Ramesh Kadam  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ramesh Kadam in Mohol : रमेश कदमांची मोहोळमध्ये क्रेझ कायम; मतदारसंघात ८ वर्षांनंतर आलेल्या माजी आमदारांचे जंगी स्वागत

Vijaykumar Dudhale

Mohol News : तब्बल आठ वर्षांनंतर मोहोळ मतदारसंघात आलेले माजी आमदार रमेश कदम यांचे समर्थकांकडून जंगी स्वागत करण्यात आले. मोहोळमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकात त्यांचे फटाक्यांची आतषबाजी आणि पुष्पवृष्टी करत हजारो कार्यकर्त्यांनी स्वागत केले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेपाठोपाठ आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून त्यांचे स्वागत करण्यात आले. तब्बल आठ वर्षांच्या खंडानंतर आलेल्या कदमांचे मोहोळमध्ये जल्लोषात स्वागत झाले. (Former MLA Ramesh Kadam received a warm welcome in Mohol)

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार रमेश कदम हे आज २०१५ नंतर प्रथमच मोहोळ विधानसभा मतदारसंघात दाखल झाले. सोलापूर महामार्गावर मोडनिंबपासूनच त्यांचे जागोजागी स्वागत करण्यात आले. त्यांच्या स्वागतासाठी मोहोळ शहरातील उड्डाणपुलासह छत्रपती शिवाजी महाराज चौकात त्यांच्या समर्थकांनी प्रचंड गर्दी केली होती. त्यामुळे माजी आमदार कदम यांची मतदारसंघात आजही क्रेझ असल्याचे दिसून येते.

मोहोळ शहरासह तालुकाभर कदम यांच्या स्वागताचे फ्लेक्स लागले होते. त्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडूनही कदम यांच्या स्वागताचा फ्लेक्स लावण्यात आला होता. त्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते तथा मोहोळचे माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर यांनीही स्वागताचा फ्लेक्स लावला होता. शहर आणि तालुक्यात मिळून तब्बल अडीचशेपेक्षा जास्त कदम यांच्या स्वागताचे फ्लेक्स लागले होते. कदम यांच्या एन्ट्रीमुळे तालुक्यातील युवा वर्गात विशेषतः उत्साह दिसून आला.

रमेश कदम यांची ठाण्यातील मध्यवर्ती कारागृहातून २० ऑगस्ट रोजी सुटका झाली होती. त्यावेळी त्यांनी आपण २४ सप्टेंबर रोजी मोहोळ विधानसभा मतदारसंघात जाऊन मतदारांशी चर्चा करूनच राजकीय निर्णय घेणार आहे, असे सांगितले होते. त्यानुसार ते आज मोहोळमध्ये दाखल झाले आहेत. त्यांच्या एन्ट्रीने मोहोळ विधानसभा मतदारसंघातील राजकीय गणिते बदलण्याची चिन्हे आहेत.

आमदार कदम यांनी कारागृहात असताना २०१९ ची विधानसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढवली होती. त्या निवडणुकीत कुठलाही प्रचार न करता त्यांना २५ हजार मते मिळाली होती. त्यामुळे सर्वसामान्य मतदारांचे ते आभार मानण्यासाठी आले आहेत. माजी आमदार कदम यांच्या नागरी सत्कार सोहळ्यासाठी १४ सदस्यीय नियोजन समिती बनविण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT