EVM Machine -Voting Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur Election 2025 : सोलापुरात मोहोळ, सांगोला, कुर्डूवाडी, अकलूज, बार्शी, अक्कलकोटमध्ये EVM मध्ये बिघाड; मशीन बदलून मतदानाला पुन्हा सुरुवात

EVM Machine Problem : सोलापूर जिल्ह्यातील दहा नगरपरिषदांच्या मतदानाला सुरुवात होताच काही ठिकाणी ईव्हीएममध्ये बिघाड झाला. मशीन बदलून मतदान पुन्हा सुरळीत सुरू करण्यात आले आहे.

Vijaykumar Dudhale
  1. सोलापूर जिल्ह्यातील १० नगरपरिषदांत मतदानाला सकाळी साडेसातपासून सुरुवात झाली, मात्र पहिल्याच तासात अनेक ठिकाणी ईव्हीएममध्ये बिघाड झाला.

  2. मोहोळ, कुर्डुवाडी, सांगोला, अकलूज, बार्शी आणि अक्कलकोट येथे बॅलेट युनिट व कंट्रोल युनिट बदलून मतदान प्रक्रिया पुन्हा सुरळीत करण्यात आली.

  3. ईव्हीएम कंपनीचे अभियंते व्हिडिओ कॉलद्वारे केंद्राध्यक्षांना मार्गदर्शन करत होते, ज्यामुळे बिघाड दूर करून मतदान सुरळीत राखण्यात आले.

Solapur, 02 December : सोलापूर जिल्ह्यातील 10 नगरपरिषदांसाठी मंगळवारी (ता. 02 डिसेंबर) सकाळी साडेसातपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. मात्र, पहिल्या तासभरातच मोहोळ, कुर्डुवाडी, सांगोला, अकलूज, बार्शी आणि अक्कलकोट येथील ईव्हीएममध्ये बिघाड झाला, त्यामुळे त्या मशीन बदलून मतदानाची प्रक्रिया पुन्हा सुरळीत सुरू करण्यात आली आहे.

सोलापूर जिल्ह्यातील अकरा नगरपरिषदा (Nagar Parishad) आणि एक नगरपंचायतीची निवडणूक जाहीर झाल्या होत्या. मात्र, मंगळवेढा नगरपरिषद निवडणुकीला स्थगिती देण्यात आली आहे, तर अनगर नगरपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाल्यात जमा आहे. पण अनगरमधील अपिलावरील सुनावणीचा निकाल वेळेत न आल्याने अनगरमधील निवडणुकीला स्थगिती देण्यात आलेली आहे.

एक नगर परिषद वगळता इतर दहा नगरपरिषदांसाठी सुमारे ४९९ केंद्रावर आज सकाळी साडेसातपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. काही वेळ मतदान झाल्यानंतर मोहोळ (Mohol) आणि कुर्डुवाडीतील प्रत्येकी दोन केंद्रांवरील मशिनला कनेक्शनचा अडथळा निर्माण झाला, त्यामुळे तेथील मशीन बदलून मतदान प्रक्रिया सुरळीत करण्यात आली. काही मतदान केंद्रांवरील मशिनची बटणे दबत नव्हती. त्यामुळे तेथील बॅलेट युनिट बदलण्यात आले.

जिल्ह्यातील अकलूज, अक्कलकोट, बार्शी आणि सांगोला येथील सात मतदान केंद्रांवरील बॅलेट युनिट बदलून दुसरे लावण्यात आले आहेत. काही मतदान यंत्रांची बटण दाबली जात नव्हती. काही मशीनची बटणं आतमध्येच अडकून राहत होती, तर काही मतदान यंत्रांची बटणं दबली जात नव्हती, त्यामुळे मतदारांना मतदान करताना अडचणी येत होत्या.

सांगोला येथील विद्या मंदिर प्रशाला, जिल्हा परिषद शाळा धनगर गल्ली, जिल्हा परिषद शाळा भोपळे रोड या मतदान केंद्रांवरील मशिनची बटणे दबली जात नव्हती, त्यामुळे सांगोल्यातील तीनही मशिन बदलण्यात आलेल्या आहेत.

दरम्यान, ‘ईव्हीएम’ कंपनीच्या अभियंत्यांच्या सूचनांनुसार तेथील मशीन (बीयू-सीयू) बदलण्यात आले आहे. ज्या ठिकाणी अडचणी आल्या, तेथील मतदान केंद्राध्यक्षांशी त्या दोन अभियंत्यांनी व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधून मार्गदर्शन करण्यात आले आहे, त्यामुळे मतदान यंत्रातील बिघाड या निवडणुकीच्या वेळी बघायला मिळाले.

1) कोणत्या ठिकाणी ईव्हीएममध्ये बिघाड झाला?

मोहोळ, कुर्डुवाडी, सांगोला, अकलूज, बार्शी आणि अक्कलकोट येथे बिघाड नोंदवला गेला.

2) बिघाडाचे स्वरूप काय होते?

काही मशीनची बटणे दाबली जात नव्हती, बटणे आतमध्ये अडकत होती किंवा कनेक्शनचा अडथळा निर्माण होत होता.

3) मतदान प्रक्रिया कशी सुरळीत करण्यात आली?

बिघाडलेली बॅलेट युनिट व कंट्रोल युनिट बदलून नवीन मशीन बसवण्यात आली.

4) मशीन दुरुस्तीला कोण मार्गदर्शन करत होते?

‘ईव्हीएम’ कंपनीचे अभियंते व्हिडिओ कॉलद्वारे मतदान केंद्राध्यक्षांना मार्गदर्शन करत होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT