Solapur, 04 July : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार नरसय्या आडम हे विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. माकपच्या वतीने आजपासून (ता. 04 जुलै) ‘नोट भी दो, वोट भी दो’ हे अभियान राबविण्यात येणार असल्याची घोषणा माजी आमदार आडम यांनी केली आहे.
माकपच्या आवाहनानंतर विल्यम ससाणे या कामगाराने आपला एक महिन्याचा पगार सुमारे साडेसोळा हजार रुपये निवडणूक निधी (Election Fund) म्हणून माजी आमदार नरसय्या आडम (Narsayya Adam ) यांना दिला आहे. तसेच, उपस्थित अनेक कामगारांनी आपल्या कुवतीनुसार आडम मास्तर यांना निवडणुकीसाठी निधी दिला आहे. दिवसभरात एकूण 39 हजार 500 रुपयांचा निवडणूक निधी संकलित झाला आहे.
सोलापूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) निवडून आल्या आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीतील पक्षांना विधानसभा निवडणुकीसाठी आशेचा किरण दिसत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील सर्वच पक्ष निवडणुकीच्या कामाला लागले आहेत.
लोकसभा निवडणुकीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार नरसय्या आडम यांनी काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना पाठिंबा दिला हेाता. त्याच वेळी त्यांनी सोलापूर शहर मध्य मतदारसंघाची मागणी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडे केली होती. त्या वेळी काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे, सीताराम येच्युरी यांच्यात चर्चा झाल्याचे आडम यांनी म्हटले हेाते. त्या चर्चेनुसार सोलापूर शहर मध्य मतदारसंघ माकपला सोडण्याबाबत एकमत झाल्याचा दावा आडम यांनी केला होता. मात्र, काँग्रेसकडून त्याबाबत कोणतेही भाष्य करण्यात आले नव्हते.
मध्यंतरी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या शिष्टमंडळाने ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यात लोकसभेला आम्ही जागांची मागणी केली नव्हती. विधानसभेला तेरा जागा देण्यात याव्यात, अशी मागणी या शिष्टमंडळाने केली होती. सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक असलेले आडम मास्तर यांचाही त्या शिष्टमंडळात समावेश होता. त्यानंतर त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचीही भेट घेतली होती.
दरम्यान, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांच्या भेटीगाठीनंतर माकपचे माजी आमदार नरसय्या आडम हे विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. माकपने आजपासून ‘नोट भी दो, वोट भी दो’ अभियान सुरू केले आहे. त्याबाबत खुद्द माजी आमदार नरसय्या आडम यांनीच माहिती दिली आहे.
सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदार संघातून माजी आमदार नरसय्या आडम निवडणूक लढवणार आहेत. सोलापूर शहर मध्य मतदार संघात मागील तीन टर्म प्रणिती शिंदे आमदार होत्या. प्रणिती शिंदे लोकसभेत निवडून गेल्याने शहर मध्य मतदारसंघ महाविकास आघाडीने माकपला सोडावा, अशी मागणी केली आहे.
आमचा पक्ष हा गोरगरीब आणि कष्टकऱ्यांचा आहे, निवडणुकीत पैसा लागतो. मात्र आमच्याकडे पैसे नसल्याने जनतेला आम्ही वोट भी दो आणि नोट भी दो असे आवाहन करत आहेत. जनतेकडून लोकवर्गणी घेऊन मी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे, अशी प्रतिक्रिया माजी आमदार नरसय्या आडम यांनी दिली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.