Farmers Protest Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Farmers Protest : विखेंच्या आश्वासनानंतरही प्रशासनाचा खोडा; जमिनीच्या मोबदल्यासाठी शेतकऱ्यांवर उपोषणाची वेळ

Sujay Vikhe Patil : जमिनीचा मोबदला देण्याचे आश्वासन सुजय विखे पाटील यांनी दिले होते.

Pradeep Pendhare

Nagar News : पाथर्डी तालुक्यातील भालगावातील महामार्गाच्या (महामार्ग क्रमांक ३६१ (एफ) आणि ७५२) कामात गेलेल्या जमिनींचा मोबदला मिळावा म्हणून शेतकऱ्यांनी बेमुदत उपोषण सुरू केले होते. अखेर लेखी आश्वासनानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी खासदार सुजय विखे पाटील यांनी जमिनींचा मोबदला दिला जाईल, असे आश्वासन दिले होते. परंतु प्रशासकीय पातळीवर कागदपत्रांची पुर्तता करून देखील कार्यवाही न झाल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत.

महामार्गात भालगाव आणि परिसरातील शेतकऱ्यांच्या (Farmers) जमिनी गेल्या आहेत. या जमिनींचा मोबदला अजून शेतकऱ्यांना मिळालेला नाही. हा मोबदला मिळावा यासाठी भालगाव येथील ग्रामस्थ आणि शेतकरी हे विभागीय प्रदूषण आयुक्त दिलीप खेडकर (Dilip Khedkar) यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले होते.

भालगाव परिसरातील शेतकर्‍यांच्या जमिनी महार्मागात गेल्या आहेत. या जमिनींचा मोबदला अजून मिळालेला नाही. प्रशासकीय अधिकारी आणि राजकीय नेत्यांचे मोबदल्याबाबत आश्वासन मिळतात. वर्ष उलटून गेले तरी देखील पैसे मिळालेले नाही. काही महिन्यांपूर्वी खासदार डॉ. सुजय विखे पाटील (Dr. Sujay Vikhe Patil) यांनी आम्हाला एक महिन्यात दोन्ही रस्त्यांच्या बांधकामात गेलेल्या जमिनींचा मोबदला दिला जाईल, असे आश्वासन दिले होते. त्यानंतर, प्रशासनाकडून आवश्यक कागदपत्रांसाठी नोटिसा बजावल्या होत्या. त्यानुसार सर्व शेतकऱ्यांनी कागदपत्रांची पूर्तता केली. परंतु, आजतागायत एकाही शेतकऱ्याला मोबदला मिळालेला नाही, असे शेतकऱ्यांनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सरकारकडून शेतकऱ्यांना, बळीराजा, लाखोंचा पोशिंदा, अन्नदाता असे संबोधले जाते. परंतु, त्यांच्या जमिनींचा हक्काचा मोबदला देण्यात टाळाटाळ केली जाते. गेल्या पाच वर्षांपासून आम्ही शासकीय पातळीवर प्रयत्न करत आहोत. थातूरमातूर उत्तरे देऊन आमची बोळवण केली जाते. उपविभागीय कार्यालयाकडे पाठपुरावा करायला हवा म्हणून आम्ही उपोषणास बसलो आहोत. हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागला नाही तर आमच्या गावासह पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना सोबत घेऊन अन्य मार्गांनी आंदोलने केली जातील. शेतकऱ्यांचे रखडलेले पैसे हे व्याजासकट शेतकऱ्यांना द्यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे दिलीप खेडकर यांनी केली आहे.

जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केलेली आहे. येत्या आठ दिवसांत मोबदला मिळून उर्वरीत शेतकऱ्यांची कागदपत्रे आल्यावर त्यांनाही लवकरात लवकर मोबदला मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे उपविभागीय अधिकारी प्रसाद मते यांनी सांगितले. त्यांच्या लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आले. उद्धव खेडकर, अंकुश कासुळे, बाबासाहेब खेडकर, संजय बेद्रे, सावता बनसोडे, बाजीराव सुपेकर, भागवत कुटे, उत्तम बनसोडे, बापुराव सुपेकर, सुखदेव सुपेकर, ज्ञानोबा खेडकर, विठ्ठल बनसोडे, भीमराव खेडकर, अश्रू सुपेकर, कचरू सुपेकर, राजेंद्र सुपेकर, जगन्नाथ बनसोडे, विश्वनाथ खेडकर, नवनाथ बनसोडे आदीसह शेतकऱ्यांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.

(Edited By - Rajanand More)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT