Bharat Bhalke News Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Bharat Bhalke Death Anniversary : भारत भालके...सिर्फ नाम ही काफी है; मृत्यूच्या तीन वर्षांनंतरही मतदारसंघात क्रेझ कायम!

हुकूम मुलाणी

Mangalvedha News : आमदार भारतनाना भालके...सिर्फ नाम ही काफी है! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून तीन वेगवेगळ्या पक्षांच्या चिन्हांवर लढून हॅट्‌ट्रिक करणारे भारत भालके यांची मतदारसंघात आजही क्रेझ कायम असल्याचे दिसून येते. भालके यांच्या मृत्यूला आज (ता. 28 नोव्हेंबर) तीन वर्षे पूर्ण झाली, पण मृत्यूच्या तीन वर्षांनंतरही भालके नावाचा करिश्मा मतदारसंघात असल्याचे दिसून येते. (Even after three years of Bharat Bhalke's death, the craze continues in constituency)

पंढरपूर-मंगळवेढ्याचे आमदार भारत भालके यांच्या निधनाला आज तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. मंगळवेढा तालुक्याच्या ग्रामीण भागात त्यांच्या प्रतिमेची पूजा करून आदरांजली वाहिली जात आहे. त्यांनी केलेल्या कामाची जाण ठेवून आजही त्यांची आठवण मतदारसंघातील लोक ठेवत आहेत. त्याचा प्रत्यय आज स्मृतिदिनी येत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर मंगळवेढा तालुका पंढरपूरशी जोडला गेला. ‘रिडालोस’मधून 2009 मध्ये या मतदारसंघाचे पहिले आमदार (स्व.) भारत भालके झाले. त्यावेळी त्यांनी मातब्बर नेते आणि माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचा दणदणीत मतांनी पराभव करत ‘जायंट किलर’ ठरले होते.

त्यानंतर 2014 मध्ये काँग्रेस पक्षाकडून, तर 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अशा तीन वेगवेगळ्या पक्षांमधून भारत भालके यांनी आमदारकी जिंकली होती. मतदारसंघातील जनता आणि त्यांच्या प्रश्नासोबत राहून आवाज उठवण्याची भालकेंची खासियत होती.

सोलापूर जिल्ह्याच्या प्रश्नावर (स्व.) गणपतराव देशमुख आणि (स्व.) भारत भालके सातत्याने विधानसभेत आवाज उठवत राहिले. त्याचा फायदा या मतदारसंघातील जनतेला झाला. रखडलेल्या पाणीप्रश्नावर ‘माझा शाळेच्या अभ्यासापेक्षा पाण्याचा अभ्यास अधिक झाला,’ असे ते अडथळा करणाऱ्या अधिकाऱ्याला खडसावत होते. माझ्यावरचा राजकीय राग दुष्काळी जनतेवर काढू नका, अशी भावनिक सादही ते सरकारला घालायचे.

राईनपाडा येथे झालेल्या हत्याकांडातील खवे कुटुंबीयातील मृतांच्या वारसाला प्रत्येकी 10 लाखांची मदत मिळवून दिली. महात्मा बसवेश्वर स्मारक व पाण्यासाठी विधिमंडळात अनेकदा आवाज उठवला. बोलायला कमी वेळ दिला म्हणून तत्कालीन विधानसभा अध्यक्ष नाना पाटोले यांच्याकडून त्यांनी भांडून वाढीव वेळ मागून घेतला होता.

दुष्काळी तालुक्यांसाठी स्वतंत्र शासन परिपत्रक काढायला लावले. तालुक्यातील शेतीची व्यथा दाखवण्यासाठी तत्कालीन कृषिमंत्री शरद पवार यांना लेडवे चिंचाळे येथे बोलावून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली. लोकवर्गणीची अट रद्द करून पिण्याच्या पाण्यासाठी भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना राबवली. पीकविमा, गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून दिली.

ज्या गोरगरीब आपत्तीग्रस्त लाभार्थ्यांना शासकीय मदत मिळत नाही. अशा लोकांना स्वतःहून आर्थिक मदत देण्याची भूमिका पार पाडली. रक्षाबंधन आणि दुष्काळात दिवाळीची भेट देऊन जनतेशी संपर्क ठेवला. राजकीय विरोधकांनाही निवडणुकीनंतर बोलावून घेत ‘झाले गेले विसरून जाऊ, तालुक्याच्या विकासासाठी एकत्र येऊ’ असा आग्रह ते करायचे. अशा भालके यांची 11 वर्षांची राजकीय कारकीर्द मंगळवेढा तालुक्यातील जनतेच्या मनात कायम घर करून राहिली आहे.

‘असा नेता पुन्हा मिळणे नाही’

आमदार (स्व.) भारत भालके यांच्यासोबत सुरुवातीपासून राहिलो आहे, त्यांनी मंगळवेढा तालुक्यातील जनतेच्या प्रश्नासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातला. मतदारसंघातील प्रश्नासाठी ते शेवटपर्यंत लढत राहिले. रुग्णालयातील बेडवर असतानासुद्धा त्यांनी पाणीप्रश्नासाठी जलसंपदा मंत्र्यांना भेटा, असा सांगणारा नेता तालुक्याला पुन्हा मिळणे नाही, अशी आठवण मंगळवेढा उपसा सिंचन योजनेतील आंदोलक पांडुरंग चौगुले यांनी सांगितली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT