Kolhapur Politics : नगरपालिका, नगरपंचायत, महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने कोल्हापूर जिल्ह्यात चांगली कामगिरी केली. यासाठी मागील दोन वर्षांपासूनच जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात शिवसेनेची ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले होते. अनेक मातब्बरांचे पक्षप्रवेश घडवून आणले गेले. त्याचाच परिणाम स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत दिसून आला.
स्थानिकच्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार निवडून येण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील नेत्यांनी प्रयत्न केले. या निवडणूक संपल्यानंतर आता शिवसेना पुन्हा अॅक्टिव्ह मोडमध्ये येणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसप्रणित स्थानिक आघाड्यांना आणि त्यांच्या प्रमुखांना गळाला लावण्यासाठी खासदार,आमदार आणि मंत्र्यांचे प्रयत्न सुरू झाले आहेत.
जिल्ह्यातील हातकणंगले, शिरोळ तालुक्यातील काँग्रेसप्रणित स्थानिक आघाड्यांना शिवसेनेत घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. गेल्या काही निवडणुकांमध्ये काँग्रेससोबत असणाऱ्या या स्थानिक आघाड्या स्थानिक राजकारणात सत्तेत असल्या तरी निधी आणि विकासकामांबाबत आमदार आणि खासदारांकडे जावे लागत आहे.
निधी आणि विकासकामांबाबत शब्द घेत या स्थानिक आघाड्यांना पक्षात येण्यासंदर्भात बोलणी केली जात आहे. त्याला काही स्थानिक आघाड्यांच्या प्रमुखांनी सहमती दर्शवली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील या स्थानिक आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी शिवसेनेचे नेते पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासोबत चर्चा केल्याची देखील माहिती आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत काही सकारात्मक चर्चा झाल्या आहेत. अधिवेशनानंतर या स्थानिक आघाड्यांच्या पक्षप्रवेशा संदर्भात अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. जर या आघाड्यांचा शिवसेनेत पक्ष प्रवेश करण्याचा निर्णय झाला तर जिल्ह्यात नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत काँग्रेसचे अस्तित्व धोक्यात येणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.