Siddhi Kadam-Ramesh Kadam  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ramesh Kadam : मोहोळमधून रमेश कदम, सिद्धी कदम यांची माघार; पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा दिलासा

Mohol Assembly Constituency : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात आपण अपक्ष फार्म ठेवायचा नाही, हा विचार करून मी आणि माझ्या मुलीने विधानसभा निवडणुकीत माघार घेतली आहे, असे माजी आमदार रमेश कदम यांनी स्पष्ट केले.

Vijaykumar Dudhale

Solapur, 04 November : माजी आमदार रमेश कदम आणि त्यांची कन्या सिद्धी कदम यांनी मोहोळ विधानसभा मतदारसंघातून भरलेला अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने माझ्या मुलीला लहान वयात संधी दिली, त्या पक्षाचा आदेश पाळला पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात आपण अपक्ष फार्म ठेवायचा नाही, हा विचार करून मी आणि माझ्या मुलीने विधानसभा निवडणुकीत माघार घेतली आहे, असे माजी आमदार रमेश कदम यांनी स्पष्ट केले.

माजी आमदार रमेश कदम यांची कन्या सिद्धी कदम यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून मोहोळ विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. मात्र, महाविकास आघाडीतील सर्वच पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी सिद्धी कदम यांच्या उमेदवारीला विरोध करत उमेदवार बदलण्याची मागणी केली होती.

मोहोळमधील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शरद पवार यांची बारामती येथे जाऊन भेट घेतली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून मोहोळमधून राजू खरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे माजी आमदार रमेश कदम हे नाराज झाले होते. त्यानंतरही कदम यांनी दिपावली पाडव्याच्या दिवशी बारामतीत जाऊन शरद पवार यांची भेट घेतली होती.

दरम्यान, रमेश कदम यांनी रविवारी मोहोळमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला होता. त्यानंतर त्यांनी आज सकाळी आपला निर्णय जाहीर केला. त्यानुसार रमेश कदम आणि सिद्धी कदम यांनी मोहोळ विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज मागे घेत असल्याचे जाहीर केले.

रमेश कदम म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून माझ्या मुलीला अवघ्या २६ व्या वर्षी उमेदवारी जाहीर केली होती. त्याबद्दल शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचे आभार मानतो. पण काही कारणांमुळे उमेदवारी बदलण्यात आली. निवडणूक लढविण्याची कार्यकर्त्यांचा आग्रह होता.

माझ्या मुलीला एवढ्या कमी वयात ज्या पक्षाने उमेदवारी दिली, त्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा आदेश आपण पाळला पाहिजे. त्या पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात आपण अपक्ष अर्ज ठेवायचा नाही. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ध्येयधोरणाशी बांधिल राहून काम करायचे म्हणून मी हा अर्ज मागे घेत आहे, असे स्पष्टीकरण अर्ज मागे घेताना रमेश कदम यांनी दिले.

राजू खरे यांचा प्रचार करण्यासंदर्भातील निर्णय हा मी माझ्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून घेणार आहे. आज तर उमेदवारी अर्ज मागे घेण्यासंदर्भातील निर्णय झालेला आहे. पुन्हा एकदा कार्यकर्त्यांशी चर्चा करून प्रचारासंदर्भातील निर्णय घेणार आहे. माझ्या आणि माझ्या मुलीच्या राजकीय पुनर्वसनाबाबत आमचा पक्ष कोणता निर्णय घेतो, हे पाहू, असेही कदम यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT