Sahkar Shiromani Sugar factory Election Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sahkar Shiromani Election : औदुंबरअण्णा पाटील गट फुटीच्या उंबरठ्यावर; काळे कारखाना निवडणुकीसाठी पाठिंबा देण्यावरून पाटील-पवारांमध्ये मतभेद

सहकार शिरोमणीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष दीपक पवार हे स्वतंत्रपणे पॅनेल उतरवणार असतील तरच त्यांना अण्णा गटाचा पाठिंबा असेल, अशी भूमिका युवराज पाटील यांनी घेतली.

भारत नागणे

पंढरपूर : सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखाना निवडणुकीच्या निमित्ताने पंढरपूर (Pandharpur) तालुक्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विठ्ठल परिवारात दुफळी पडल्यानंतर आता पाठिंबा कोणाला द्यायचा, यावरुन एकसंघ असलेल्या (कै.) औदुंबरअण्णा पाटील गटात ही मतभेद असल्याने फूट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.(Disagreement in Audumbaranna Patil faction over support for Sahkar Shiromani factory)

औदुंबरअण्णा पाटील गटाचे सर्वेसर्वा युवराज पाटील यांनी पाठिंब्याबाबत घेतलेल्या भूमिकेमुळे या शक्यतेला अधिक बळ मिळाले आहे. सहकार शिरोमणीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे (NCP) माजी तालुकाध्यक्ष दीपक पवार (Deepak Pawar) हे स्वतंत्रपणे पॅनेल उतरवणार असतील तरच त्यांना अण्णा गटाचा पाठिंबा असेल, अशी भूमिका युवराज पाटील यांनी घेतल्याने तालुक्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. पाटील यांच्या भूमिकेमुळे अण्णा गटात उभी फूट पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सहकार शिरोमणी साखर कारखाना (Sugar Factory) निवडणुकीत कोणती भूमिका घ्यायची, याविषयी चर्चा करण्यासाठी अण्णा गटातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आज विठ्ठल हॉस्पिटलवर झाली. या बैठकीत कार्यकर्त्यांनी आपापली भूमिका मांडल्यानंतर युवराज पाटील यांनी काळे यांच्या विरोधात स्वतंत्र पॅनेल असेल तरच दीपक पवारांना पाठिंबा देऊ, अशी भूमिका घेतली. त्यामुळे दीपक पवार यांच्यासह अण्णा गटाचे कार्यकर्तेही संभ्रमात पडले. युवराज पाटील यांनी हीच भूमिका कायम ठेवली, तर अण्णा गटातील अनेक कार्यकर्ते त्यांच्या सोयीनुसार राजकीय भूमिका घेतील, अशी चर्चा सुरु झाली आहे.

सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे यांनी विठ्ठल साखर कारखान्याच्या निवडणुकीत युवराज पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या विरोधात उघड भूमिका घेत भगीरथ भालकेंना पाठिंबा दिला होता. अवघ्या काही मतांच्या फरकाने युवराज पाटील यांच्या पॅनेलचा विठ्ठलच्या निवडणुकीत पराभव झाला. कल्याणराव काळे यांनी पाठिंबा दिला असता तर आज तालुक्यात वेगळे परिस्थिती दिसली असती, अशी भावना आजही औदुंबरआण्णा पाटील गटाच्या कार्यकर्त्यांच्या मनात आहे. विठ्ठलच्या निवडणुकीनंतर काळे-पाटील गटातील कार्यकर्ते आजही राजकीय अंतर ठेवूनच आहेत.

दुसरीकडे, युवराज पाटील यांचे कट्टर समर्थक दीपक पवार यांनी कल्याणराव काळे यांच्या विरोधात उघड भूमिका घेतली आहे. केवळ कल्याणराव काळे यांचा पराभव करणे हेच दीपक पवार यांनी टार्गेट ठेवले आहे. त्यामुळे पवार हे विठ्ठलचे अध्यक्ष अभिजीत पाटील आणि डॉ. बी. पी. रोंगे यांच्या गटासोबत युती करतील, असा ही अंदाज आहे. पाटील-रोंगे-पवार युती झाल्यास काळे गटासमोर आणखी आव्हान उभे राहणार आहे.

'युवराज पाटलांनी वेगळी भूमिका घेतली तर आम्ही वेगळे होऊ'

विठ्ठल साखर कारखान्याच्या निवडणुकीपासून काळे आणि अण्णा गट एकमेकांच्या विरोधात लढत आहेत. कल्याणराव काळे यांनी विठ्ठल कारखाना निवडणुकीच्या वेळी विरोधात भूमिका घेतली होती. त्यामुळे अण्णा गटाचा पराभव झाला. आता सहकार शिरोमणीच्या निवडणुकीतही आमची काळेंच्या विरोधात राहण्याची भूमिका आहे. अनेक कार्यकर्त्यांनी तसे बोलून दाखवले आहे. दरम्यान, युवराज पाटील यांनी मात्र वेगळी भूमिका घेतली आहे. यासंदर्भात त्यांच्याशी आणखी चर्चा करणार आहोत. चर्चेनंतरही त्यांनी काळेंच्या बाजूने जाण्याची भूमिका घेतली, तर आमची भूमिका मात्र वेगळी राहणार आहे. जे कार्यकर्त्यांच्या मनात आहे, तीच आम्ही भूमिका घेणार असल्याचे युवराज पाटील यांचे समर्थक दीपक पवार यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT