Patan, 22 March : पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर महायुतीत अन्याय होत असेल, तर लोकनेते (स्व.) बाळासाहेब देसाई यांनी ज्या सन्मानाने मंत्रिपदाच्या खुर्चीवर लाथ मारली, तोच लोकनेत्यांचा वारसा जपत स्वाभिमानी बाणा दाखवत देसाई यांनीही आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी मंत्री शंभूराज देसाई यांना डिवचले.
सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला धोबीपछाड देत भाजपने बाजी मारली. त्यानंतर पालकमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी पोलिस प्रशासनावर भाजपचे घरगडी म्हणत आरोप केले होते. त्याला पाटणकर यांनी उत्तर दिले आहे.
सत्यजितसिंह पाटणकर (Satyajeet Patankar) म्हणाले, पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आपल्या मंत्रिपदाच्या काळात पाटण तालुका आणि सातारा जिल्ह्यात प्रशासनावर दबाव टाकून स्थानिकांना त्रास देण्याचा प्रयत्न केला. आता तेच प्रशासन त्यांच्यावर उलटल्याचा आरोप ते करीत आहेत.
पालकमंत्र्यांनी जे स्वतः केले, तेच आता त्यांना फेडण्याची वेळ पोलिसांच्या निःष्पक्ष कामामुळे त्यांच्यावर आल्याने नियतीचा फेरा आता उलटा फिरला आहे. सातारा जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेत पोलिसांना घरगडी म्हणणारे हेच पालकमंत्री स्वतःच्या कुटुंबीयांना कोणत्या अधिकाराने पोलिस सुरक्षा देतात, याचा त्यांनी खुलासा करावा, असे आव्हान पाटणकर यांनी केले आहे.
पाटणकर म्हणाले, मागील पाच वर्षांपासून पालकमंत्री देसाई यांनी पाटणमधीलच नव्हे; तर जिल्ह्यात प्रामुख्याने पोलिस, महसूल व अन्य विभागातील अधिकाऱ्यांवर दबाव टाकून स्थानिक जनता, विरोधकांना खोट्या गुन्ह्यात अडकवून वेठीस धरण्याचे प्रकार केल्याचे समजते. बैठका, जाहीर सभांमध्ये प्रशासकीय, पोलिस अधिकाऱ्यांना अपमानास्पद वागणूक दिली, त्याचे सोशल मीडियावर जाहीर वाभाडेही निघाले. तरीही त्याची कोणतीही तमा त्यांनी बाळगली नव्हती. आता तोच डाव त्यांच्यावर उलटल्यानंतर ते प्रशासन व पोलिसांवर बेछूट आरोप करत आहेत.
शंभूराज देसाई यांनी भारतीय जनता पक्षाविरुद्ध तक्रारी करण्यापेक्षा त्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा. अन्यथा सत्तेसाठी हीच राजकीय अपरिहार्यता आहे, हे देखील जनतेसमोर उघड झाल्याशिवाय राहणार नाही. जिल्हा परिषद पदाधिकारी निवडीत भाजपकडून अन्याय झाल्याचा मंत्री देसाई आरोप करत असतील तर मग शिवसेना फोडताना अग्रक्रमावर असणाऱ्या या मंडळींनी त्या काळात ज्या पद्धतीने पक्ष आणि पक्ष नेतृत्वाशी गद्दारी केली, त्याचेच परिणाम आता नियती त्यांना भोगायला लावत आहे, असा टोलाही पाटणकर यांनी देसाई यांना लगावला.
आपल्या आजूबाजूला पोलिस प्रशासनाला घरगडी बनवून स्थानिक प्रामाणिक, विरोधी कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करणे व आपल्या बगलबच्चांवर गंभीर गुन्हे दाखल असूनही पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करू नये म्हणून दबाव आणणे, असे प्रकार यापूर्वीही अनेकदा घडले आहेत, असे पाटणकर यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.