Eknath Shinde Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur Shivsena : शिंदेंच्या शिवसेनेचा सोलापूरमधील पाच मतदारसंघावर दावा; महायुतीत पडणार वादाची ठिणगी

Mahayuti seat Sharing Issue : सोलापूर जिल्ह्यातील 5 जागांवर आम्ही दावा करतोय. त्यामध्ये सोलापूर दक्षिण, सोलापूर शहर मध्य, मोहोळ, सांगोला आणि करमाळा या पाच जागांवर आम्ही दावा केला आहे.

विश्वभूषण लिमये

Solapur, 06 October : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने सोलापूर जिल्ह्यातील पाच जागांवर दावा केला आहे. सोलापूरच्या दौऱ्यावर आलेल्या विधान परिषदेच्या उपसभापती तथा पक्षाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी ही घोषणा केली आहे. विशेष म्हणजे मित्रपक्ष भाजप आणि राष्ट्रवादीच्या जागांचाही त्यात समावेश आहे, त्यामुळे महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडू शकते.

विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Dr. Neelam Gorhe) या आज सोलापूरच्या दौऱ्यावर आल्या आहेत. त्या वेळी शासकीय विश्रामगृहात माध्यमांशी बोलताना शिवसेना सोलापूर जिल्ह्यातील पाच जागांवर दावा करणार असल्याचे सांगितले. आता अकरापैकी पाच जागांवर शिवसेनेने दावा केल्याने भाजप आणि राष्ट्रवादी किती जागांवर निवडणूक लढवणार, याची चर्चा सुरू झाली आहे.

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील 5 जागांवर आम्ही दावा करतोय. त्यामध्ये सोलापूर दक्षिण, सोलापूर शहर मध्य, मोहोळ, सांगोला आणि करमाळा या पाच जागांवर आम्ही दावा केला आहे. तसेच लोकसभा निवडणुकीला मतदारांचे जे गैरसमज झाले आहेत, तेही दूर होत आहेत.

दरम्यान, शिवसेनेने दावा केलेल्या पाच जागांपैकी सध्या त्यांच्याकडे सांगोला वगळता कोणत्याही मतदारसंघात आमदार नाही. गोऱ्हे यांनी दावा केलेल्या पाच मतदारसंघापैकी मागील निवडणुकीत मोहोळ, सांगोला, करमाळा, सोलापूर शहर मध्य या चार आणि बार्शी, माढा या जागांवर निवडणूक लढवली होती. त्यापैकी केवळ सांगोल्यातून शहाजीबापू पाटील यांच्या माध्यमातून शिवसेनेची एकमेव जागा निवडून आली होती.

शिवसेनेने दावा केलेल्या पाच जागांपैकी दोन ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार आहेत, तर सोलापूर दक्षिण मतदारसंघात भाजपचे माजी मंत्री सुभाष देशमुख निवडून आले आहेत, त्यामुळे शिवसेनेला या पाच जागा मिळणार का, हा खरा प्रश्न आहे. सध्या भाजपच्या कमळ चिन्हावर पाच आमदार निवडून आले असून बार्शीत राजेंद्र राऊत यांना पक्षाने पाठिंबा दिलेला आहे.

करमाळा, मोहोळ आणि माढ्यात राष्ट्रवादी आणि समर्थक आमदार आहेत. प्रत्येकी एका जागेवर शिवसेना आणि काँग्रेसचे आमदार आहेत. त्यामुळे एक ठिकाणी आमदार असलेल्या शिवसेनेला पाच जागा सुटणार का? भाजप आणि राष्ट्रवादी आपल्या जागांवर पाणी सोडणार का? असे प्रश्न गोऱ्हे यांच्या दाव्याने निर्माण होत आहेत.

Edited By : Vijay Dudhale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT