Solapur, 16 March : विधान परिषदेच्या रिक्त तीन जागांसाठी भारतीय जनता पक्षाकडून तीन नावे जाहीर करण्यात आली आहेत. नागपूरचे माजी महापौर संदीप जोशी, आर्वीचे माजी आमदार दादाराव केचे, महामंत्री म्हणून काम केलेले छत्रपती संभाजीनगरमधील संजय केनेकर यांना संधी देण्यात आली आहे. ही संधी देताना भाजपचे निष्ठावंत माधव भांडारी, विधानसभेला पंढरपूरमधून माघार घेणारे माजी आमदार प्रशांत परिचारक यांना पुन्हा एकदा डावलण्यात आले आहे, त्यामुळे पंढरपूरमध्ये पुन्हा एका निराशा पसरली आहे.
विधानसभा निवडणुकीत पंढरपूर मतदारसंघातून माजी आमदार प्रशांत परिचारक (Prashant Paricharak) हे भारतीय जनता पक्षाकडून इच्छूक होते. त्यांनी तशी सहा महिने अगोदर तयारीही केली होती. कार्यकर्त्यांचा रेटाही प्रशांतमालकांनी विधानसभा निवडणूक लढवावी, असाच होता. मात्र, प्रशांत परिचारक यांना ऐनवेळी पक्षाकडून डावलण्यात आले होते.
पंढरपुरातून आमदार समाधान आवताडे यांची उमदेवारी जाहीर झाल्यानंतर माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी बंडखोरी करू नये. त्यांनी निवडणुकीतून माघार घ्यावी, तसेच त्यांची नाराजी दूर करण्यासाठी खुद्द प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) हे पंढरपूरमध्ये आले होते. परिचारक वाड्यावर दोन तास बावनकुळे हे प्रशांत परिचारकांची समजूत घालत होते. बाहेर कार्यकर्त्यांची भावना तीव्र होत्या. ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. प्रशांत परिचारक यांनी निवडणूक लढवावीच, असा आग्रह कार्यकर्त्यांचा होता.
तब्बल दोन ते अडीच तासांच्या चर्चेनंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रशांत परिचारकांनी माघार घेत समाधान आवताडे यांना निवडून आणण्याची जबाबदारी घेतली आहे, असे जाहीर केले. तसेच माजी आमदार प्रशांत परिचारक हे लवकरच विधीमंडळात दिसतील, असेही बावनकुळे यांनी म्हटले होते. माजी आमदार प्रशांत परिचारक यांची समजूत काढण्यासाठी तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच बावनकुळे यांना पाठविले होते, त्यामुळे प्रशांत परिचारक यांना बावनकुळे यांनी दिलेला शब्द तो देवेंद्र फडणवीस यांचा शब्द होता. मात्र, तो शब्द पाळला गेला नसल्याचे आजच्या निर्णयातून दिसून येत आहे.
विधान परिषदेला डावलण्यात आल्यामुळे माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे समर्थक नाराज होऊ शकतात. मात्र, परिचारक हे आपल्या स्वभावनुसार नाराजी बोलून दाखवणार नाहीत, हे निश्चित. मात्र, त्याचे पडसाद पंढरपूरमधील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दिसून येऊ शकते. तोंडावर नगरपालिकेची निवडणूक असणार आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांची समजूत कशी काढायाची, हा प्रश्न परिचारकांपुढे असू शकतो.
दरम्यान, प्रशांत परिचारक यांच्याबरोबरच सोलापूर जिल्ह्यातून बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत, माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते यांचीही नावे चर्चेत होती. मात्र, या पैकी कोणालाही संधी मिळाली नाही, त्यामुळे सोलापूरच्या पदरी पुन्हा एकदा निराशाच आली आहे.
हेही कारण असू शकते?
विधान परिषदेतील भाजपचे गोपीचंद पडळकर, प्रवीण दटके, रमेश कराड राष्ट्रवादीचे राजेश विटेकर, तर शिवसेनेचे आमश्या पाडवी असे पाच आमदार विधानसभा निवडणुकीत विजयी झाले आहेत. यातील गोपीचंद पडळकर, रमेश कराड आणि प्रवीण दटके यांच्या विधान परिषदेतील कालावधी 13 मे 2026 रोजी संपणार आहे. म्हणजे नव्याने निवडून येणाऱ्या उमेदवाराला साधारणपणे एक वर्षे आणि पावणे दोन महिनेच आमदार म्हणून काम करण्यास संधी मिळणार आहे, त्यामुळे या कमी कालावधीची आमदारकी नको, असाही सूर काही इच्छुकांनी लावल्याचे समजते, त्यामुळेही काहींनी यातून माघार घेतल्याची चर्चा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.