Kolhapur News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी (ता. 18) पालकमंत्रीपदाच्या नियुक्त्या जाहीर केल्या. यावेळी कोल्हापूर जिल्ह्याला पहिल्यांदाच सहपालकमंत्री देण्यात आला आहे. पालकमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते तथा आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांची नियुक्ती झाली आहे. तर सहपालकमंत्री पदाची धूरा भाजपच्या माधुरी मिसाळ यांच्या हाती देण्यात आली आहे. यामुळे एकाच वेळी शिवसेना आणि भाजप कोल्हापूर जिल्ह्याचा कारभार संभाळणार आहेत. मात्र अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला दूर ठेवले आहे. यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेना आपला डाव खेळण्यास तयार आहे. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह सजेत पाटील यांचा करेक्ट कार्यक्रम केल्याचं बोललं जात आहे.
नुकत्याच जाहीर झालेल्या पालकमंत्रीपदांच्या नियुक्त्यांमुळे प्रजासत्ताक दिनाला पालकमंत्रीच झेंडा फेडकावणार हे जाहीर झालं आहे. त्यामळे कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ होणार या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. जिल्ह्यात शिवसेनेचे तीन आमदार असल्याने त्यांनाच पालकमंत्रीपद मिळणार हे पक्के होते. पण ज्या प्रमाणे अजित पवार हेच पुण्याचे पालकमंत्री झाले.
तसेच मुश्रीफ देखील जिल्ह्याचे पालकमंत्री होतील अशा चर्चा सुरू होत्या. पण शिंदे यांनी फडणवीस यांच्या हातून आबिटकर यांच्या गळ्यात पालकमंत्रीपदाची माळ टाकत अजित पवार यांनी धक्का दिला आहे. हसन मुश्रीफ यांनाच जिल्ह्याबाहेर 600 किलोमीटर लांब वाशीमला पाठवले आहे. यामुळे आता जिल्ह्यात राष्ट्रवादीचं काय असा नवा सवाल उपस्थित झाला आहे. तसेच आबिटकर यांच्या रूपाने सतेज पाटील यांच्याविरोधातील देखील डाव एकनाथ शिंदे यांनी जिंकला आहे.
भाजपने जिल्ह्याला सहपालकमंत्री देत जिल्ह्याच्या कारभारात प्रवेश केला आहे. चंद्रकांत पाटील यांच्यानंतर भाजपला ही संधी मिळाली आहे. पण शिवसेना आणि भाजपने गट्टी करत मुश्रीफ यांची पालकमंत्रीपदाची संधी हिसकावून घेतली आहे. भाजपसह शिवसेनेला जिल्ह्यात कारभार करण्यास आता मोकळीक असणार असून विरोधाला कोणीच नसेल.
प्रकाश आबिटकर हे जिल्ह्यातील शिवसेनेचे आमदार असून ते तिसऱ्यांदा आमदार झाले आहेत. तर शिवसेनेत फुट पडल्यानंतर ते एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेले. त्यांनी दिलेल्या या साथीचे शिंदे यांनी मोठे गिफ्ट देत मंत्रिमंडळात आबिटकर यांना थेट कॅबिनेट केलं. तसेच मुश्रीफ यांच्या सारख्या तगड्या नेत्याकडे जाणारे पालकमंत्रीपद आबिटकर यांना देत शिवसेना आणखीन बळ दिले आहे. यामुळे जिल्ह्यात शिवसेना आणखीन मजबूत करण्याची जबाबदारी आता आबिटकर यांच्यावर असणार आहे.
जिल्ह्याचे नेते सतेज पाटील यांच्या नेतृत्वात गेल्या वेळी 6 आमदार महाविकास आघाडीचे होते. यामुळे ते यंदा जिल्ह्यातील सर्व जागा निवडूण आणतील असे अनेकांना वाटतं होते. तशी फिल्डींग देखील त्यांनी लावली होती. मात्र त्यांची फिल्डींग मोडीत काढत तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्यात महायुतीचा झेंडा गाडला. पक्षाचे तीन आमदार निवडूण आले. तसेच भाजपल 2, जनसुराज्य शक्तील पक्ष 2, राष्ट्रवादी 1, राजर्षी शाहू आघाडी 1 आणि अपक्ष 1 अशा जागा निवडूण आणल्या.
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीवेळी जिल्ह्याचे नेते सतेज पाटील यांना शह दिला होता. त्यांना तिकीट वाटपाच्या घोळात असे काही अडकवले की त्याचा चुकीचा मॅसेज थेट जिल्ह्यात गेला. यामुळे जिल्ह्यात महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला. मुदाळ येथील सभेत उद्धव ठाकरे यांनी देखील सतेज पाटील यांच्यावर शिवसेनेची जबाबदारी दिली. पण एकटे आणि एकाकी पडलेल्या सतेज पाटील यांना आपल्या पुतण्याची देखील आमदारकी राखता आली नाही. महाडीक आणि राजेश क्षिरसागर यांच्या मदतीने त्यांनी सतेज पाटील यांना कोल्हापूर दक्षिण, उत्तर आणि करवीरमध्येच अडकवून ठेवले. यामुळे सतेज पाटील यांना जिल्हाभर जोडण्या लावता आल्या नाहीत. उलट महाविकास आघाडीतील काही नेत्यांनी महायुतीला थेट मदत केली.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात. कोल्हापूर, इचलकरंजी महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषद, आणि 12 पंचायतसमित्या यात येतात. आबिटकर यांच्यांवर शिंदे यांनी विश्वास दाखवला असून त्यांच्याकडे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भगवा फडकवण्याची संधी आहे. मात्र यासाठी त्यांना सतेज पाटील यांच्यासह स्थानिक नेत्यांचा विरोध मोडून काढावा लागेल. सतेज पाटील यांची यंत्रणा असून ती जिल्ह्याभर काम करत असते. अशा वेळी आबिटकर यांना सतेज पाटील यांच्या विरोधकांची मदत घ्यावी लागणार आहे. तसेच विधानसभेतील नाराजांची देखील मोट बांधावी लागेल. तरच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भगवा फडकण्याची संधी मिळू शकते.
एकीकडे मुश्रीफ यांना जिल्ह्याबाहेर पालकमंत्रीपद देण्यामागे देखील दोन कारणे सांगितली जात आहेत. यातील एक शक्तीपीठाला त्यांनी दाखवलेला विरोध आणि दुसरा सतेज पाटील यांची जवळीक. आता मुश्रीफचं जिल्ह्यात नसल्याने सतेज पाटील यांना गोकूळ, केडीसेसी, शेतकरी संघ, मार्केट कमिटीसह स्थानिक स्वराज संस्थांमध्ये बळ मिळणार नाही. तर पालकमंत्रीच जिल्ह्यातील असल्याने शक्तीपीठ कामाला गती मिळेल असेही सूत्र यामागे आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.