Sachin Kalyanshetti-Siddharam Mhetre Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Akkalkot Politic's : वडिलांच्या स्मारकाच्या जागेवर गणेश मंदिर उभारलं : शिंदेसेनेचा नेता आक्रमक, शिंदे-फडणवीसांकडे भाजप आमदार कल्याणशेट्टींची तक्रार करणार

Sachin Kalyanshetti VS Siddharam Mhetre : दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीतील स्मारकासाठी राखीव जागेवर गणपती मंदिर उभारल्याच्या आरोपावरून सिद्धाराम म्हेत्रे यांनी आमदार सचिन कल्याणशेट्टींवर निशाणा साधत तक्रारीचा इशारा दिला.

सरकारनामा ब्यूरो

Solapur, 07 July (प्रभूलिंग वारशेट्टी ) : जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद निवडणुकीनंतर अक्कलकोटचे राजकारण पुन्हा तापले आहे. कारण तालुक्यातील दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील (कै.) सातलिंगप्पा म्हेत्रे स्मारकासाठी राखीव असलेल्या जागेवर गणपती मंदिर उभारल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात माजी मंत्री तथा शिवसेना नेते सिद्धाराम म्हेत्रे आक्रमक झाले आहेत. त्यांनी भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यावर हल्लाबोल करत त्यांची तक्रार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, स्मारकाच्या जागेवर मंदिर उभारल्याप्रकरणी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यासह दुधनी बाजार समितीचे पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांवर तातडीने गुन्हे दाखल करावेत, अशी आक्रमक मागणी माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी केली आहे. गुन्हा दाखल न केल्यास आंदोलनाचा इशाराही म्हेत्रेंनी दिला आहे.

या संपूर्ण प्रकरणाची कैफियत मांडण्यासाठी लवकरच एक शिष्टमंडळ घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

मंदिराला आमचा विरोध नाही;पण... : म्हेत्रे

दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीवर मागील काळात म्हेत्रे गटाची सत्ता असताना (कै.) सातलिंगप्पा म्हेत्रे यांच्या स्मारकासाठी २०२० मध्ये अधिकृत ठराव करून तेथे चबुतरा उभारण्यात आला होता. मात्र, नुकत्याच झालेल्या बाजार समितीत सत्तांतर झाल्यानंतर नवीन संचालक मंडळाने जुना ठराव बदलला. त्या ठिकाणी गणपती मंदिर उभारण्याचा निर्णय घेतला. गणपती मंदिराला आमचा विरोध नाही, परंतु स्मारकाची जागा बळकावून मंदिर उभारणे चुकीचे आहे, असे म्हेत्रे यांनी स्पष्ट केले.

प्रशासकीय आदेश धाब्यावर बसविले

या विषयावर तक्रार प्राप्त झाल्यानंतर बाजार समितीच्या उपनिबंधकांनी चौकशी पूर्ण होईपर्यंत कोणतीही नवीन बांधकामे किंवा मूर्तीची प्रतिष्ठापना न करण्याचे निर्देश दिले होते. तरीही, हे सर्व आदेश धाब्यावर बसवून अत्यंत घाईने आणि कडेकोट पोलिस बंदोबस्तात मूर्तीची स्थापना करण्यात आली. या घटनेमुळे म्हेत्रे यांनी थेट पोलिस प्रशासनावरही संगनमताचा आरोप केला आहे.

राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्यघटनेपेक्षा कोणीही मोठा नाही. कायदा सर्वांसाठी समान असावा. जर या प्रकरणातील दोषींवर कारवाई झाली नाही, तर आम्ही राज्यव्यापी आंदोलन करू, असा इशाराही म्हेत्रे यांनी दिला.

या वेळी महेश साठे, अमर पाटील, आनंद तानवडे, प्रथमेश म्हेत्रे, रविना राठोड, सिद्धार्थ गायकवाड, इरण्णा दसाडे, शिवानंद पाटील, विश्वनाथ भरमशेट्टी, गणेश मोरे, विनीत पाटील आणि प्रियंका परांडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT