Kolhapur News : कोल्हापूर महापालिकेवर एकेकाळी 15 ते 20 वर्ष अधिराज्य गाजवणाऱ्या ताराराणी आघाडी आता संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे.
आगामी महापालिका निवडणुकीसाठी माजी आमदार महादेवराव महाडिक यांची ताराराणी आघाडी भाजपमध्ये सामील होण्याची चिन्हं आहेत. विधानसभा निवडणुकीच्या भरघोस यशानंतर आगामी निवडणुकीसाठी हा निर्णय होण्याची शक्यता आहे.
राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक भाजपकडून (BJP) राज्यसभेवर आहेत. तर कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून अमल महाडिक आमदार म्हणून विजयी झालेत. ताराराणी आघाडीचे गटनेते असलेले माजी नगरसेवक सत्यजित कदम यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे भाजप आणि ताराराणी आघाडीच्या नगरसेवकांची भूमिका काय असणार? हे आगामी काळात स्पष्ट होईल. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महापालिका निवडणूक ही भाजपकडून ताकदीने लढवण्याचा प्रयत्न असणार आहे.
कोल्हापूर महापालिकेत भाजप आणि ताराराणी आघाडीची युती आहे. दोघांचे मिळून सध्याच्या घडीला 36 नगरसेवक आहेत. या युतीचे नेतृत्व राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik), तर आघाडीचे नेतृत्व माजी नगरसेवक सत्यजित कदम करत होते. मात्र कदम यांनी विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे मर्जीतील ताराराणी आघाडी आणि भाजपचे नगरसेवक कोणती भूमिका घेणार, याकडे लक्ष लागले आहे.
पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे शिवसेनेत अनेकांचे प्रवेश होण्याचे संकेत आहेत. विधानसभा निवडणुकीत महाडिक गटावर कदम नाराज आहेत. मात्र महापालिकेच्या राजकारणात कदम आणि महाडिक यांच्यात राजकीय ठिणगी पडण्याची शक्यता ही वर्तवली जात आहे. विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यानंतर भाजपने आगामी महापालिका निवडणूक ही ताकदीने लढण्याचा निर्धार केला आहे.
25 नोव्हेंबरला मुंबईत झालेल्या बैठकीत महापालिकेचा आढावा घेण्यात आला असून निवडून येणाऱ्या उमेदवारांवर लक्ष केंद्रीत करण्याच्या सूचना नेत्यांना दिल्या आहेत. संपूर्ण महाडिक कुटुंब हे भाजपमध्ये असल्याने आघाडी आता संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. सर्वच नगरसेवक भाजपच्या चिन्हावर निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी सज्ज झाले आहेत.
माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी स्थापन केलेली ताराराणी आघाडीचे प्रमुख म्हणून माजी नगरसेवक सत्यजित कदम हे काम पाहत होते. मात्र त्यांनी एकनाथ शिंदे शिवसेनेत प्रवेश केल्याने आणि महाडिक बंधू भाजपचे आमदार-खासदार असल्याने त्यांना भाजपच्या उमेदवारांचा प्रचार करावा लागणार आहे.
कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत मागील वेळी भाजप सोबत युती करताना ताराराणी आघाडी कडून 19 नगरसेवक निवडून आले होते. त्यामुळे महाडिक गटाचे स्वतःचे अस्तित्व महापालिकेत होते. यंदा मात्र परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे स्वतःच अस्तित्व ठेवणार की भाजपचा विस्तार करणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.