Kolhapur News : गोकुळ दूध संघाच्या निमित्ताने कोल्हापूर जिल्ह्यात उडालेला राजकीय धुरळा खाली बसत नाही, तोच आता गडहिंग्लज तालुक्यावरून जिल्ह्यातील तीन बड्या नेत्यांमध्ये राजकीय चढाओढ सुरू झाली आहे. आगामी विधानसभा निवडणूक आणि संभाव्य मतदारसंघ पुनर्रचनेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नेते आतापासूनच अलर्ट मोडवर आले आहेत. गडहिंग्लज तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याच्या मागणीवरून वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, भाजपचे आमदार शिवाजी पाटील आणि काँग्रेसचे आमदार सतेज पाटील मैदानात उतरले आहेत. या तिन्ही नेत्यांचे शक्तिप्रदर्शन आणि श्रेयवाद पाहता, संभाव्य गडहिंग्लज विधानसभा मतदारसंघासाठी आतापासूनच राजकीय पेरणी सुरू झाली आहे का, अशी चर्चा रंगली आहे.
गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेला गोकुळ दूध संघातील वाद अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर तात्पुरता थंडावला आहे. मात्र, गडहिंग्लज तालुका दुष्काळग्रस्त जाहीर झाल्यानंतर महायुतीतील मंत्री आणि आमदारांमध्ये श्रेयवादाची कुस्ती रंगली आहे. दुसरीकडे, गोकुळच्या अध्यक्षपदाची निवडणूक झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी काँग्रेसचे नेते आणि आमदार सतेज पाटील यांनी गडहिंग्लज तहसील कार्यालयावर मोर्चा काढत आपली ताकद दाखवून दिली.
सध्या गडहिंग्लज शहर आणि तालुका कागल व चंदगड या दोन विधानसभा मतदारसंघांमध्ये विभागला गेला आहे. गडहिंग्लजचा काही भाग कागल विधानसभा मतदारसंघात, तर उर्वरित भाग चंदगड विधानसभा मतदारसंघात येतो. राज्यात सध्या विधानसभा मतदारसंघांच्या संभाव्य पुनर्रचनेची चर्चा सुरू आहे. त्यातून गडहिंग्लज हा स्वतंत्र विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही मतदारसंघांच्या आरक्षणातही बदल होण्याची चर्चा आहे.
गडहिंग्लज शहर हा एकेकाळी जनता दलाचा बालेकिल्ला मानला जात होता. मात्र, नगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने जनता दलाच्या वर्चस्वाला धक्का दिला. आता संभाव्य मतदारसंघ पुनर्रचनेच्या पार्श्वभूमीवर गडहिंग्लजमधील राजकीय ताकद वाढवण्यासाठी जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांनी हालचाली सुरू केल्याचे चित्र आहे.
गडहिंग्लज तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा, या मागणीसाठी गडहिंग्लजकरांनी जवळपास सात दिवस उपोषण केले. चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या मागणीसाठी पाठपुरावा केला. मंत्री हसन मुश्रीफ यांनीही गडहिंग्लज तालुक्याला दिलासा मिळावा, यासाठी प्रयत्न केले.
दुसरीकडे, काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनीही गडहिंग्लजच्या राजकारणात एन्ट्री केली. हजारोंच्या उपस्थितीत तहसील कार्यालयावर मोर्चा काढत त्यांनी गडहिंग्लजकरांच्या पाठीशी असल्याचे दाखवून दिले. या निमित्ताने सतेज पाटील यांना गडहिंग्लजमध्ये काँग्रेसची ताकद दाखवण्याची संधी मिळाली. त्यामुळे मुश्रीफ आणि शिवाजी पाटील यांच्यातील राजकीय संघर्षात आता सतेज पाटील यांचीही भूमिका महत्त्वाची ठरत आहे.
गडहिंग्लज तालुका दुष्काळग्रस्त जाहीर झाल्यानंतर महायुतीमध्येच श्रेयवादाची लढाई सुरू झाली. आपल्या मागणीची दखल घेत सरकारने गडहिंग्लजकरांना न्याय दिल्याची भावना आमदार शिवाजी पाटील यांनी व्यक्त केली. तर आपल्या पाठपुराव्यामुळे गडहिंग्लज तालुक्याला न्याय मिळाल्याचा दावा मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. या श्रेयवादातून शिवाजी पाटील यांनी पुन्हा एकदा 'मुश्रीफमुक्त गडहिंग्लज'चा मुद्दा उपस्थित करत मुश्रीफ यांच्यावर निशाणा साधला. महायुतीत एकत्र असलेल्या या दोन्ही नेत्यांमधील स्थानिक राजकीय संघर्ष यानिमित्ताने पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.
गडहिंग्लज तालुक्याला दुष्काळग्रस्त जाहीर करण्याच्या मागणीच्या निमित्ताने तिन्ही नेत्यांना स्थानिक जनतेशी संपर्क वाढवण्याची संधी मिळाली आहे. मुश्रीफ आणि शिवाजी पाटील यांच्यात गडहिंग्लजवरील राजकीय वर्चस्वाची चढाओढ सुरू असतानाच सतेज पाटील यांनीही मोर्चाच्या माध्यमातून आपली ताकद दाखवली आहे.
स्वतंत्र गडहिंग्लज विधानसभा मतदारसंघाच्या निर्मितीबाबत अद्याप कोणताही अधिकृत निर्णय झालेला नाही. मात्र, भविष्यात मतदारसंघाची पुनर्रचना झाली, तर गडहिंग्लजमधील राजकीय ताकद महत्त्वाची ठरू शकते. त्यामुळे सध्या सुरू असलेले शक्तिप्रदर्शन केवळ दुष्काळाच्या प्रश्नापुरते मर्यादित आहे की, त्यामागे आगामी विधानसभा निवडणुकीची राजकीय मशागतही आहे, अशी चर्चा कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.