Bhagirath Bhalke-Abhijeet Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Bhalke-Patil Yuti : पंढरपुरात मोठी घडामोड; झेडपीसाठी भगीरथ भालके अन्‌ आमदार अभिजीत पाटील आले एकत्र!

Zilla Parishad-Panchayat Samiti Election 2026 : पंढरपूर तालुक्यात अभिजीत पाटील आणि भगीरथ भालके यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका एकत्र लढण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष वसंत देशमुख यांना या आघाडीवर तीव्र नाराजी आहे.

भारत नागणे

Pandharpur, 31 January : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या ऐन धामधुमीत पंढरपूर तालुक्यात मोठी घडामोड घडली आहे. आमदार अभिजीत पाटील आणि भगीरथ भालके यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. पाटील आणि भालके यांच्यात काही गट आणि गणांची वाटणी झाल्याची माहिती आहे. दरम्यान, भालके-आमदार पाटील यांच्या आघाडीबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष वसंत देशमुख यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ‘आपण पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढण्यावर ठाम असल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले.

जिल्हाध्यक्ष वसंत देशमुख यांच्या भूमिकेमुळे भालके-पाटील यांच्यातील आघाडी पुढे जाणार की मध्येच थांबणार? याविषयी आता उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत, त्यामुळे पंढरपूरच्या राजकारणाकडे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

वाखरी जिल्हा परिषद गटातून तीर्थक्षेत्र विकास आघाडीने राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मयुरी संतोष बागल यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे प्रमुख भगीरथ भालके यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान कासेगाव, टाकळी व गोपाळपूर या जिल्हा परिषद गटांच्या संदर्भात मात्र अजून कोणताही निर्णय झाला नसल्याचे आमदार अभिजीत पाटील यांनी या वेळी स्पष्ट केले. त्यामुळे युतीबाबत अजूनही संभ्रम कायम असल्याचे चित्र आहे.

पंढरपूर तालुक्यातील आठ जिल्हा परिषद आणि 16 पंचायत समिती गणासाठी तीर्थक्षेत्र विकास आघाडी आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. दोन्ही गटाच्या उमेदवारांनी प्रचार देखील सुरू केला आहे.

दरम्यान, आज अचानक तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे प्रमुख भगीरथ भालके व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माढ्याचे आमदार अभिजीत पाटील यांनी एकत्रित निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. भालके- आमदार पाटील यांच्या आघाडीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये मात्र संभ्रम निर्माण झाला आहे.

नव्या आघाडीबाबत भगीरथ भालके म्हणाले, नगरपालिका निवडणुकीत विठ्ठल परिवार म्हणून आम्ही सर्व नेते एकत्र येऊन निवडणूक लढवली. त्यानंतर जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत पुन्हा आम्ही एकत्रित यावे, अशी ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांची इच्छा होती. त्यानुसार आम्ही एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे.

काही गट आणि गणांमध्ये एकमेकांच्या उमेदवारांना पाठिंबा देण्यावर आमच्यात एकमत झाले आहे. कासेगाव, टाकळी, गोपाळपूर येथील जिल्हा परिषद गटांबाबत मात्र अजून कोणताही निर्णय झालेला नाही. दोन दिवसांमध्ये चर्चा करून या ठिकाणच्या उमेदवारांबाबत निर्णय घेतला जाईल, असेही भालकेंनी स्पष्ट केले.

समोरच्या उमेदवारांचा पराभव करण्यासाठी आम्ही एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही एकत्र आल्यानंतर आमच्या आघाडीला यश निश्चित मिळणार आहे. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत समोरच्या उमेदवारांचा आम्ही सुपडा साफ करू, असा दावाही आमदार अभिजीत पाटील यांनी केला आहे. दरम्यान, वाखरी येथील तीर्थक्षेत्र आघाडीचे उमेदवार सुनीता संग्राम गायकवाड यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

अशा राजकारणामुळे पंढरपूरचे वाटोळे : देशमुख

आमदार अभिजीत पाटील आणि भगीरथ भालके यांनी आघाडी केल्याबाबत कोणतीही माहिती नाही. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा आणि त्यांचा आघाडीशी माझा कोणताही संबंध नाही. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने कासेगाव जिल्हा परिषद गट व गणामध्ये उमेदवार उभे केले आहेत. आम्ही पक्षाच्या चिन्हावर ताकतीने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही कोणालाही पाठिंबा देणार नाही.

सध्या पंढरपूर तालुक्याच्या राजकारणामध्ये पोरखेळ सुरू आहे. उद्या मी पत्रकार परिषद घेऊन पक्षाची भूमिका मांडणार आहे. अशा राजकारणामुळे पंढरपूर तालुक्याचे वाटोळे झाले आहे, अशी खंतही देशमुख यांनी व्यक्त केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT