Solapur, 15 November : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक सध्या निर्णायक टप्प्यावर आली आहे. उमेदवारी अर्ज माघारीसाठी फक्त दोन दिवस (ता. १६ आणि १७ नोव्हेंबर) उरले आहेत. सहा माजी मातब्बर संचालकांच्या उमेदवारी अर्जांबाबतचा निर्णयही सोमवारी (ता. १६ नोव्हेंबर) उच्च न्यायालय देणार आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे बोराटवाडी (ता. माण, जि. सातारा) गाठले. गोरेंच्या निवासस्थानी या नेत्यांची दुपारी १२ ते ४ अशी तब्बल ४ तास खलबतं झाली. या दौऱ्याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती.
पालकमंत्री गोरे यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीला आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार राजेंद्र राऊत, आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख, माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार जयवंतराव जगताप, माजी आमदार संजयमामा शिंदे, माजी आमदार दिलीप माने, माजी आमदार दीपक साळुंखे, बबनराव आवताडे, रणजित शिंदे, दिग्विजय बागल यांच्यासह इतर नेते उपस्थित होते.
भाजपचे आमदार सुभाष देशमुख, आमदार समाधान आवताडे, माजी आमदार राम सातपुते यांनीही या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला आहे. मात्र ते आजच्या बैठकीला गेले नव्हते. जिल्ह्यातील जवळपास सर्वच प्रमुख नेते बिनविरोधची भाषा बोलत असले तरीही प्रत्यक्षात मात्र निवडणूक लढविण्याच्या दृष्टीनेच त्यांची पावले पडू लागली आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील आणि माजी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनीही निवडणूक लढण्याच्या दृष्टीने तयारी केल्याची माहिती आहे. बँकेच्या १९ पैकी ११ संचालक त्या त्या तालुक्यांच्या विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांमधून निवडले जातात. या जागांवर वर्चस्व असलेले जवळपास सर्वच तालुक्यांतील नेते आजच्या बैठकीला उपस्थित होते.
बँकेच्या आठ जागा या पणन, दुग्ध संस्था, नागरी बँका, एससी/एसटी, ओबीसी, भटक्या प्रतिनिधी मतदारसंघातून प्रत्येकी एक व महिला प्रतिनिधी मतदारसंघातून दोन संचालक निवडले जातात. या आठ जागांच्या वाटपाबाबत या बैठकीत काही ठरले का? याबद्दलही कमालीची उत्सुकता आहे.
पॅनेलसंदर्भात प्राथमिक चर्चा झाली : कल्याणशेट्टी
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पॅनेल कसे असावे, यासंदर्भातील प्राथमिक चर्चा आज पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत झाली. लवकरच या चर्चेला अंतिम स्वरूप मिळेल, असे भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.