

Karad, 13 June : सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत महायुतीची बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र, महायुतीमधील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांनी या बैठकीकडे पाठ फिरवल्याने भाजप उमेदवार धैर्यशील कदम यांची धाकधूक वाढली आहे. या बैठकीला केवळ भाजपचे मंत्री आणि नेते उपस्थित असल्याने ती बैठक महायुतीची नव्हे तर केवळ भाजपची ठरली आहे.
विधान परिषदेच्या सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भाजपचे धैर्यशील कदम हे निवडणूक लढवत आहेत. धैर्यशील कदम यांच्यासाठी आज सातारा जिल्ह्यातील कराड येथे महायुतीची समन्वय बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र, या बैठकीकडे महायुतीमधील इतर दोन पक्षाच्या मंत्र्यांसह सर्वच नेतेमंडळींनी पाठ फिरवल्याने भाजपची चिंता वाढण्याची शक्यता आहे.
महायुतीच्या समन्वय बैठकीला भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह सातारा आणि सांगली जिल्ह्यातील भाजपचे आमदार उपस्थित होते. या बैठकीला शिवसेनेचे केवळ कोरेगावचे आमदार महेश शिंदे उपस्थित होते.
विधान परिषद निवडणुकीसाठीचे मतदान अवघ्या काही दिवसांवर आलेले असताना सांगली-सातारा जिल्ह्यातील महायुतीमधील बेबनाव चव्हाट्यावर आला आहे. जिल्हा परिषद निवडणुकीपासून महायुतीमधील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे भाजपच्या भूमिकेवर नाराज आहेत. मात्र, ही नाराजी भाजपला भोवण्याची शक्यता नाकारता येत नाही.
महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीच्या आदल्या दिवशीच साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी भाजपच्या भूमिकेबाबत नाराजी बोलून दाखवली होती. आमची अवस्था ‘येऊ नको म्हटलं, तर कोणत्या गाडीत बसू,’ अशी झाली आहे. महायुतीच्या बैठकीचे निमंत्रण आम्हाला भाजपकडून आलेले नाही, त्यामुळे आम्ही त्या बैठकीला कसे जाणार, असा सवाल त्यांनी केला होता. त्यामुळे महायुतीमध्ये काहीही आलबेल नसल्याचे दिसून येत आहे.
केवळ आमदार महेश शिंदेंची उपस्थिती
या बैठकीला शिवसेनेचे केवळ कोरेगावचे आमदार महेश शिंदे उपस्थित होते. आमदार शिंदे हे जिल्हा परिषद निवडणुकीपासून शिवसेनेपासून दुरावल्याचे चित्र आहे. आजच्या कराड येथील बैठकीला शिवसेनेचे आमदार महेश शिंदे हेच उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.