Vikram Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Karad News : आधी लगीन लोकशाहीचं; मग स्वतःचं; मतदान करूनच नवरदेव चढला बोहल्यावर....

Zilla Parishad Election 2026 : सातारा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी नऊ वर्षांनंतर मतदान होत असून कराड तालुक्यातील तांबवे येथील नवरदेवाने लग्नाच्या गडबडीतही मतदान करून नागरिक कर्तव्य बजावले.

हेमंत पवार - Hemant Pawar

Karad, 07 February : सातारा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी शनिवारी सकाळी साडेसातपासून मतदानास सुरुवात झाली. तब्बल नऊ वर्षांनंतर होत असलेल्या या निवडणुकीमुळे मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. या मतदानाच्या दिवशी कराड तालुक्यातील तांबवे येथील एका नवरदेवाने लग्नाच्या गडबडीतही मतदानाचा हक्क बजावून आपले राष्ट्रीय कर्तव्य बजावले. या घटनेची राजकीय व सामाजिक वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.

तांबवे (ता. कराड) येथील बाळासाहेब दादा पाटील यांचे चिरंजीव विक्रम पाटील यांचा विवाह आज (ता. ०७ फेब्रुवारी) पुणे जिल्ह्यातील उरुळी कांचन येथे प्रकाश अर्जुन राऊळ (रा. वेर्ले, जि. सिंधुदुर्ग) यांची कन्या आदिती यांच्याशी होता. लग्नाची वेळ दुपारी ठरलेली असतानाही विक्रम यांनी सकाळी सर्वप्रथम मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा (Voting) हक्क बजावला.

लग्नाची (Wedding) तयारी, पाहुण्यांची लगबग आणि वेळेची घाई असतानाही आधी मतदान, मग लग्न या भूमिकेतून त्यांनी कर्तव्याला प्राधान्य दिले. त्यांच्या समवेत कुटुंबीय व मित्रमंडळीही मतदानासाठी उपस्थित होती. मतदान केल्यानंतर थेट लग्नस्थळासाठी ते पुण्याकडे रवाना झाले.

मतदान केंद्रावर पारंपरिक पोशाखातील नवरदेव पाहून उपस्थित मतदारांमध्ये उत्सुकता निर्माण झाली. अनेकांनी त्यांचे कौतुक करत छायाचित्रेही काढली. मतदान हा लोकशाहीचा उत्सव असून प्रत्येकाने त्यात सहभागी व्हावे, असा संदेश त्यांच्या कृतीतून दिला गेल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली.

विक्रम पाटील यांनी लग्नाच्या दिवशीही राष्ट्रीय कर्तव्याला प्राधान्य दिल्याने त्यांचे कौतुक होत आहे. अनेकजण घरात असूनही मतदानाकडे पाठ फिरवतात. तसेच, शासकीय सुटी असूनही मतदानासारखे राष्ट्रीय कर्तव्य बजावण्याऐवजी अनेक जण पर्यटनाला जातात, त्यांच्यासाठी विक्रम पाटील यांनी मार्ग दाखवला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT