Pandharpur, 13 June : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा अपघात कसा झाला, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. ज्या प्रमाणे अजितदादांचा घात झाला, त्याच पद्धतीने शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही घात होऊ शकतो, असे खळबळजनक विधान माळशिरस पंचायत समितीचे शिवसेनेचे सभापती दत्ता मगर यांनी केले आहे. मगर यांच्या या विधानामुळे सोलापूरच्या राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
आमदार रोहित पवार यांनी पंढरपूरमध्ये शेतकरी कर्जमाफीसाठी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. त्या आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. आमदार रोहित पवार यांना पाठिंबा देण्यासाठी माळशिरसचे सभापती दत्ता मगर आज पंढरपुरात आले होते. त्यावेळी आंदोलनस्थळी बोलताना दत्ता मगर यांनी हे विधान केले आहे.
सभापती मगर म्हणाले, अस्मानी आणि सुलतानी संकटामुळे दहा-दहा एकरवाला शेतकरी रडू लागला आहे. पण, या सरकारला काय जाग येईना झाली आहे. मीही सरकारमधला आहे. पण पंढरपूर आणि माळशिरस तालुक्याच्या वतीने मी रोहित पवार यांना सांगतो की, शेतकऱ्यांच्या लढाईत आम्ही तुमच्यासोबत आहोत.
मी शिवसेनेचा सभापती आहे. पण मीही एक शेतकरी आहे, माझी स्वतःची दहा एकर केळी वादळात पडली आहे. पण, त्याची कोणीही दखल घेतली नाही. मी स्वतः पदाधिकारी आहे, तरीही आमची दखल घेतली जात नाही, तर सर्वसामान्यांचे काय, असा सवाल दत्ता मगर यांनी केला आहे.
सभापती मगर म्हणाले, शेतकऱ्यांचा एक कैवारी आपल्यातून कसा हिरावून नेला, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण एक कैवारी तुमच्यासमोर आहे, त्यांना आपल्या सर्वांना जपायचं आहे. आपल्यातून अजितदादा गेले, ते कसे गेले, हे सर्वांना माहिती आहे. इथून पुढे कोणताही नेता असा जाता कामा नये.
मला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खंत वाटते. त्यांच्यासोबतही अजितदादाप्रमाणे घातपात होऊ शकतो. शिंदे यांच्यापर्यंत हा मेसेज जाऊ द्या. दादांची त्यांना कळ येऊ द्या. शिंदेसाहेब तुमच्यासोबतसुद्धा असा घात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शिवसेनेचे सभापती दत्ता मगर यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. दत्ता मगर यांच्या जाहीर विधानानंतर पोलिस काय भूमिका घेतात, याकडेही लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.