Amit Shah-Pralhad Joshi-Raju Shetti Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sugar Price Hike : अमित शाह, प्रल्हाद जोशी जवाब दो...! 48 लाख टन साखर गेली कुठे? : राजू शेट्टी

Raju Shetti questions Amit Shah and Pralhad Joshi : साखरेचा दर किलोमागे ८० रुपयांवर पोहोचल्याने माजी खासदार राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारवर सवाल उपस्थित केला आहे. ४८ लाख टन साखर कुठे गेली, असा प्रश्न त्यांनी विचारला.

सरकारनामा ब्यूरो

Solapur, 22 August : गेल्या काही दिवसांपासून साखरेच्या दराने अचानक उसळी घेतली आहे. सध्या साखर ८० रुपये किलोवर पोचली आहे. साखरेच्या वाढत्या दरामागे मोठे गौडबंगाल असल्याचा आरोप माजी खासदार राजू शेट्टी यांना केला आहे. तसेच, केंद्र सरकारचीच आकडेवारी सादर करत गृह तथा सहकार मंत्री अमित शाह आणि केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी यांना ४८ लाख टन साखर नेमकी कुठे गेली,? असा सवाल केला आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी आपल्या सोशल मीडियावर याबाबतची पोस्ट करत देशातील साखरसाठ्याचा हिशेबच मांडला आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेली साखरेची आकडेवारी मांडत माजी खासदार शेट्टी यांनी सहकार मंत्री अमित शाह आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी यांना ४८ लाख टन साखरेचा हिशेब विचारला आहे.

माजी खासदार राजू शेट्टी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, गृहमंत्री अमित शाह आणि प्रल्हाद जोशी जवाब दो!

ॲाक्टोबर-२०२५ अखेर सरकारने जाहीर केलेला साखरेचा साठा : ४७ लाख टन

हंगाम २०२५-२६ मधील उत्पादित झालेली साखर : २९१ लाख टन

एकुण शिल्लक साखर : ३३८ लाख टन

हंगाम २०२५-२६ मध्ये निर्यात झालेली साखर : ८ लाख टन

१ नोव्हेंबर ते ३० सप्टेंबरपर्यंत सरकारने साखर विक्री करण्यास दिलेली परवानगी : २४७ लाख टन

३० ॲागस्टपर्यंत शिल्लक साखर साठा : ८३ लाख टन

अन्न नागरी पुरवठा मंत्रालयाच्या दाव्यानुसार सप्टेंबरअखेर शिल्लक साखर साठा : ३५ लाख टन

म्हणजे मग ४८ लाख टन साखर गेली कुठे? ही सर्व आकडे सरकारने वेळोवेळी जाहीर केलेली आहे. मग या ४८ लाख टन साखरेचा हिशेबसुद्धा सरकारनेच द्यायला हवा.

यामधील काही साखर एकतर पाकिस्तान, नेपाळ आणि बांगलादेश या देशांमध्ये चोरट्या मार्गाने अनाधिकृतपणे निर्यात झालेली आहे अथवा व्यापारी आणि साठेबाजारांनी ही साखर दाबून ठेवलेली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि अन्न नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी या दोघांनी याचे उत्तर द्यावे, अशी मागणी शेट्टी यांनी केली आहे.

मूठभर व्यापाऱ्यासाठी..?

दरम्यान, राजू शेट्टी यांना वाढत्या साखर दरावरून केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणतात की, होय हे खरं आहे, मुठभर साखर व्यापारी आणि साखर कारखानदारांच्या हितासाठी १५० कोटी जनता व ऊस उत्पादक शेतकरी वेठीस धरले जात आहेत.

देशात साखेच्या दराने शेअर बाजारातील निर्देशांकपेक्षाही जादा वेगाने उसळी घेऊ लागली आहे. नोव्हेंबर महिन्यापासून हंगाम सुरू होणार आहे. मात्र, देशात पुरेल एवढा साखर साठा केंद्र सरकारच्या अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाने पूर्वीच नियंत्रित केला आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.

ते म्हणाले, ॲागस्ट, सप्टेंबर व ॲाक्टोंबर या तीन महिन्यांत सरासरी ६५ ते ७० लाख मेट्रिक टन साखरेचा खप होणार आहे. याचाच अर्थ देशातील एकुण उत्पादनाच्या २५ ते ३० टक्के साखर या तीन महिन्यांत बाजारात विकली जाणार आहे.

पुढील तीन महिने अशाच पद्धतीने साखरेचे बाजारभाव वाढत राहिल्यास या खप होणाऱ्या साखरेत मुठभर कारखानदार आणि व्यापारी मिळून जवळपास २० ते २२ हजार कोटी रूपयांचा नफा कमविला जाणार आहे. देशातील प्रत्येक साखर कारखान्यात किती साखर साठा शिल्लक आहे याची संपुर्ण आकडेवारी केंद्र सरकारकडे कारखानानिहाय उपलब्ध आहे. केंद्र सरकारच्या आदेशाने तातडीने सर्व कारखान्यांवर छापे टाकून पुरवठा विभागाने शिल्लक साखर साठा तपासला पाहिजे, अशी मागणीही शेट्टी यांनी केली आहे.

ते म्हणाले, सध्या कारखान्यात जी शिल्लक साखर आहे, त्या व्यतिरिक्त असणारी साखर कारखान्यांकडून कमी दराने खरेदी केलेली व काटामारी तसेच रिकव्हरी चोरीची आहे, हे सत्य आहे. भाजप सरकारमधील सक्रीय राहिलेले देशातील काही मूठभर साखर कारखानदार आणि साखरेचे व्यापारी यांच्या भल्यासाठी ही सर्व मंडळी देशात कृत्रिम साखरेचा तुटवडा करून साखरेचे दर वाढवू लागले आहेत.

केंद्र सरकारच्या अहवालानुसार कारखान्यांकडे शिल्लक साखर साठ्याचा व बाजारातील दराचा विचार केल्यास अशाच पध्दतीने पुढील तीन महिने हा दर राहिल्यास देशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सरासरी १००० ते १२०० रूपये दुसरा हप्ता देणे सहज शक्य आहे. मात्र कृत्रिम तुटवडा करून स्वतःच्या फायद्यासाठी तेजीत साखर विक्री करून आणि यामुळेच भविष्यात दर नियंत्रणात ठेवण्याच्या नावाखाली साखर आयात करून पुढील हंगामातील सुरवातीस साखरेचा दर पुन्हा ३२ ते ३५ रुपयांपर्यंत कमी होण्याचा धोका दिसू लागला आहे, असेही राजू शेट्टी यांनी नमूद केले.

ते म्हणाले, तीन महिन्यांपूर्वी साखरेचा दर प्रतिक्विंटल ३८०० रुपये होता आणि आज थेट ७००० रुपये झाला. मागील आठ दिवसांपूर्वी ४५०० रुपयेचा दर ७००० रुपये झाला आहे. या दरवाढीसाठी केंद्र सरकारमधील कोणत्या बड्या नेत्याचा राजकीय आशीर्वाद आहे, हे बघणे महत्वाचे ठरेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT