Prithviraj Chavan- Balasaheb Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara Politics : बाळासाहेबांच्या मतदारसंघात पृथ्वीराजबाबांचे लक्ष; काँग्रेसचे बळकटीकरण कोणाला धक्का देणार?

Karad Uttar Congress news : पृथ्वीराज चव्हाणांच्या सूचनेनुसार कराड उत्तरमध्ये काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.

Vishal Patil

Satara News : सातारा हा वर्षानुवर्षे काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे. परंतु, राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर जिल्ह्याने शरद पवारांना साथ दिली आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण मात्र काँग्रेस पक्षवाढीसाठी प्रयत्न करताना दिसून येत आहेत. आता त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार बाळासाहेब पाटील यांच्या कराड उत्तर मतदारसंघात लक्ष घातले आहे. चव्हाण यांच्या सूचनेनुसार काँग्रेसने कराड उत्तरची 60 पदाधिकाऱ्यांची जंबो कार्यकारिणी जाहीर केली आहे. त्यामुळे चव्हाणांनी घातलेले लक्ष कोणाला अडचणीत आणणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे (Executive committee of 60 office bearers of Karad Uttar announced)

सातारा जिल्ह्यात केवळ कराड दक्षिण हा एकमेव विधानसभा मतदार संघ काॅंग्रेसच्या ताब्यात आहे. जिल्ह्यातील 8 विधासभा मतदारसंघापैकी केवळ कराड दक्षिणेत ताकद मोठी असून आता कराड उत्तरेतही ताकद वाढविण्याच्या इरादा आहे. म्हणून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या सूचनेवरून तसेच सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांच्या मान्यतेने कराड उत्तर ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष निवासराव थोरात यांच्या शिफारशीनुसार कराड उत्तरच्या पदाधिकाऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या कार्यकारिणीमध्ये कराड उत्तरमध्ये आजपर्यंत एकनिष्ठेने कार्यरत असलेले सर्व ज्येष्ठ व युवक कार्यकर्त्यांची मोट बांधण्यात अध्यक्ष निवासराव थोरात यांना यश आले आहे. कराड उत्तरच्या अध्यक्षांची निवड झाल्यानंतर काँग्रेस पक्षाची कार्यकारिणी प्रसिद्ध होणे प्रतिक्षेत होते, त्यानुसार कराड उत्तरमधील साडेचार जिल्हा परिषद गटातील तसेच सर्व पंचायत समिती गणातील काँग्रेस कार्यकर्त्यांचा कार्यकारिणीत समावेश करण्यात आला आहे.

कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काॅंग्रेसचे (शरद पवार गट) आमदार बाळासाहेब पाटील यांनी सलग पाचवेळा प्रतिनिधीत्व केले आहेत. कराड उत्तर मतदारसंघात काॅंग्रेसची ताकदही निर्णायक मते मिळवणारी असताना आघाडी धर्म पाळला गेला आहे. या मतदारसंघात अनेक ग्रामपंचायती, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेत उमेदवार निवडूनही आले आहेत.

कराड उत्तरेत काॅंग्रेसचे धैर्यशील कदम हे भाजपमध्ये गेले असून ते पक्षाचे जिल्हाध्यक्ष बनले आहेत. भाजपचे माजी जिल्हा परिषद सदस्य मनोज घोरपडे यांची मोठी ताकद असून विधानसभेला चांगली मते मिळाली होती. कराड उत्तरेत विधानसभेला तिरंगी लढत पाहायला मिळते. यामध्ये आमदार बाळासाहेब पाटील, मनोज घोरपडे आणि धैर्यशील कदम हे उमेदवार असतात.

काॅंग्रेसचे बळकटीकरण कोणाला धक्का देणार 

सध्याच्या परिस्थितीत मनोज घोरपडे आणि धैर्यशील कदम हे दोघेही भाजपमध्ये आहेत. अशा परिस्थितीत काॅंग्रेसने आपली ताकद वाढविण्यास सुरुवात केली आहे. आगामी काळात काॅंग्रेस उमेदवार देणार की कोणाचे उट्टे काढणार, हे पाहावे लागेल. कराड उत्तरेतील भाजपचे कराड दक्षिणेतील काॅंग्रेसच्या नेत्यांशी चांगलेच जमते. आमदार बाळासाहेब पाटील आणि काॅंग्रेसचे कराड दक्षिणचे नेते ॲड. उदयसिंह पाटील यांचे वैर जगजाहीर आहे. त्यामुळे काॅंग्रेसचे बळकटीकरण स्वतःसाठी की दुसऱ्याला धक्का देण्यासाठी हे काळच ठरवेल.

Edited By : Vijay Dudhale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT