Hasan Mushrif- Samarjeet Ghatge News  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur Water Distribution : कोल्हापूरच्या पाणीप्रश्नासाठी कट्टर विरोधकही 'एकत्र' येणार?

सरकारनामा ब्यूरो

Kolhapur News : कोल्हापूरच्या राजकारणात एकमेकांचे कट्टर विरोधक मानले जाणारे मंत्री हसन मुश्रीफ आणि भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष समरजीत घाटगे पहिल्यांदाच एकत्र येणार आहेत. इचलकरंजी शहराला कागल तालुक्यातील दूधगंगा नदीचे पाणी देण्याच्या योजनेला शासनाने मंजुरी दिली. पण या योजनेला दूधगंगा नदी काठावरील गावातील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध केला आहे, यासाठी हे मुश्रीफ आणि घाटगे पहिल्यांदाच एकत्र येणार असल्याचे बोलले जात आहे. पण दुसरीकडे, इचलकरंजी आणि कागलमध्ये पाणीप्रश्न पेटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

राज्यातील सर्वात सुपीक आणि सधन जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाणीदार कोल्हापूर जिल्ह्यातच पाणीप्रश्न पेटला. इचलकरंजीला दूधगंगा नदीचे पाणी देण्यास कागल तालुक्याने विरोध केला आहे. यामुळे इचकरंजीकरांची मोठी अडचण झाली आहे. शासनाने 160 कोटी रुपये मंजूर केले आहेत, मात्र कागलकरांचा विरोध बघता या योजनेचे भवितव्य अंधारात दिसत आहे. आज वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष समरजीतराजे घाटगे हे एकमेकांचे विरोधक पाणी नेण्यास विरोध करण्यासाठी एकत्र येऊन जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार आहेत.

काय आहे इचकरंजीची पाणी समस्या

महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इचलकरंजी शहराचा विस्तार खूप मोठा आहे पण पिण्याच्या पाण्यासाठी या शहराला पंचगंगा नदीवर अवलंबून राहावं लागत होतं. परंतु, पंचगंगेची प्रदूषणाची पातळी वाढत असल्याने इचलकरंजीला या प्रदूषणाचा अनेकदा फटका बसला आहे. या पाण्यामुळे इचलकरंजीतील काही जणांनी आपले प्राणही गमावले आहेत. त्यामुळे इचलकरंजीची पाण्याची तहान भागवण्यासाठी पंचगंगा सोडून दुसऱ्या कोणत्याही नदीतून पाणी मिळावे, यासाठी प्रयत्न झाले.

काही वर्षांपूर्वी वारणा नदीतून पाणी आणावे, अशा प्रकारची योजना आखण्यात आली. मात्र वारणा काठावरच्या नागरिकांनी विरोध केल्याने ही योजना बारगळली. त्यानंतर कागल तालुक्यातील सुळकुट येथून दूधगंगा नदीतून पाणी आणावे, अशा प्रकारची योजना आणण्यात आली. या योजनेला 2022 ला मंजुरी मिळाली 160 कोटी रुपये खर्च करून इचलकरंजीला पाणी देण्याची ही महत्त्वकांक्षी योजना आहे, मात्र याही योजनेला आता दूधगंगा काठावरच्या शेतकऱ्यांनी विरोध सुरू केला आहे.

दूधगंगा काठावरच्या शेतकऱ्यांच्या विरोधाचे कारण काय?

दूधगंगा नदी मुळे कागल तालुक्यातील बहुतांश शेती पिकते. या नदीतून शेतीबरोबरच कागल शहर आणि कोल्हापूरचे गांधीनगर या ठिकाणी पिण्याच्या पाणी योजना आहेत आता याच नदीतून इचलकरंजीला पाणी दिल्यास आपल्याला शेतीला पाणी कमी पडेल अशी भीती या शेतकऱ्यांच्या मनात आहे त्यामुळे दूधगंगा बचाव समिती स्थापन करून या शेतकऱ्यांनी या योजनेला विरोध सुरू केला आहे.

एकीकडे इचलकरंजी विभागातील नेत्यांचा या योजनेला आग्रह आहे. मात्र कागल तालुक्यातून या योजनेला विरोध होत आहे. कागलचे आमदार आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष समरजीत सिंह घाटगे या सर्वच गटांनी सुळकूट योजनेला विरोध केला आहे. दूधगंगेतील एकही थेंब पाणी देणार नाही, अशी भूमिका या सगळ्या नेत्यांनी घेतली आहे. त्यामुळे ही योजना होणार का आणि इचलकरंजीला पाणी मिळणार का हा प्रश्न निर्माण झाला आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT