Dharashiv, 02 March : धाराशिव जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला बहुमत न मिळाल्याने निर्माण झालेला सत्ता स्थापनेचा पेच सुटण्याच्या मार्गावर आहे. मात्र, शिवसेनेत मोठ्या घडामोडी घडत असून आमदार तानाजी सावंत गटाला वगळून शिवसेनेला सोबत घेऊन सत्तास्थापनेच्या हालचाली धाराशिवमध्ये सुरू आहेत. पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकांना सावंत गट अनुपस्थित होता. पण, त्यातील एका बैठकीला सावंतांविरोधात बंड पुकारणारे त्यांचे पुतणे धनंजय सावंत हे उपस्थित होते, त्यामुळे शिवसेनेत आमदार सावंत एकटे पडले आहेत का, अशी चर्चा रंगू लागली आहे.
दरम्यान, नव्या समीकरणांमध्ये सावंत यांना वगळून माजी खासदार रवींद्र गायकवाड आणि ज्ञानराज चौगुले यांना सोबत घेऊन सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू असल्याचे पुढे आले आहे. विशेष म्हणजे जिल्हा परिषद अध्यक्षपदी भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील, तर उपाध्यक्षपदी रवींद्र गायकवाड यांच्या पत्नी असे समीकरण ठरल्याची माहिती आहे, त्यामुळे धाराशिवमधील (Dharashiv) सत्तास्थापनेची व्यूहरचना अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले जात आहे.
धाराशिव जिल्हा परिषदेत एकूण 55 जागांपैकी भाजपने (BJP) 18, शिवसेना शिंदे गटाने 15, शिवसेना ठाकरे गटाने 8, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने 6, अपक्षांनी 4, काँग्रेसने 3, तर समाजवादी पक्षाने 1 जागा जिंकली आहे. त्यामुळे बहुमताचा २९ हा आकडा कोणत्याच पक्षाकडे नाही. मात्र महायुतीमधील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने ३९ जागा आहेत. मात्र, स्थानिक राजकारणामुळे शिवसेना आणि भाजपमध्ये संघर्ष दिसून येत आहे.
गेल्या काही दिवसांपासून आमदार तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांना दूर ठेवत शिवसेना आणि भाजपमध्ये सत्ता स्थापनेच्या घडामोडी सुरू आहेत. पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या बैठकीला सावंत गटाची गैरहजेरी दिसून आली होती. विशेष म्हणजे आमदार तानाजी सावंत यांच्याविरोधात बंड पुकारणारे जिल्हा परिषद सदस्य धनंजय सावंत यांनी सरनाईकांच्या बैठकीला हजेरी लावली होती. त्यामुळे धाराशिवमध्ये चर्चेला उधाण आले आहे.
प्रताप सरनाईक यांनी जिल्हा परिषद सत्ता स्थापनेबाबत घेतलेल्या दोन्ही बैठकांना आमदार तानाजी सावंत हे आणि त्यांच्या गटाने अनुपस्थिती दर्शविली होती. विशेष म्हणजे महायुतीमधील आपल्याच सहकारी पक्षाच्या उमेदवारांचा पराभव करण्यासाठी विरोधकांना रसद पुरविणाऱ्या तानाजी सावंत यांचा गट आपल्यासोबत नको, अशी भूमिका पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोचविण्यात आल्याची माहिती आहे. दुसरीकडे सावंतांच्या पुतण्याने शिवसेनेच्या बैठकीला हजेरी लावल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
दरम्यान, सावंत गटाला वगळून धाराशिवमध्ये सत्ता स्थापनेचा प्रयत्न सुरू होत असल्याचे पाहून आमदार तानाजी सावंत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यानंतरही सावंत यांना वगळून धाराशिवमध्ये भाजपसोबत जाण्याच्या हालचाली सुरू आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.