Five former Congress corporators join BJP-Sushilkumar Shinde Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur Politic's :सोलापुरात काँग्रेसला धक्का; पाच माजी नगरसेवकांचा भाजपत प्रवेश, शिंदेंच्या ‘डॅमेज कंट्रोल’कडे लक्ष

Assembly Election 2024 : सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून मोची समाजाला काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्याने समाजातील पाच माजी नगरसेवकांसह त्यांच्या समर्थकांनी काँग्रेसची साथ सोडली आहे.

Vijaykumar Dudhale

Solapur, 10 November : सोलापुरात काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला असून पक्षाच्या पाच माजी नगरसेवकांनी ऐन विधानसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून मोची समाजाला काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्याने समाजातील पाच माजी नगरसेवकांसह त्यांच्या समर्थकांनी काँग्रेसची साथ सोडली आहे.

मोची समाजाच्या या निर्णयामुळे सोलापूर शहर मध्य मतदारसंघातील (Solapur City Central Constituency) भाजपचे उमेदवार देवेंद्र कोठे (Devendra Kothe) यांना फायदा होण्याची शक्यता आहे. मात्र, काँग्रेसचा हक्काचा मतदार भाजपकडे वळण्याची भीती आहे. ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे हे आज सोलापुरात दाखल झाले आहेत. माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेसची हक्काची मते कायम राहावीत, यासाठी शिंदे कोणते डावपेच आखतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

माजी सभागृह नेते देवेंद्र भंडारे, माजी युवक अध्यक्ष अंबादास करगुळे, माजी नगरसेवक सिद्राम अटेलूर, माजी नगरसेवक जेम्स जंगम, माजी नगरसेविका वैष्णवी करगुळे, माजी नगरसेविका सरस्वती कासलोलकर, नागनाथ कासलोलकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे (BJP) माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, अविनाश महागावकर, भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांची भूमिका महत्वपूर्ण ठरली आहे.

सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून काँग्रेसकडून माजी महापौर संजय हेमगड्डी, माजी सभागृह नेते देवेंद्र भंडारे, माजी युवक अध्यक्ष अंबादास करगुळे हे विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक होते. मात्र, काँग्रेसने शहराध्यक्ष चेतन नरोटे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे नाराज भंडारे आणि करगुळे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र, दोघांनीही माघार घेतली होती.

काँग्रेस नेतृत्वाच्या शब्दानंतर भंडारे आणि करगुळे यांनी माघार घेतली होती. मात्र, काँग्रेसचे उमेदवार नरोटे यांच्या प्रचार कार्यालयाच्या उद्‌घाटनालाही करगुळे आणि भंडारे यांनी दांडी मारली होती. त्यामुळे या दोघांसह मोची समाजातील काँग्रेसचे बहुतांश नेतेमंडळी नाराज होती. त्यातूनच भंडारे, करगुळे यांच्यासह पक्षाच्या पाच माजी नगरसेवकांनी काँग्रेसची साथ सोडली आहे.

दरम्यान, मोची समाजातील काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पक्षाकडून कशा प्रकारे डॅमेज कंट्रोल करतात, हे पाहावे लागणार आहे. विशेषतः माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे आज (ता.10 नोव्हेंबर) शहरात दाखल झाले आहेत. त्यांच्याकडून काय पाउले उचलली जातात, याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT