Shivendraraje Bhosale-Dr. Sanjay Kade Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Shivendraraje Bhosale : शिवेंद्रसिंहराजेंनी मैत्रीधर्म पाळला; ZP निवडणुकीत वर्गमित्राला दिलेल्या शब्दानुसार 15 कोटींचा निधी मंजूर

Waluj bridge Sanction 15 crore Fund : सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी वर्गमित्र डॉ. संदेश कादे यांच्या मागणीनंतर मोहोळ तालुक्यातील पुलासाठी १५ कोटी रुपयांचा निधी तातडीने मंजूर करण्याचे आश्वासन दिले.

सरकारनामा ब्यूरो

Solapur, 06 November : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी वर्गमित्राच्या मागणीनंतर तब्बल १५ कोटी रुपयांचा निधी तातडीने मंजूर केला आहे. माझ्या मित्राने पहिल्यांदाच मला मागितलं आहे, त्यामुळे मी १५ कोटी रुपयांचा त्वरित मंजूर करतो आणि पुलाच्या भूमिपूजन तसेच उद्‌घाटनाला मी येतो, असे आश्वासन मंत्री शिवेंद्रराजेंनी आपले वर्गमित्र आणि मोहोळ तालुक्यातील वाळूचे सुपुत्र डॉ. संदेश कादे यांना दिले.

माढा, मोहोळ, उत्तर सोलापूर आणि बार्शी या चार तालुक्यांना जोडणाऱ्या वाळूज (ता. मोहोळ) येथील भोगावती नदीवर पूल उभारण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी १५ कोटींचा निधी मंजूर केला आहे. त्याचे पत्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपसचिव शैलेश बोरसे यांनी सोलापूरच्या अधीक्षक अभियंत्यांना पाठविले आहे. या चार तालुक्यांतील सीमावर्ती गावांना सोलापूरला जाण्यासाठी आणखी एक जवळचा मार्ग उपलब्ध होणार आहे. या पुलामुळे जवळपास ३० ते ३५ किलोमीटरचे अंतर कमी होण्यास मदत होणार आहे.

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि डॉ संदेश कादे हे बालमित्र आहेत. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारसभेत डॉ. कादे यांनी पुलाची मागणी बांधकामंत्री भोसले यांच्याकडे केली आहे. डॉ. कादे बालमित्र असून त्यांनी पहिल्यांदाच काम सांगितले आहे, त्यामुळे वाळूजचा पूल मी मंजूर करतो आणि भूमिपूजन आणि उद्‍घाटनालाही मी आवर्जून येईन, असे मंत्री भोसले यांनी त्या वेळी सांगितले होते.

शिवेंद्रसिंहराजेंनी यांनी वाळूजच्या पुलासाठी १५ कोटींचा निधी मंजूर केला आहे. जवळपास तीन दशकांहून अधिक काळापासून असलेली पुलाची मागणी सोडविण्यासाठी मंत्री भोसले व डॉ. कादे यांची मैत्री उपयोगी पडली आहे.

अमृतकाल विकास आराखड्यातून हा निधी दिला असून, कामाला सात दिवसांत (२ नोव्हेंबर २०२६ रोजी दिलेल्या पत्रापासून सात दिवस) प्रशासकीय मान्यता घेण्याचीही सूचना उपसचिव बोरसे यांनी केली आहे. बार्शी-माढा तालुक्यातून जाणाऱ्या शक्तिपीठ महामार्गाशी सोलापूर, वडाळा व या परिसराला जोडण्यासाठी हा महत्वाचा मार्ग येत्या काळात होणार आहे.

परिसराच्या विकासाला नवी चालना

यासंदर्भात डॉ. संदेश कादे म्हणाले, भोगावती नदीवर पूल व्हावा, ही अनेक वर्षांची मागणी माजी आमदार राजन पाटील, यशवंत माने, बाळराजे पाटील, अजिंक्यराणा पाटील यांच्या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्यापर्यंत पोचली. पालकमंत्री जयकुमार गोरे व मुख्यमंत्री फडणवीस यांनी हा प्रश्‍न सोडविण्यासाठी सकारात्मक भूमिका घेतली. त्यामुळे या परिसराच्या विकासाला आता नवी चालना मिळणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT