Karmala Bazar Samati Election Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Karmala Bazar Samiti : जयवंतराव जगताप पुन्हा होणार सभापती; विजयादशमीच्या मुहूर्तावर गेलेली सत्ता त्याच दिवशी मिळविणार

Jaywantrao Jagtap News : उपसभापतिपदासाठी संधी दिल्या जाणाऱ्या शैलजा मेहेर या जगताप गटाचे निष्ठावंत कार्यकर्ते बबन मेहेर यांच्या पत्नी आहेत

आण्णा काळे

Karmala News : करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (ता. २४ ऑक्टोबर) दसरा अर्थात विजयादशमीच्या मुहूर्तावर होत आहे. सभापतिपदी माजी आमदार जयवंतराव जगताप यांची निवड निश्चित मानली जात असून, उपसभापतिपदाची संधी महिला संचालक शैलजा मेहेर यांना दिली जाऊ शकते. विजयादशमीच्या मुहूर्तावर मागील पंचवार्षिक निवडणुकीत गेलेली बाजार समितीची सत्ता जगताप ताब्यात घेणार आहेत. (Election of former MLA Jaywantrao Jagtap as Chairman of Karmala Bazaar Samiti)

करमाळा बाजार समिती कार्यालयाच्या सभागृहात ही निवड होणार आहे. करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इतिहासात पहिल्यांदा ही निवडणूक बिनविरोध झाली आहे. ही निवडणूक बिनविरोध होऊन बाजार समितीची एकहाती सत्ता माजी आमदार तथा माजी सभापती जयवंतराव जगताप यांना देण्यात आली आहे.

निवडणूक बिनविरोध होण्यासाठी जगताप गटाला आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार संजय शिंदे, माजी आमदार नारायण पाटील, बागल गटाचे नेते दिग्विजय बागल, भाजप, जनशक्ती संघटना यांनी विशेष सहकार्य केले आहे. आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी माजी आमदार जयवंतराव जगताप, माजी आमदार नारायण पाटील आणि बागल गटाचे नेते दिग्विजय बागल यांच्यात समन्वय घडवून आणण्याची महत्त्वाची भूमिका पार पाडली. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला.

बाजार समिती संचालक म्हणून माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या बरोबर त्यांचे चिरंजीव शंभूराजे जगताप हेही संचालक झाले आहेत. त्यामुळे सभापतिपदासाठी जयवंतराव जगताप शंभूराजे यांनाही संधी देतील, अशी चर्चा आहे. मात्र, जयवंतराव जगताप हे स्वतःच सहाव्यांदा सभापती होणार असल्याचे निश्चित मानले जात आहे.

माजी आमदार जयवंतराव जगताप हे १० जून १९८९ रोजी पहिल्यांदा बाजार समितीचे सभापती झाले. त्यांनी सभापती म्हणून १९८९ ते २०१८ अशी सलग २९ वर्षे काम पाहिले आहे. बाजार समितीवर २०१८ ते २०२३ ही पंचवार्षिक वगळता जगताप गटाचेच वर्चस्व कायम राहिले आहे.

मागील २०१८ च्या निवडणुकीत जगताप यांचे बहुमत असतानाही ऐन सभापती निवडी दिवशी माजी सभापती शिवाजी बंडगर यांनी बंडखोरी करून बागल गटात सामील झाले होते. त्यामुळे जगताप गटाची सत्ता गेली होती. या वेळी मात्र सर्वच गटांनी सामंजस्याची भूमिका घेत निवडणूक बिनविरोध केली आहे.

बाजार समितीवर स्थापनेपासून जगताप गटाचे वर्चस्व राहिले आहे. यामध्ये माजी आमदार (कै.) अण्णासाहेब जगताप १० वर्षे, माजी आमदार (कै.) नामदेवराव जगताप २३ वर्षे, तर माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी २९ वर्षे सभापती म्हणून काम पाहिले आहे. उपसभापतिपदासाठी संधी दिल्या जाणाऱ्या शैलजा मेहेर या जगताप गटाचे निष्ठावंत कार्यकर्ते बबन मेहेर यांच्या पत्नी आहेत. बबन मेहेर हे विकास सेवा सोसायटीच्या सचिवांचे नेते असून, त्यांनी गेली अनेक वर्षे माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्याबरोबर प्रामाणिकपणे काम केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT