Solapur, 27 October : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून मोहोळ मतदारसंघात माजी आमदार रमेश कदम यांची कन्या सिद्धी कदम यांना उमेदवारी देण्यात आली आहे. उच्चशिक्षित असलेल्या सिद्धी कदम यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने मोठा डाव टाकला आहे. आता तो प्रत्यक्ष निवडणुकीत यशस्वी होतो का, हे पाहावे लागेल.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची (NCP SP) तिसरी यादी आज (ता. 27 ऑक्टोबर) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर केली आहे. त्यात सोलापूर जिल्ह्यातील राखीव मोहोळ मतदारसंघातून (MoholConstituency ) माजी आमदार रमेश कदम यांची कन्या सिद्धी कदम यांना उमेदवारी देण्यात आली आहे. वास्तविक या मतदारसंघातून रमेश कदम हे निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक होते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून त्यांच्या कन्येला निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यात आले आहे.
सिद्धी रमेश कदम यांनी टाटा इन्स्टिट्यूटमध्ये समाजशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलेले आहे. त्यांनी ‘एनजीओ’ म्हणूनही काम केले आहे. रमेश कदम (Ramesh Kadam) यांनी तुरुंगात असतानाही विधानसभेची 2019 ची निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीत कदम यांना 23 हजार 649 मते मिळाली होती. त्या निवडणुकीत सिद्धी कदम यांनी प्रचाराची धुरा सांभाळली होती.
दरम्यान, सिद्धी कदम यांच्या रूपाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या विधानसभा उमेदवारीच्या यादीत अकरा महिलांचा समावेश झाला आहे. यापूर्वी या पक्षाकडून दहा महिलांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. त्यामुळे आम्ही फक्त बोलत नाही तर कृतीही करतो, असे जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले.
अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळातील गैरव्यवहारप्रकरणी माजी आमदार रमेश कदम हे तुरुंगात होते. मात्र, वर्षभरापूर्वी त्यांची जामीनावर सुटका झाली आहे. जामिनावर सुटका झाल्यानंतर मोहोळमध्ये त्यांचे जंगी स्वागत झाले होते. त्यावेळीच मोहोळमध्ये रमेश कदम यांची क्रेझ कायम असल्याचे सिद्ध झाले होते.
जामिनावर बाहेर आलेल्या रमेश कदम यांनी एमआयएमकडून लोकसभा निवडणूक लढविण्याची तयारी दाखवली होती. मात्र, एमआयएमने निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे त्यांना लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय रद्द करावा लागला होता. मात्र, त्या निवडणुकीत रमेश कदम यांनी महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांना पाठिंबा दिला होता.
दरम्यान, पुढच्या राजकीय शक्यता लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून मोहोळमधून उमेदवारी देताना विशेष दक्षता घेतलेली दिसून येत आहे. त्यातूनच माजी आमदार रमेश कदम यांच्याऐवजी त्यांच्या कन्या सिद्धी यांना उमेदवारी दिली असू शकते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.