Kolhapur Ganeshotsav 2023 News  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ganeshotsav 2023 News : 'बाप्पा'वरून राजकारण, कोल्हापुरात ठाकरे-शिंदे गटाने दंड थोपटले; नेत्यांना गणपती बाप्पा बुद्धी देवो !...

Mangesh Mahale

Kolhapur : गणेशोत्सवात कोल्हापुरात ठाकरे गट-शिंदे गटात वाद निर्माण झाला आहे. दोन्ही गट एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. गणेश मंडपावरून दोन्ही गटांत जुंपली आहे. छत्रपती शिवाजी चौक संयुक्त मित्र मंडळातील गणेशोत्सवात राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर व माजी नगरसेवक रविकिरण इंगवले यांनी एकमेकांविरोधात दंड थोपटले आहेत. गणेशोत्सवात राजकारण आणणाऱ्या नेत्यांना गणपती बाप्पा बुद्धी देवो, अशी प्रार्थना गणेशभक्त करीत आहेत.

गणेश चतुर्थीच्या मुख्य दिवशी या सार्वजनिक मंडळाला गणेश मंडप उतरण्याची वेळ आली. संयुक्त शिवाजी चौक मित्र मंडळाच्या गणेशमूर्ती प्रतिष्ठानाबाबत धर्मादाय आयुक्तांनी स्वप्निल शिंदे-गवळी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.

यात कार्यकारिणीस मूर्ती प्रतिष्ठापनाबाबत मान्यता दिली, असे असताना कपिल केसरकर यांनी रात्रीच्या वेळी तिथे गणेशमूर्ती बसवली. त्यामुळे अध्यक्ष स्वप्निल शिंदे यांच्या सोबत आज (गुरुवारी) आम्हीही वाजत गाजत मूर्ती प्रतिष्ठापना करणार असल्याची माहिती माजी नगरसेवक रविकिरण इंगवले यांनी दिली आहे.

"राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर आणि पालकमंत्री दीपक केसरकर यांचे कोल्हापुरात दबावाचे राजकारण सुरू आहे. छत्रपती शिवाजी चौक संयुक्त मित्र मंडळात भांडणे लावून राजेश क्षीरसागर यांनी दोन गट पाडले. गणेशमूर्ती प्रतिष्ठापनेवरून वाद निर्माण झाल्यानंतर पोलिस प्रशासनाने हस्तक्षेप करत दोन्ही गटांना परवानगी दिली नाही," असे रविकिरण इंगवले म्हणाले.

रिक्षा मित्र मंडळाला मूर्ती बसवण्याबाबत दोन्ही गटांत एकमत झाले होते. मात्र, मंगळवारी रात्री गुपचूप कपिल केसरकर आणि इतरांनी गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली. पोलिस परवानगी नसताना दादागिरी कोण करत असेल, तर खपवून घेणार नाही, असा इशारा रविकिरण इंगवले यांनी दिला. त्यानंतर ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनीदेखील क्षीरसागर यांना खडे बोल सुनावले आहेत.

"म्हातारी मेल्याचे दुःख नाही, पण काळ सोकावत आहे," कोल्हापुरात मोगलाई सुरू झाली का, असा सवाल करीत अशी दादागिरी खपवून घेतली जाणार नाही," असा इशाराही पवार यांनी दिला. क्षीरसागर याला काय प्रत्युत्तर देणार हे लवकरच समजेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT