Karmala, 01 April : कोट्यवधींच्या कर्जामुळे बंद असलेल्या श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतून बागल गटानंतर माजी आमदार जयवंतराव जगताप यांनीही माघार घेतली आहे. कारखान्याच्या हिताचा विचार करून खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार नारायण पाटील यांच्याशी चर्चा करून आम्ही आदिनाथच्या निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला, असे जगताप यांनी स्पष्ट केले. बागल, जगताप यांच्या माघारीनंतर ‘आदिनाथ’च्या रिंगणात आता आमदार नारायण पाटील आणि माजी आमदार संजय शिंदे यांच्यात सामना होण्याची शक्यता आहे.
माजी आमदार जयवंतराव जगताप (Jaywantrao Jagtap ) यांनी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात पत्रकार परिषद घेऊन आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीबाबत आपली भूमिका जाहीर केली. उमेदवारी अर्ज मागे घेण्यास दोन दिवसांचा कालावधी शिल्लक आहे, त्यामुळे किती लोकांचे अर्ज माघारी घेतली जातात आणि रिंगणात किती उमेदवार राहतात की आदिनाथ कारखान्याची निवडणूक बिनविरोध होणार, याची उत्सुकता करमाळा तालुक्याला लागून राहिली आहे.
आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक (Adinath Sugar Factory Election) जाहीर झाल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन कारखान्याची निवडणूक बिनविरोध करण्यात यावी, अशी भूमिका मांडली होती. आमच्या काही कार्यकर्त्यांनी उमेदवारी अर्जही भरले आहेत. मात्र, कारखान्याचा आतापर्यंतचा इतिहास पाहता आतापर्यंतच्या प्रत्येक सत्ताधाऱ्यांनी स्वतःचे आर्थिक हितसंबंध ठेवून काम केलेले आहे, असेही माजी आमदार जगताप यांनी स्पष्ट केले.
आदिनाथ सहकारी कारखान्याची निवडणूक बिनविरोध करावी, अशी भूमिका मांडल्यानंतर विरोधकांनीही त्याकडे सकारात्मक दृष्टीकोन ठेवून पाहणे गरजेचे हेाते. मात्र, बिनविरोधसाठी प्रयत्न होताना दिसले नाहीत. आम्ही सध्या मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार नारायण पाटील यांच्यासोबत एकत्र काम करत आहे. कारखान्याचे संचालक निवडताना आमच्या कार्यकर्त्यांना संधी मिळावी, अशी आम्हा सर्वांची भूमिका राहिली असती. भविष्यात काम करताना मतभेद झाल्यास कारखाना चालवताना अडचणी येऊ शकतात, तो विार करून आम्ही निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे, असे जयवंतराव जगताप यांनी नमूद केले.
जयवंतराव जगताप म्हणाले, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार नारायण पाटील यांच्याबरोबर चर्चा करून आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणूक लागल्यास आदिनाथ कारखान्याचे सभासद योग्य तो निर्णय घेतील. ऊस उत्पादक शेतकरी आणि सभासदांच्या हिताचा विचार करून कारखाना चालविणाऱ्यांना आम्ही सहकार्य करू.
कारखाना बिनविरोध होणार की निवडणूक लागणार?
श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना आर्थिक अडचणीमुळे अनेक वर्षांपासून बंद आहे. कारखाना ताब्यात घेऊन तो चालविणे मोठे जिकिरीचे ठरणार आहे. ती परिस्थिती लक्षात घेऊन चार-पाच दिवसांपूर्वीच बागल गटाने निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यांच्यानंतर माजी आमदार जयवंतराव जगताप यांनीही निवडणूक लढविणार नसल्याचे जाहीर केले आहे. माघारीसाठी आणखी दोन दिवसांचा कालावधी आहे, त्यामुळे कारखान्याची निवडणूक बिनविरोध होणार की शिंदे आणि पाटील या आजी माजी आमदारांमध्ये लढत होणार, याची उत्सुकता आहे.
जगतापांची माघार; नारायण पाटलांच्या खांद्यावर धुरा
माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीत माजी आमदार संजय शिंदे यांना पाठिंबा दिला होता. त्या निवडणुकीत संजय शिंदे आमदार झाले. मात्र, पुढे संजय शिंदे आणि जयवंतराव जगताप यांच्यामध्ये अंतर पडत गेले, त्यामुळे लोकसभेच्या 2024 च्या निवडणुकीत जगताप यांनी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांना मदत करण्याची भूमिका घेतली होती. विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी नारायण पाटील यांना मदत केली. मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली आमदार नारायण पाटील व जयवंतराव जगताप एकत्रितपणे तालुक्याचे राजकारण करत आहेत. त्यामुळे आदिनाथ कारखान्याच्या निवडणुकीत पाटील आणि जगताप यांचा संयुक्त पॅनेल असेल, असा अंदाज होता. मात्र, जगताप यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.