Dr. Shirish Valsangkar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Dr. Shirish Valsangkar : डॉ. वळसंगकर यांच्या सूनेचे ‘ते’ पत्र पोलिसांनीच सोशल मीडियातून तातडीने व्हायरल केले

Solapur Crime News : डॉक्टरांच्या आत्महत्येमागे गृहकलह असल्याचे सांगितले जाते. गृहकलहाशी शोनाली यांचा संबंध असल्याचे पोलिस खासगीत मान्य करतात आणि त्याचवेळी शोनाली यांचे पत्रही व्हायरल करतात, यामुळे पोलिसांची भूमिका नेमकी काय आहे.

Vijaykumar Dudhale, तात्या लांडगे

Solapur, 11 May : विख्यात मेंदूविकार तज्ज्ञ डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येला २३ दिवसांचा कालावधी लोटला आहे. पण, डॉक्टरांच्या आत्महत्येला नेमकं कोण जबाबदार? हे अद्याप गुलदस्त्यात आहे. या 23 दिवसांत पोलिसांच्या हाती कोणतेही महत्वाचे धागेदारे लागले नसल्याचे स्पष्ट होत आहे.

दरम्यान, डॉ शिरीष वळसंगकर (dr. shirish valsangkar) यांच्या सून डॉ शोनाली आणि त्यांचे वडिल दिलीप जोशी यांनी पोलिसांना एक पत्र पाठविले होते. त्या पत्रासंदर्भात तपास अधिकारी अजित लकडे यांनी भाष्य केले होते आणि झालेही तसेच. डॉक्टरांच्या आत्महत्येमागे गृहकलह असल्याचे सांगितले जाते. गृहकलहाशी शोनाली यांचा संबंध असल्याचे पोलिस खासगीत मान्य करतात आणि त्याचवेळी शोनाली यांचे पत्रही व्हायरल करतात, यामुळे पोलिसांची भूमिका नेमकी काय आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.

डॉ. वळसंगकर यांनी १८ एप्रिल रोजी राहत्या घरातील बाथरूममध्ये गोळी झाडून आत्महत्या केली होती. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या डॉक्टरांना उपचारासाठी त्यांच्याच रुग्णालयात नेण्यात आले होते. उपचार करताना डॉक्टरांचे कपडे फाडून काढण्यात आले होते. त्या वेळी त्यांच्या कपड्यामध्ये काहीही सापडले नव्हते. तसे पोलिसांनीही (Police) सांगितले होते. मात्र, शवविच्छेदन करताना डॉक्टरांच्या पॅंटच्या खिशात सुसाईड नोट आढळली होती. त्या चिठ्ठीच्या आधारे पोलिसांनी १९ एप्रिल रोजी हॉस्पिटलच्या प्रशासकीय अधिकारी मनीषा मुसळे माने हिला अटक करण्यात आले आहे.

मनीषा मुसळे माने हिला पहिल्यांदा दोन, त्यानंतर तीन दिवस पोलिस कोठडी सुनावली होती. मात्र या कोठडीदरम्यान कोणताही ठोस पुरावा पोलिसांना सापडू शकलेला नाही, त्यामुळे पोलिसांनीच तिच्या न्यायालयीन कोठडीची मागणी केली होती. न्यायालयीन कोठडीदरम्यानही तिच्या विरोधात पोलिसांना पुरावे सापडू शकलेले नाहीत. उलट मुसळे माने हिच्या जामीन अर्जावर म्हणणे मांडण्यासाठी पोलिसांनी वेळ वाढवून मागितली आहे.

मनीषा मुसळे माने हिने डॉक्टरांच्या आत्महत्येला गृहकलह असल्याचे चौकशीदरम्यान सांगितले असल्याचे नमूद केलेले आहे, असे सांगितले जात आहे. मात्र, पोलिस दुसऱ्या ॲंगलने विचार न करता आता मुसळे हिचा आर्थिक गैरव्यवहाराच्या दृष्टीने तपास करायचा असे सांगून पोलिस कोठडीचीमागणी करत आहेत, त्यामुळे पोलिस मुसळे माने हिच्या पुढे जायला तयार नाहीत, असे यावरून स्पष्ट होते.

दरम्यान, डॉ. शोनाली वळसंगकर आणि त्यांचे वडील डॉ. दिलीप जोशी यांनी ६ मे रोजी सदर बझार पोलिसांना एक पत्र पाठविले होते. त्या पत्राद्वारे त्यांनी माध्यमातून होणाऱ्या बदनामीबाबत तक्रार केली होती. या प्रकरणाचा तपास करणारे अधिकारी अजित लकडे यांनी पत्र पाठविण्याच्या दोन दिवस आधी डॉ. शोनाली या माध्यमांना बदनामीसंदर्भात पत्र देणार असल्याचे विधान केले होते आणि झालेही तसेच. ते पत्र लकडे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून तातडीने व्हायरल केले.

डॉक्टरांच्या आत्महत्येमागे गृहकलह असल्याचे पोलिस पहिल्या दिवशी शक्यता वर्तवित होते. त्या गृहकलहाशी सून डॉ. शोनाली यांचा संबंध होता, असेही पोलिस अधिकारी खासगीत मान्य करतात. त्याचवेळी डॉ शोनाली यांचे पत्रही व्हायरल करतात, त्यामुळे पोलिसांची भूमिका संभ्रम निर्माण करणारी आहे, हे मात्र निश्चित.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT