vishal Fate fraud case
vishal Fate fraud case  sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

बार्शीकरांना लुटणाऱ्या फटेच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांचे मोठे पाऊल!

सरकारनामा ब्यूरो

सोलापूर : बार्शी (barshi) शहरातील हजाराे नागरिकांना कोट्यवधींचा गंडा घालून फरार झालेला विशाल अंबादास फटे (vishal fate) याच्या गुन्ह्याची उकल करण्यासाठी सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या वतीने विशेष पोलिस पथकाची (एसआयटी) (SIT) स्थापना करण्यात आली आहे. या टीममध्ये पाच उच्च दर्जाचे अधिकारी असणार आहेत, ते या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाऊन तपास करतील, अशी माहिती सोलापूर पोलिसांनी दिली. (Establishment of SIT for investigation of fraud case in Barshi)

या पथकाचे तपास अधिकारी म्हणून आर्थिक गुन्हे शाखा सोलापूरचे पोलिस उपअधीक्षक संजय बोठे आहेत. पोलिस उपअधीक्षक विशाल हिरे, पोलिस निरीक्षक रामदास शेळके, पोलिस निरीक्षक नारायण मिसाळ, सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर उदार हे सदस्य आहेत. ही टीम या प्रकरणाचे धागेदोर शोधून काढणार आहे.

दरम्यान, या फसवणुकीत अनेक प्रतिष्ठांचा समावेश आहे. शासकीय अधिकाऱ्यांपासून राजकीय नेत्यांपर्यंत सर्वांचीच बोटे फटे प्रकरणात चांगलीच अडकली आहेत. सुरुवातीला त्यांनी जादा परतावा देत बार्शीकरांचा विश्वास जिंकत हा कोट्यवधींचा गंडा त्यांनी घातला आहे. या प्रकरणी शनिवारी रात्री विशाल फटे याच्या भावाला आणि वडिलांना अटक करण्यात आली आहे. स्वतः विशाल फटे हा पत्नीसह फरारी आहे.

वैभव अंबादास फटे आणि अंबादास गणपती फटे अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांना सध्या पोलिस कोठडीत ठेवण्यात आलेले आहे. विशाल अंबादास फटे, राधिका विशाल फटे, अलका अंबादास फटे अद्याप पोलिसांना सापडले नाहीत. दीपक बाबासाहेब अंबारे यांनी फिर्याद दाखल केली होती. ही घटना 2019 पासून 9 जानेवारी 2021 दरम्यान घडली.

फटे याने सध्या १८ कोटी रुपयांची फसवणूक केली असल्याचे दिसत असले तरी हा आकडा मोठा असल्याचे सांगण्यात येत आहे. गुन्ह्याची वाढती व्याप्ती लक्षात घेऊन सोलापूर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष पथकाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे, त्या पथकात पाच जणांचा समावेश असणार आहे. या प्रकरणी आतापर्यंत ७६ जणांनी तक्रार दिली आहे, त्यानुसार फसवणुकीचा आकडा हा १८ कोटीपर्यंत पोचला आहे, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

विशाल फटे याने स्थापन केलेल्या तीन कंपन्यांमधून व्यवहार करुन शेअर्स मार्केटमध्ये शेअर्स घेण्याकरिता मोठ्या रकमा कपन्यांच्या खातेवर घेत असे. गुंतवणूकदारांना आकर्षक परतावा देण्याचे आमिष दाखवीत होता. आरटीजीएस, धनादेशद्वारे तसेच रोखही रक्कम स्वीकारत होता. बार्शी शहर व परिसरातील नागरिकांना ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवून दररोज दोन टक्के नफा मिळवून देण्याचे आमिष त्याने दाखवले होते. आमिषाला बळी पडून नातेवाइकांकडून, हातउसने पैसे घेऊन अनेकांनी विशाल फटे याच्या तीन कंपन्यांच्या खात्यामध्ये गुंतवणूक केली होती.

दरम्यान, फटेच्या कंपन्यांत पैसे गुंतविणारे आणि फसवणुकीची पहिली तक्रार दाखल करणारे दीपक बाबासाहेब अंबारे (वय 37, बार्शी) यांनी सांगितले की, शेअर मार्केटमधून मिळालेला फायदा तो आम्हाला दाखवित होता. त्याचा फायदा पाहून मी प्रथम 70 हजार रुपये गुंतविले होते. त्यातून त्याने मला बऱ्यापैकी फायदा करुन दिला. त्यामुळे माझा विश्वास बसला. विशाल फटे याने शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याकरिता विशालका कन्सल्टन्सी, अलका शेअर्स सर्विसेस, जे.एम. फायनान्शिअल सर्व्हिसेस या कंपन्या काढल्या होत्या. वडील अंबादास फटे, भाऊ वैभव फटे तसेच आई अलका फटे यांच्या नावे त्याने त्या कंपन्या चालू केल्या होत्या. या कंपन्यामार्फत त्याने वेगवेगळया कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवणुकीसाठी बार्शी तसेच इतर भागातील नागरिकांकडून मोठया रक्कमा घेतल्या. या रकमा त्याने त्याच्या कंपन्यांच्या खात्यामध्ये घेतल्या. त्याकरीता गुंतवणूकदारांना तो आकर्षक परतावा देण्याचे आमिष दाखवित होता. तो काही लोकांकडून आरटीजीएस किंवा चेकमार्फत वा रोख रक्कम घेत होता. मात्र, त्याचे बिंग लवकरच फुटले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT