Western Maharashtra-Congress Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Western Maharashtra Result : महाराष्ट्राला सहा मुख्यमंत्री देणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातून काँग्रेस हद्दपार; केवळ एका जागेवर विजय, पाच जिल्ह्यांत भोपळा!

Congress downfall in Western Maharashtra elections: पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, कोल्हापूर, पुणे आणि सातारा या जिल्ह्यातून काँग्रेस पक्षाचा एकही आमदार निवडून आलेला नाही. यातील कोल्हापूर वगळता सोलापूर, पुणे आणि सातारा जिल्ह्याने महाराष्ट्राला काँग्रेसच्या माध्यमातून मुख्यमंत्री दिलेले आहेत.

Vijaykumar Dudhale

Solapur, 25 November : महाराष्ट्राला सहा मुख्यमंत्री देणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातून काँग्रेस पक्ष हद्दपार झाला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील 58 पैकी फक्त एका जागेवर काँग्रेस पक्षाला विजय मिळविता आलेला आहे. एकेकाळी संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणाची सूत्रे हलविणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाच्या अनेक मातब्बर नेत्यांना पराभवाची धूळ चाखावी लागली आहे, अनेकांचे गड उद्‌ध्वस्त झाले आहेत, त्यामुळे या भागातून काँग्रेस पक्ष हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे.

पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि पुणे या पाच जिल्ह्यांचा समावेश होतो. या पाच जिल्ह्यांत मिळून विधानसभेच्या तब्बल 58 जागा आहेत. त्या पैकी तब्बल 44 जागांवर महायुतीला यश मिळाले असून 10 जागा मिळाल्या आहेत. अपक्ष व इतरांना चार जागा मिळाल्या आहेत. यामध्ये काँग्रेस पक्षाला (Congress) फक्त एका जागेवर विजय मिळविता आलेला आहे.

पश्चिम महाराष्ट्राने आतापर्यंत महाराष्ट्राला सहा मुख्यमंत्री दिले आहेत. यात यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शरद पवार, बाबासाहेब भोसले (बाबासाहेब भोसले हे मुंबईच्या कुर्ला उपनगर भागातील नेहरूनगर मतदारसंघातून निवडून आले असले तरी ते मूळचे सातारा जिल्ह्यातील होते), सुशीलकुमार शिंदे आणि पृथ्वीराज चव्हाण या दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. यातील शरद पवार आणि वसंतदादा पाटील यांनी एकापेक्षा अधिक वेळा मुख्यमंत्रिपद भूषविले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात नेतृत्वाची फॅक्टरी देणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष शेवटची घटका मोजत आहे.

सोलापूर, कोल्हापूर, पुणे, सातारा या जिल्ह्यातून काँग्रेस पक्षाचा हात हद्दपार झाल्यातच जमा आहे. खरं लोकसभा निवडणुकीच्या नंतर या भागात काँग्रेस आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी स्ट्राँग वाटत होती. मात्र, विधानसभा पक्षाची पुरती धूळदाण उडाली आहे. केवळ सांगली जिल्ह्यातील पलूस कडेगाव या मतदारसंघात डॉ. विश्वजित कदम हे पश्चिम महाराष्ट्रातून एकटचे निवडून आलेले काँग्रेस उमेदवार आहेत.

पश्चिम महाराष्ट्रात अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाची चव चाखावी लागली आहे. यामध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा समावेश आहे. तसेच, माजी काँग्रेसचे एकनिष्ठ पाईक म्हणून ओळख असलेले संग्राम थोपटे, रवींद्र धंगेकर, विक्रमसिंह सावंत, ऋतुराज पाटील, राजू आवाळे या विद्यमान आमदारांचा समावेश आहे. तसेच, माजी मंत्री सिद्धराम म्हेत्रे यांनाही पराभवाचा सामना करावा लागला आहे.

लोकसभा निवडणुकीत चांगले यश मिळविणारे आमदार सतेज पाटील यांनाही कोल्हापुरात काँग्रेसचे आमदार राखता आलेले नाहीत. त्यांना आपले सख्खे पुतणे ऋतुराज पाटील यांनाही निवडून आणता आलेले नाही. त्यामुळे काँग्रेसला पश्चिम महाराष्ट्रात मोठा धक्का बसला आहे. गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी पक्षाला मोठे ऑपरेशन करावे लागणार आहे. मात्र, पक्ष नेतृत्वाची तशी इच्छा आहे की नाही, हे पाहावे लागणार आहे.

सर्वसामान्यांशी कनेक्ट तुटला

पश्चिम महाराष्ट्राच्या माध्यमातून संपूर्ण राज्याच्या राजकारणाची दिशा ठरविणाऱ्या काँग्रेसची बोलकिल्ल्यातच गलितगात्र अवस्था झाली आहे. त्याला या नेत्यांची सरंजमशाहीही तेवढीच कारणीभूत आहे. या नेत्यांचा सर्वसामान्य जनेतशी असलेला कनेक्ट तुटलेला आहे. याशिवाय बदलत्या राजकारणात या नेत्यांनी बदलाची तयारी दाखवलेली दिसून येत नाही, त्यातूनच पश्चिम महाराष्ट्रासारख्या बालेकिल्ल्यात काँग्रेस पक्षाची अवस्था अत्यंत केविलवाणी झाली आहे.

सोलापुरात सुसंवादाचा अभाव

सोलापूर जिल्ह्यात काँग्रेस आणि एकूणच महाविकास आघाडीची परिस्थिती चांगली होती. मात्र, काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वाने दाखवलेल्या अनास्थेमुळे पक्षाची वाताहात झाली आहे. महाविकास आघाडीत सुसंवाद ठेवून सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे यांना किमान तीन जागा सोलापूर निवडून आणता आल्या असता. मात्र, त्यासाठी कोणीही पुढाकार घेतल्याचे दिसून आलेले नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT