Kolhapur BJP Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Dispute In Kolhapur BJP : ‘भाजपसाठी त्याग करणाऱ्या निष्ठावंतांची फरफट होतेय’; माजी जिल्हाध्यक्षांनी नाराजांना वाट मोकळी केली

Gadhinglaj News : गडहिंग्लज तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या रद्द होईपर्यंत काम बंद ठेवण्याचा निर्णय भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष मारुती राक्षे यांनी जाहीर केला.

Vijaykumar Dudhale

kolhapur News : कोल्हापूर भारतीय जनता पक्षातील असंतोष काही केल्या थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. आजऱ्यापाठोपाठ गडहिंग्लजमध्येही भाजपमधील अंतर्गत वाद उफाळला आहे. नव्या पदाधिकारी निवडीनंतर जुने कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी आपल्या असंतोषाला मोकळी वाट करून दिली. पक्षाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष मारुती राक्षे यांनी पत्रकार परिषद घेत पक्षाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांचा गृहजिल्हा असलेल्या कोल्हापुरात दहा दिवसांत दुसऱ्यांदा घटना घडली आहे. (Discontent in Kolhapur BJP ignites; Party work stopped in Gadhinglaj after Ajra)

भारतीय जनता पक्षासाठी आम्ही त्याग केला. संघटना उभी केली. परंतु, नव्याने आलेल्यांना पक्षाकडून पदे देण्यात आली, हे योग्य नाही. केंद्रात आणि राज्यात सत्ता असताना जुन्या कार्यकर्त्यांची फरफट होत आहे. गडहिंग्लज तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या रद्द होईपर्यंत काम बंद ठेवण्याचा निर्णय भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष मारुती राक्षे यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केला.

गेल्या ३२ वर्षांपासून मी भाजपमध्ये काम करत आहे. यापुढेही काम करत राहू. पण, नव्या नियुक्त्या आम्हाला मान्य नाहीत, अशी भावना गडहिंग्लजचे माजी तालुकाध्यक्ष मार्तंड जरळी यांनी व्यक्त केली. या वेळी आनंद पेडणेकर, विठ्ठल भमानशोळ, अनिल गायकवाड, बी. एस. पाटील, अजित जामदार, संदीप कुरळे, पुंडलिक कुराडे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

मर्जीतील लोकांना खिरापतीसारखी पदे वाटण्यात आली आहेत. निष्ठावंतांवर अन्याय झाल्यामुळेच तालुक्यातील भाजपची स्थिती वाईट झाली आहे. मर्जीतील लोकांनाच पदे देऊन पक्षाची घटना मोडीत काढण्यात आली. नव्या निवडी घटनाबाह्य आहेत. आजपर्यंत असे कधीच घडले नाही, अशा भावनाही या वेळी बोलून दाखविण्यात आली.

आजऱ्यातील भाजप कार्यालय बंद

दरम्यान, गेल्याच आठवड्यात आजरा भाजपमधील वाद चव्हाट्यावर आला हेाता. नव्या पदाधिकारी निवडीवरून जुन्या आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांनी पक्षाचे कार्यालयच बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, भाजप कार्यालयाचा नामफलकही काढून ठेवण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT