Gopichand Padalkar–Jayant Patil political rivalry  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Gopichand Padlakar: "जिल्हा बँकेत संधी द्या, सगळा भ्रष्टाचार बाहेर काढतो"; गोपीचंद पडळकरांचं जयंत पाटलांना आव्हान

Gopichand Padlakar : सांगली जिल्हा बँकेमध्ये मला संधी मिळाली पाहिजे, इथला सगळा भ्रष्टाचार उघड करणार आहे, असा इशारा भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांना दिला.

सरकारनामा ब्युरो

Gopichand Padlakar: सांगली जिल्हा बँकेमध्ये मला संधी मिळाली पाहिजे, इथला सगळा भ्रष्टाचार उघड करणार आहे, असा इशारा भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांना दिला. जिल्हा बँकेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी बोलताना पडळकर यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीपासून दुष्काळाच्या प्रश्नापर्यंत विविध मुद्द्यांवर भूमिका मांडली.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जयंत पाटील यांचे राजकीय गणित काय आहे, हे आता स्पष्ट होत असल्याचा दावा पडळकर यांनी केला. सांगली जिल्हा बँकेत जयंत पाटील यांना ११ जागा मिळवायच्या आहेत. मित्रपक्ष असो किंवा विरोधक, त्यांच्यातून उमेदवारी मिळवून आपले राजकीय गणित मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टीकाही त्यांनी केली.

जिल्हा बँक कार्यकर्त्यांना पोसण्यासाठी आहे का?

जिल्हा बँकेच्या कारभारावरही पडळकर यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले. “कार्यकर्त्यांना पोसण्यासाठी जिल्हा बँक आहे का?” असा सवाल त्यांनी केला. जिल्हा बँकेत आपल्याला संधी मिळाली पाहिजे, अशी मागणी करत बँकेतील भ्रष्टाचार बाहेर काढण्याचा इशाराच त्यांनी दिला. तसेच यापुढे भ्रष्टाचार होऊ देणार नाही, असेही पडळकर यांनी स्पष्ट केले.

निवडणूक होणारच

जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याच्या हालचालींबाबतही पडळकर यांनी स्पष्ट भूमिका मांडली. बिनविरोध निवडणूक करणे आता आपल्या हातात राहिलेले नाही आणि जिल्हा बँकेची निवडणूक होणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा बँकेसाठी महायुतीचा पॅनल पूर्ण ताकदीने मैदानात उतरेल, असा दावाही त्यांनी केला. वरिष्ठ पातळीवर याबाबत जो निर्णय होईल, त्याची माहिती आपल्याला नाही; त्यावर वरिष्ठ नेते बोलतील, असेही पडळकर यांनी स्पष्ट केले.

दुष्काळावर फडणवीस सरकारचा बचाव

दरम्यान, दुष्काळाच्या मुद्द्यावर बोलताना पडळकर यांनी सरकारची बाजू मांडली. मागणी करण्याआधीच दुष्काळ जाहीर करण्यात आला असून, आजपर्यंत कोणतेही मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर गेले नाहीत. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बांधावर गेले आणि शेतकऱ्यांची भेट घेतली, असे त्यांनी सांगितले. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकार खंबीरपणे उभे असून दुष्काळातील सवलती आणि सुविधा दिल्या जात असल्याचा दावाही पडळकर यांनी केला.

जयंत पाटलांच्या बालेकिल्ल्यात राजकीय संदेश

जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने सांगलीतील राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत. एका बाजूला जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजकीय गणिताची चर्चा सुरू असताना दुसरीकडे पडळकर यांनी बँकेच्या कारभारावर थेट प्रश्न उपस्थित करत स्वतःला मैदानात उतरवलं आहे. तसंच ‘मला संधी मिळाली पाहिजे’, ‘सगळा भ्रष्टाचार बाहेर काढणार’ आणि ‘महायुतीचा पॅनल पूर्ण ताकदीने उतरणार’ अशी आक्रमक भूमिकाच त्यांनी घेतली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT