सोलापूर : शिवसेनेत (Shivsena) बंड करून बाहेर पडलेल्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि इतर आमदारांना परत येण्याचे आवाहन करत आज (गुरुवारी, ता. २३ जून) सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील शिवसैनिकांनी आर्त टाहो फोडला. महिला आघाडीच्या जिल्हा संघटक अस्मिता गायकवाड तर ढसढसा रडल्या. एरव्हीचे गट-तट विसरून सर्व पदाधिकारी एकत्र येत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. या बैठकीला शहर व जिल्ह्यातून मोठ्या संख्येने पदधिकारी उपस्थित होते. (Eknath Shinde should come back : Demand of Shiv Sainiks from Solapur)
मागील चार दिवसांत राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर आपली भूमिका मांडण्यासाठी सोलापूर शहर व जिल्हा शिवसेनेने बैठकीचे आयोजन केले होते. शासकीय विश्रामगृहात दुपारी बाराच्या सुमारास होणाऱ्या या बैठकीसाठी साडेअकरापासून शिवसैनिकांनी हजेरी लावली होती. मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांना यांना एकत्रित बसता यावे, यासाठी कॉन्फर्नस हॉलच्या बाहेरील मोकळ्या जागेत बैठकीचे आयोजन करावे लागले.
प्रास्ताविकात शहर प्रमुख गुरुशांत धत्तुरगावकर यांनी अजून कोणतेही राजकीय चित्र स्पष्ट झालेले नसल्याने कुणीही कोणत्याही नेत्यावर टीका टिप्पणी करू नये, असे आवाहन केले. हा काळ कसोटीचा असला तरी शिवसेनेचा वारसा संघर्षाचा आहे. यातून पुन्हा पक्ष उभारी घेईल. आपले पक्षावरील आणि मातोश्रीवरील प्रेम उद्धव ठाकरे यांच्यावरील प्रेम व्यक्त करावे, आपण पक्षप्रमुखांबरोबर राहणार असून हीच आपली भूमिका आज स्पष्ट करायची असल्याचे सांगितले.
बार्शीचे भाऊसाहेब आंधळकर यांनी आक्रमक शैलीत भावना व्यक्त केल्या. उद्या काही वेगळे घडले तर याला जबाबदार असलेल्या नेत्यांना आपण सर्वांनी मिळून पाडणे, हे आपले कर्तव्य आहे. शिवसैनिकांच्या ताकदीला कोणी आव्हान देऊ शकत नाही, असे सांगितले. या वेळी जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे म्हणाले की, जे पक्षाच्या विरोधात कारवाया करतील, त्यांना शिवसैनिक धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत. हे राजकारण आहे. अशा लोकांना शिवसैनिक रस्त्यावर फिरु देणार नाहीत. त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत. जिल्हाप्रमुख गणेश वानकर म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुवाहटी गेलेल्या आमदारांची वाट बंद केलेली नाही, त्यांना परत येण्याचे आवाहन केले आहे. एकनाथ शिंदे हे आमचे नेते आहेत. त्यांनी सन्माने परत यावे.
या बैठकीला जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे, जिल्हाप्रमुख गणेश वानकर, माजी राज्यमंत्री उत्तमप्रकाश खंदारे, शहरप्रमुख गुरुशांत धुत्तरगांवकर, माजी जिल्हाप्रमुख दीपक गायकवाड, प्रा. अजय दासरी, प्रकाश वानकर, महिला आघाडी जिल्हा संघटक अस्मिता गायकवाड, सीमा पाटील, बार्शीचे भाऊसाहेब आंधळकर, उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण यांच्यासह शहरातील उपशहरप्रमुख, विभागप्रमुख, शाखाप्रमुख व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवसेनेचा घात करणाऱ्याला माफी नाही
छत्रपती शिवाजी महाराजांनी सूरत लूटली होती. याच सुरतेहून कोणी आमचा घात करणार असेल तर त्याला माफ करणार नाही. एकनाथ शिंदे यांच्या पीएला ईडीची नोटीस आली आहे, असे समजते. शिवसैनिक हा भीत नसतो. कोणत्याही संकटाला भीक न घालता एकनाथ शिंदे यांनी परत यावे. अटक झाली तर होऊ दे, नाही तर काहीही होऊ दे, आपण संघर्ष करू, असा पवित्रा भाऊसाहेब आंधळकर यांनी घेतला. नारायण राणे ११ आमदार घेऊन गेले. मात्र, पुन्हा दोन आमदारही जिंकून आणू शकले नाहीत. छगन भुजबळाचेही असेच झाले. शिवसेनेला धोका देणाऱ्याचेही असेच होणार आहे, असेही ते म्हणाले.
अमाच्याच लोकांना आवडेनात लोकप्रिय मुख्यमंत्री
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री ठरले आहेत. इतर पक्षाचे लोकही मुख्यमंत्र्यांचे कौतुक करतात. मात्र आमच्याच पक्षाच्या लोकांना आज हे लोकप्रिय मुख्यमंत्री नकोसे झाले आहेत, हे दुर्दैव आहे. अशा लोकांना शिवसैनिक माफ करणार नाहीत, असे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.