Hasan Mushrif  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sanjay Pawar On Mushrif :...अन्यथा मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची सुरुवात तुमच्या गाडीपासून होईल; ठाकरे गटाचा मुश्रीफांना इशारा

Ganesh Thombare

Kolhapur News: मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापलेला आहे. अशातच आता राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांना ठाकरे गटाने इशारा देत तुमच्या गाडीपासून मराठा आंदोलनाला सुरुवात होईल, असा थेट इशारा दिला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मराठा आरक्षणावरून राजकारण तापण्याची शक्यता आहे.

"हसन मुश्रीफ साहेब! तुम्ही नेहमी कोल्हापुरात असता, हे नक्की ध्यानात ठेवा, मराठा आरक्षण आंदोलनाची सुरुवात आपल्या गाडीपासून होऊ नये, ही आमची प्रामाणिक इच्छा आहे. निव्वळ स्वार्थासाठी, वेळ टाळण्यासाठी व निव्वळ राजकारणासाठी मराठ्यांचा वापर करणे हे सत्ताधारी राजकारणांनी सोडून द्यावं, अन्यथा पुन्हा एकदा मराठ्यांचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही", असा इशारा ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी दिला.

मराठा आरक्षणाप्रश्नी सकल मराठा समाजाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कोल्हापुरातील उत्तरदायित्व सभेदरम्यान आंदोलनाची हाक दिली होती. या पार्श्वभूमीवरच वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी मराठा समाज आणि ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना बोलून बैठक घेतली होती. शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी पवार यांच्या गाडीखाली उडी मारण्याचा इशाराही दिला होता.

पण मुश्रीफ आणि पालकमंत्री दीपक केसरकर यांनी कोल्हापुरात मराठा समाजासोबत बैठक घेत 19 सप्टेंबर पूर्वी मुंबईत बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्याप यावर कोणताच निर्णय झाला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या संजय पवारांनी मुश्रीफांना प्रसिद्धिपत्रकाद्वारे इशारा दिला आहे.

"मुश्रीफ साहेब तुम्ही एका विशिष्ट समाजातले असूनसुद्धा तुमचे समावेशक व सर्वाच्या प्रती कल्याणकारी धोरण पाहूनच आपल्याला कोल्हापुरातील अठरापगड जनतेने भरभरून प्रेम दिले. पण नेमकं आपण त्याच लोकांच्या कळपात गेल्याने कदाचित वेळ मारून न्यायची सवय आपल्याला त्या लोकांची लागली असावी", असा समज आता आम्हाला झालेला असल्याचे संजय पवार म्हणाले.

"वेळ गेली, काळ गेला. प्रचंड आर्थिक सुबत्तेचे दर्शन घडवणारा भला मोठा कार्यक्रमही झाला अन् आपल्याला सोयीस्कर आपल्याच शिष्टाईचा विसर पडला. मुश्रीफसाहेब आपल्याकडून मराठा समाजाला ही अपेक्षा नव्हती. तत्काळ केलेली शिष्टाई मार्गी लावा, अन्यथा मराठा समाजाचा असंतोष पाहायला वेळ लागणार नाही", असा थेट इशारा संजय पवार यांनी दिला आहे.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT