Kolhapur Political News : राष्ट्रवादी अजित पवार Ajit Pawar गटाचे प्रदेशाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी महायुतीची साथ सोडली. त्यानंतर त्यांनी लगेच महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराजांना पाठिंबा जाहीर केला. त्यांच्यासाठी रविवारी (ता. 14) मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यासाठी ए. वाय. पाटील यांचे कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. पाटील काँग्रेसच्या उमेदवारासाठी ताकद लावणार असल्याचे जाहीर करत आगामी विधानसभेची बेरीज केली. आता मात्र तोच मेळावा पाटलांना भोवला आहे. आचरसंहितेचे उल्लंघन करत विनापरवाना मेळावा घेतल्याने ए. वाय. पाटील यांच्यासह 40 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती Shahu Chhatrapati यांना समर्थन देण्यासाठी रविवारी ए. वाय. पाटील आणि कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. मात्र मेळाव्यासाठी कोणत्याही प्रकारची परवानगी काढली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्यासह 40 जणांवर करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पुईखडी येथील एका मंगल कार्यालयात रविवारी दुपारी मेळावा झाला होता. याबाबत करवीर पोलिस ठाण्यातील हवालदार अविनाश भिकाजी पोवार यांनी फिर्याद दिली.
मेळाव्यानंतर शहरातून वाहनांच्या रॅलीने कार्यकर्ते न्यू पॅलेस येथे जाऊन शाहू महाराज यांना पाठिंबा दिला होता. याबाबत पोलिस आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची कोणतीही परवानगी घेतली नाही. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल ए. वाय. पाटील A Y Patil यांच्यासह अविनाश आनंदराव पाटील, राजाराम यशवंत पाटील, शिवानंद महाजन (चौघे रा. सोळांकूर, ता. राधानगरी), दिनकर बाळा पाटील (आणाजे), राजाराम काकडे (आवळी), नेताजी पाटील (मांगोली), शिवाजी पाटील (तारळे), दीपक पाटील (कांबळवाडी) यांच्यासह ३० ते ४० जणांवर गुन्हा दाखल झाला. आचारसंहिता उल्लंघनाचा जिल्ह्यात हा पहिलाच गुन्हा दाखल झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
दरम्यान, कोल्हापूरमध्ये शाहू छत्रपती आणि महायुतीचे संजय मंडलिक Sanjay Mandlik अशी लढत होत आहे. मंडलिकांनी कोल्हापूरच्या गादीवरून केलेल्या विधानांमुळे जिल्ह्याचे राजकारण तापले आहे. त्यानंतर सोमवारी (ता. 15) अजित पवारांनी ही लढत रयतेची असल्याचे सांगून शाहू छत्रपतींसमोर आव्हान उभे करण्याचा प्रयत्न केला आहे. दोन्ही गटांकडून जोरदारपणे प्रचार सुरू असल्याचे दिसून येत आहे. त्यातच पाटलांसह 40 जणांवर दाखल झालेल्या गुन्ह्यांमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
(Edited by Sunil Dhumal)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.