अतिवृष्टी आणि महापुरामुळे राज्यातील 14 कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका 45 दिवस पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
बार्शी बाजार समिती निवडणुकीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली होती, मात्र आता ती नोव्हेंबरपासून पुन्हा होणार आहे.
या निवडणुकीत आमदार दिलीप सोपल आणि माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्यात थेट सामना अपेक्षित होता.
Solapur, 03 October : सोलापूर जिल्ह्यातील बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीसह राज्यातील तब्बल 14 कृषी उत्पन्न बाजार समितींच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. अतिवृष्टी आणि नद्या, ओढ्यांना आलेल्या महापुरामुळे निवडणुका घेणे सध्या जिकिरीचे ठरले असते, त्यामुळेच राज्याच्या सहकार, पणन आणि वस्त्रोउद्योग विभागाने या निवडणुकांना 45 दिवसांसाठी स्थगिती दिली आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांचा हिरमोड होऊ शकतो.
सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने राज्यातील १४ कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणूका (Bazar Samiti Election) ४५ दिवसांसाठी स्थगित केल्या आहेत. आहे त्या टप्प्यावर निवडणुका स्थगित करण्याचा आदेश २६ सप्टेंबर रोजी काढण्यात आलेला आहे. स्थगित झालेला हा टप्पा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे.
बार्शी कृषी उत्पन्न बाजार समिती (Barshi Bazar Samiti) संचालक मंडळ निवडणुकीसाठी २६ सप्टेंबरपासून उमेदवारी अर्जाची विक्री व स्वीकृती सुरू करण्यात आली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ३ ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. पहिल्या दिवशी (आज, ता. ०३ ऑक्टोबर) ३१ अर्जांची विक्री झाली असून एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केला नाही.
दरम्यान, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात उमेदवारी अर्जाच्या पहिल्या दिवसांपासून ही प्रक्रिया राबविली जाणार आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने दिलेल्या वेळापत्रकात आवश्यकता भासल्यास मतदान ९ नोव्हेबर रोजी, तर मतमोजणी १० नोव्हेंबरला होणार होती. बाजार समितीच्या १८ संचालकांसाठी ही निवडणूक होणार होती, या निवडणुकीसाठी ५ हजार २६० एवढे मतदार पात्र ठरविण्यात आले आहेत.
दरम्यान, बार्शी बाजार समितीसाठी आमदार दिलीप सोपल आणि माजी आमदार राजेंद्र राऊत या पारंपारिक विरोधकांमध्ये सामना होणार आहे, त्यामुळे तालुक्याचे राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघाले असते.
बार्शी विधानसभा निवडणुकीत राऊत आणि सोपल यांच्यात थेट लढाई होते, त्याच पद्धतीने आता बाजार समितीसाठीही या दोन्ही नेत्यांच्या समर्थकांनी जोरदार तयारी केली होती. मात्र, अतिवृष्टीमुळे राज्यातील १४ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका ४५ दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
प्रश्न 1 : बाजार समितीच्या निवडणुका किती दिवसांसाठी स्थगित झाल्या?
४५ दिवसांसाठी.
प्रश्न 2 : बार्शी बाजार समितीमध्ये किती संचालकांची निवड होणार आहे?
१८ संचालकांची.
प्रश्न 3 : किती मतदार पात्र ठरले आहेत?
५,२६० मतदार.
प्रश्न 4 : या निवडणुकीतील प्रमुख प्रतिस्पर्धी कोण?
आमदार दिलीप सोपल आणि माजी आमदार राजेंद्र राऊत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.