Kolhapur News : गोकुळ दूध संघाने केलेल्या डीबेंचर कपातीवरून संस्थाचालक आक्रमक होत आज गोकुळ दूध संघाच्या गोकुळशिरगाव येथील मुख्य कार्यालय घुसले. डिबेंचरची रक्कम १५ टक्क्यावरून ४०% कपात केल्याने संस्थाचालक आक्रमक झाले. संबंधित प्रकाराचा जाब विचारत कार्यकारी अधिकारी योगेश गोडबोले यांना घेराव घातला. डिबेंचरची रक्कम १० ऑक्टोबर पर्यंत परत करण्याची मागणी केली. अन्यथा आंदोलन तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संस्था चालकांनी दिला.
गोकुळ दूध संघाकडून चालू वर्षी जाहीर केलेल्या 136 कोटी दूध फरक बिलामधून 40% रक्कम डिबेंचर वर्गणी पोटी कपात केलेली आहे. सदरची कपात करण्यापूर्वी आम्हा दूध संस्थांना कोणत्याही प्रकारची पूर्वकल्पना देण्यात आलेली नव्हती. त्यामुळे विनाअनुमती झालेली ही कपात रद्द करून संघाने जाहीर केल्याप्रमाणे संपूर्ण फरक बिल आम्हा संस्थांना द्यावे, अशी आमची मागणी आहे.
त्याचबरोबर गोकुळचा ब्रँड हा म्हशीच्या दुधासाठी ओळखला जातो. असे असताना म्हैस दूध दरावर आपण गाय दुधापेक्षा कमी दर फरक दिलेला आहे. यामागचे कारण आणि संघाचे भविष्यातील धोरण आपण स्पष्ट करावे. एकीकडे आपण आम्हाला कर्ज काढून, विविध योजना घेऊन म्हशी खरेदी करण्याचे आवाहन केलेले आहे. आणि दुसरीकडे आपण म्हशीच्या दुधापेक्षा गाय दुधाला जास्त प्राधान्य देत आहात. त्याबाबतीत संघाने काही धोरण ठरविले असल्यास त्याची माहिती आम्हाला देण्यात यावी.
जिल्हयातील दूध उत्पादक आणि आम्ही सर्व संस्थाचालक नेहमी आपल्या मातृसंस्थेसोबत प्रामाणिकपणे राहिलेलो आहोत. त्यामुळे अशा प्रकारे अनधिकृत कपात करून आपण आमच्यावर अन्याय करू नये. चालू वर्षी डिबेंचर पोटी केलेली कपात रद्द करून ती रक्कम दिवाळीपूर्वी आम्हाला परत द्यावी.
अन्यथा ऐन सणासुदीच्या तोंडावर आम्हाला नाईलाजास्तव गोकुळ प्रशासनाविरोधात आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल. आमच्या भावनांचा विचार करून आपण योग्य निर्णय घ्याल, अशी आम्ही आपल्याकडून अपेक्षा करतो. असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी गोकुळ संचालिका शौमिका महाडिक, राजवर्धन नाईक निंबाळकर यांच्यासह संस्थाचालक उपस्थित होते.