

Mumbai, 07 July : कबुतरांच्या ड्रॉपमुळे (विष्ठेमुळे) होणाऱ्या आजाराचे भयानक वास्तव भारतीय जनता पक्षाचे घाटकोपरचे आमदार राम कदम यांनी आज (ता. 07 जुलै) विधानसभेत मांडलं. कबुतरांच्या ड्रॉपमुळे आपल्या आईला झालेला आजार आणि त्यामुळे त्यांच्या आईला झालेल्या वेदना सांगताना राम कदम भावनाविवश झाले होते. कबुतरांच्या ड्रॉपमुळे होणारे आजार टाळण्यासाठी तज्ज्ञांची समिती नेमण्याची मागणी केली आणि विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी सरकारला त्याबाबतचे निर्देश दिले.
आमदार राम कदम म्हणाले, एका गंभीर प्रश्नावर मी बोलायला उभा आहे. माझ्या आयुष्यातील अत्यंत दुःखद घटना १२ जून रोजी घडली. ज्या मायमाऊलीने मला जन्म दिला, ती माझी आई धोंडूबाई शिवाजी कदम यांना १२ जून रोजी देवाज्ञा झाली. माझ्या आईने आयुष्यभर नामस्मरण आणि वामनरा पै यांच्या विश्वप्रार्थनेचा जप केला. असं असतानाही तिला तिच्या आयुष्यातील दोन वर्षे मरणासन्न यातना भोगाव्या लागल्या.
जे राम कदमच्या आईंच्या बाबत घडलं, असं महाराष्ट्रातील, मुंबईतील कोणाच्याही आईच्या बाबत घडू नये, म्हणून मी या ठिकाणी काही मुद्दे मांडायला उभा आहे. माझ्या आईला फुफ्फुसाचा आजार झाला होता. ज्याला आपण मेडिकल शास्त्रामध्ये आयएलडी म्हणतो. या आजाराला जगात औषध नाही. या आजाराच्या रुग्णाला आपण २४ तास ऑक्सिजनवर ठेवतो. लंग्समधील फायब्रोसीस वाढू नये; म्हणून जे काही जुजबी औषधे आली आहेत, तेवढाच यावर उपचार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आमदार कदम म्हणाले, हा फुफ्फुसाचा आजार जसजसा वाढत जातो, तसतशा त्याच्या वेदना आपण सहन करू शकत नाहीत, इतक्या त्या वाढत जातात. माझी आई १५-१५ मिनिटे खोकायची. सलग १५-१५ मिनिटे खोकताना ती बेशुद्ध व्हायची. ही स्थिती आयएलडीच्या सर्व रुग्णांची आहे. संपूर्ण भारतात असे ९ लाख रुग्ण आढळतात.
मी या आजाराबाबत जरा माहिती घेतली. तेव्हा माझ्या लक्षात आलं की, माझ्या घाटकोपरमध्ये माझी ओळख जीवदयाप्रेमी म्हणून आहे. मी जन्माने जैन नाही;पण दोन वेळा आठ दिवसांचा पाण्यावरचा उपवास मी केलेला आहे. कबुतरांच्या ड्रॉपमुळे वातावरणात पसरणाऱ्या विषाणूंमुळे फुफ्फुसाचा आजार बळावतो. याबाबत मी सखोल माहिती घेतली, असेही त्यांनी नमूद केले.
ते म्हणाले, कबुतरांच्या ड्रॉपमुळे पाच प्रकारचे आजार होतात. हिस्टो प्लॉस्मोसिस, ट्रायपोको कॉसिसीस, स्टोकोसीस, सॅलमोनेलिसस आणि ॲलर्जिक एलेटिस हे आजार आहेत. या कोणत्याही आजारांवर उपचार नाहीत. आपण १९६० मध्ये ॲनिमल ॲक्ट केला आहे. कबुतरांना दाणे टाकू नये, या मताचा मी नाही. मी अमेरिका, इंग्लंड, जर्मनी, शिकागो, स्विर्त्झलंड, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया येथील कबुतरांच्या कायद्यांचा मी अभ्यास केला.
त्यांनी सांगितले की, परदेशात ज्या प्रमाणे रिलोकेशन, जन्म नियंत्रण किंवा टॅपिंग असे तीन प्रकार करतात. माणसाला आयएलडीचा त्रास होऊ नये म्हणून आपल्याकडे नॅशनल पार्कमध्ये ५० हजार एकर जागा आहे, त्याठिकाणी आपण कबुतरांना का रिलोकेशन करत नाही. मुंबईतील लोक तडफडून मरणार असतील, तर आपण का कबुतरांचे रिलोकेशन करत नाही. कबुतरांच्या बाबत सकारात्मक भूमिका घेण्यासाठी सरकारने एक समिती नेमण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी केली. विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी तसे निर्देश राज्य सरकारला दिले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.