Dr. Shirish Valsangkar  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Dr. Shirish Valsangkar : डॉ. वळसंगकर प्रकरणात महत्वपूर्ण घडामोड आली पुढे; डॉक्टरांची म्युच्युअल फंडात 160 कोटींची गुंतवणूक;कोणाला मिळणार परतावा?

Solapur Crime News : शिरीष वळसंगकर हे मनाने आणि संपत्तीनेही श्रीमंत हेाते, हे उघड आहे. हजारो गरीब रुग्णांना गरजेनुसार बिलात सवलत देणे, स्वतःची डायमंड प्लेन खरेदी, पत्नीला हिऱ्याची आभूषणे देणे हे डॉक्टर सहजासहजी करायचे.

सरकारनामा ब्यूरो

Solapur, 27 April : डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणी अटकेत असलेली मनीषा मुसळे माने हिच्या चौकशीत धमकीचा मेल आणि त्यानंतरचा माफीनामा यापुढे पोलिसांचा तपास पुढे सरकलेलाच नाही. हाती काही ठोस लागत नसल्याने पोलिसांनीच मनीषा मुसळे माने हिच्या न्यायालयीन कोठडीची मागणी केली, त्यामुळे ती सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. एकीकडे वळसंगकर आत्महत्या प्रकरणात पोलिसांच्या हाती कोणताही ठोस पुरावा सापडलेला नसताना एक महत्वपूर्ण घडामोड समोर आली आहे. डॉक्टरांनी म्युच्युअल फंडात गेल्या 15 वर्षांत तब्बल 160 कोटी रुपये गुंतवणूक केल्याचे समोर आले आहे. डॉ. वळसंगकरांच्या निकटवर्तीयांनी ही माहिती दिली आहे.

प्रसिद्ध मेंदूविकार तज्ज्ञ डॉ. शिरीष वळसंगकर (Dr. Shirish Valsangkar) यांनी 18 एप्रिल रोजी दोन गोळ्या झाडून आत्महत्या केली होती. त्यानंतर वळसंगकर हॉस्पिटलची प्रशासकीय अधिकारी मनीषा मुसळे-माने हिला 19 एप्रिल रोजी रात्री अकराच्या सुमारास अटक केली होती. त्यानंतर पहिले तीन दिवस आणि त्यानंतरचे दोन दिवस असे पाच दिवस ती पोलिस कोठडीत होती. या पाच दिवसांच्या चौकशीत मनीषा मुसळे माने हिच्याकडून कोणतीही ठोस माहिती पोलिसांना मिळू शकलेली नाही.

डॉक्टरांच्या आत्महत्येमागची वस्तुस्थिती वेगळी आहे, त्यांच्या खिशात सापडलेली चिठ्ठी ही कोणी तरी प्लाँट केलेली आहे, असा आरोप संशयित आरोपीचे वकिल प्रशांत नवगिरे यांनी केला आहे. हे सांगत असताना मनीषा मुसळे माने (Manisha Musale Mane) हिने चौकशीत डॉक्टरांच्या कुटुंबातील काही गोष्टीही सांगिल्याचे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यामुळे डॉ. वळसंगकर यांच्या आत्महत्येस कारणीभूत असणारी व्यक्ती नेमकी कोण, हा प्रश्न दहा दिवसांनंतरही अनुत्तरीतच आहे.

डॉ. वळसंगकर यांच्या आत्महत्येचे ठोस कारण तपासात पुढे आलेले नाही. मात्र, त्यांच्या आर्थिक व्यवहारासंदर्भातील एक महत्वपूर्ण माहिती समोर आली आहे. त्यात डॉक्टरांनी गेल्या पंधरा वर्षांत एसआयपीच्या माध्यमातून म्युच्युअल फंडात सुमारे 160 कोटी रुपये गुंतवल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयाने दिली आहे. म्युच्युअल फंडात एखाद्याने सुमारे 15 वर्षांपूर्वी 160 कोटी रुपये गुंतवले तर त्याचा किमान 300 कोटी किंवा त्याहून अधिक रक्कम वारसाला मिळणे, शक्य असल्याचे गुंतवणूक तज्ज्ञांनी स्पष्ट केले.

डॉक्टर वळसंगकरांनी ही गुंतवणूक करताना वारस म्हणून कोणाची नोंद केली, हे समजू शकलेले नाही. मात्र, डॉ. वळसंगकर यांचे मृत्युपत्र आणि वारसा असलेली कागदपत्रे दाखल केल्यानंतर संबंधितांना ती रक्कम मिळू शकणार आहे. पण, वळसंगकरांनी नॉमिनी म्हणून कोणाची नोंदणी केलेली आहे. याबाबत उत्सुकता असणार आहे.

शिरीष वळसंगकर हे मनाने आणि संपत्तीनेही श्रीमंत हेाते, हे उघड आहे. हजारो गरीब रुग्णांना गरजेनुसार बिलात सवलत देणे, स्वतःची डायमंड प्लेन खरेदी, पत्नीला हिऱ्याची आभूषणे देणे हे डॉक्टर सहजासहजी करायचे. वैद्यकीय सेवा फक्त पैसे कमाविण्यासाठी नव्हे तर सामाजिक सेवा हे जाणून ते अनेक रुग्णांना बिलात सवलत द्यायचे. मात्र, अलीकडच्या काळात त्यांचे रुग्णालयातील अधिकार त्यांच्या जवळच्या नातेवाईकांनी गोठविले हेाते.

म्युच्युअल फंडात डॉ. वळसंगकर यांनी गुंतवलेली रक्कम त्यांच्या वारसांना मिळणार, हे उघड सत्य आहे. मात्र, डॉक्टरांना आत्महत्या करण्यासारखी परिस्थिती ज्यांनी निर्माण केली, त्यांना शिक्षा होणार का, असा खरा प्रश्न आहे.

Edited By : Vijay Dudhale

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT