीच्या आधारे दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलच्या प्रशासकीय अधिकारी मनीषा मुळे माने हिला अटक करण्यात आली. तिला पहिल्यांदा दोन दिवस आणि त्यानंतर तीन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्यात आले होते. या कालावधीत पोलिसांना ठोस काही सापडले नाही, त्यामुळे पोलिसांनीच मनीषा मुसळे माने हिच्या न्यायालयीन कोठडीची मागणी केली होती.
न्यायालयीन कोठडीच्या 14 दिवसांत ठोस पुराव्यापर्यंत पोलिस पोचतील आणि मनीषा मुसळे माने हिला चौकशीसाठी पुन्हा पोलिस कोठडीत घेतले जाईल, असे सर्वांना वाटत होते. मात्र, या 14 दिवसांत पोलिसांच्या हाती काही लागले नसल्याचे स्पष्ट होते. आता तर मनीषा मुसळे माने हिच्या जामीन अर्जावर म्हणणे मांडण्यासाठी सरकारी पक्षाला कागदपत्रे देण्यासाठी तपास अधिकाऱ्यांची मुदत वाढवून मागितली आहे. त्यामुळे तपासात किती प्रगती झाली आहे, हा खरा प्रश्न आहे. पोलिसांनी किती तपास केला, काय तपास केला हे न्यायालयात युक्तिवादादरम्यानच कळणार आहे, त्यामुळे सुनावणीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
कोठडीतील मनीषा मुसळे माने हिचा आर्थिक व्यवहाराच्या अनुषंगाने सखोल तपास करायचा आहे, त्यामुळे तिला पुन्हा पोलिस कोठडी मिळावी, यासाठी पोलिसांनी न्यायालयात प्रोडक्शन वॉरंटसाठी अर्ज केला होता. तो अर्ज न्यायालयाने मंजूर केला आहे, त्यामुळे मनीषा मुसळे माने हिला कारागृहातून न्यायालयात हजर करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मनीषा हिच्याकडे आर्थिक मुद्यांच्या आधारे तपास करण्यात येणार आहे. त्यामुळे मनीषा हिच्या आर्थिक गैरव्यवहारामुळे डॉक्टरांनी आत्महत्या केली का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पोलिस मनीषा मुसळे माने हिच्याशिवाय दुसऱ्या ॲंगलकडे वळताना दिसून येत नाही. डॉ. वळसंगकर यांच्या मोबाईल ‘सीडीआर’मध्ये नेमके काय आहे. रुग्णालयात डॉ. शिरीष, डॉ. उमा आणि डॉ. अश्विन यांच्यासमोर फाडलेल्या चिठ्ठीचे तुकडे कोठे गेले आहेत. आत्महत्येच्या दिवशी रुग्णालय आणि डॉक्टरांच्या घरातील सीसीटीव्हीत नेमकं काय आढळलं आहे, असा प्रश्न कायम आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.