Ratnagiri News : गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत गळती लागली आहे. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेतील महत्वाचे नेते ही गळती रोखण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र यात काही यश येताना दिसत नाही. अशातच रत्नागिरीत ऑपरेशन टायगर सूसाट झाले असून ठाकरे यांचे निकटवर्तीय असणारे राजन साळवी शिवसेनेच्या गळाला लागले. साळवींनी उपमुख्यमंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश केला. यानंतर आता जिल्ह्यात ठाकरे गटाला अधिकच धक्के बसत आहे. दापोली तालुक्यातही ऑपरेशन टायगर यशस्वी झाले असून उबाठाला मोठा धक्का बसला आहे. येथे ठाकरे गटाला खिंडार पडण्याची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांपासून दापोली तालुक्यात ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा सुरू होती. ती चर्चा आता सत्यात उतरताना दिसत असून उबाठाच्या पाच नगरसेवकांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरेंना शेवटचा जय महाराष्ट्र केला आहे. या नगरसेवकांनी वेगळा गट स्थापन करत राज्यमंत्री योगेश कदम (yogesh kadam) यांच्या उपस्थित शिंदे शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. तर चार एक नगरसेवकही शिंदे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. यामुळे योगेश कदम यांनी ठाकरे शिवसेनाला येथे सुरूंग लावण्यात यश मिळवले आहे.
दरम्यान आता दापोली नगरपंचायतीमध्ये सत्तेत असलेल्या उबाठा शिवसेनेत फूट पडली आहे. यामुळे राजकीय समीकरणे बदलणार आहेत. दापोली नगरपंचायतीत सध्या शिवसेना उबाठा आणि राष्ट्रवादी अशी आघाडी आहे. पण आता सत्ताधारी ठाकरे गटातील 7 पैकी 5 नगरसेवकांनी आपली वेगळी चूल मांडली आहे. या नगरसेवकांनी स्वतंत्र गट स्थापन करून राज्यमंत्री योगेश कदम यांच्या उपस्थितीत शिवसेनेत केला आहे. 2022 मध्ये दापोली नगरपंचायतीच्या निवडणुकीत आमदार योगेश कदम यांना शह तत्कालीन पालकमंत्री अनिल परब यांनी रणनीती आखली होती. त्यांनी उबाठा आणि राष्ट्रवादी अशी आघाडी करत योगेश कदम यांना नगरपंचायतीच्या सत्तेपासून दूर ठेवले होते. पण आता याच गोष्टीचा वचपा योगेश कदम यांनी काढला असून उबाठाचे पाच नगरसेवक फोडले आहेत.
योगेश कदम यांनी मंत्रिपदाची सूत्रे हाती घेताच निधीच्या कारणाणे सत्ताधारी गटातील पाच नगरसेवकांनी स्वतंत्र भूमिका घेतली आहे. त्यांनी स्वतंत्र गट स्थापन करण्याचा निर्णय घेतला. याची कुणकुण उबाठाच्या पदाधिकाऱ्यांना लागताच त्यांनी या पाचही नगरसेवकांशी चर्चा करून त्यांचा निर्णय बदलण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला यश आले नाही. 14 ऐवजी 17 फेब्रुवारीला वेगळा गट करून पाचही नगरसेवकांनी रत्नागिरीत जिल्हाधिकाऱ्यांना वेगळा गट स्थापन केल्याचे पत्र दिले.
आपल्याला विकासासाठी निधी मिळावा या अपेक्षतून अन्वर रखांगे, विलास शिगवण, मेहबूब तळघरकर, अश्विनी लांजेकर, संतोष कळकुटके या पाचही नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी खासदार तटकरे यांचे काम केले होते; मात्र 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान या राष्ट्रवादीच्या 8 पैकी 7 नगरसेवकांनी स्वतंत्र गट स्थापन करून उपनगराध्यक्ष खालीद रखांगे यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे गटात प्रवेश केला होता. त्यामुळे दापोली नगरपंचायतीमध्ये ठाकरे गटाचे 13, राष्ट्रवादी अजित पवार गट 1, भाजप 1 व शिवसेना शिंदे गट 2 असे पक्षीय बलाबल झाले. पण आता शिवसेना शिंदे गटाचे बलाबल 7 वर गेले आहे.
दापोली तालुक्यात ऑपरेशन टायगर जोरदार राबवणार असून, आज पाच नगरसेवक आता आले आहेत. लवकरच अजून 4 नगरसेवक येणार आहेत. दापोली नगरपंचायतीमध्ये संख्याबळ वाढवून लवकर सत्ता स्थापन करू असा विश्वास शिवसेना शहरप्रमुख प्रसाद रेळेकर यांनी व्यक्त केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.