

Baramati Someshwar Sugar Factory Election News : सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत गावकी-भावकी, गट-तटाचे राजकारण बाजूला ठेवून एकजुटीने सामोरे जाऊया, असे आवाहन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी रविवारी केले होते. पण अवघ्या 24 तासांत हे आवाहन धुडकावून लावत सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने पॅनेल देणार असल्याची माहिती विद्या प्रतिष्ठानचे खजिनदार युगेंद्र पवार यांनी दिली.
युगेंद्र पवार यांच्या घोषणेमुळे आणि सोमेश्वर कारखान्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा पवार विरुध्द पवार अशी लढत बारामतीत पुन्हा पाहायला मिळेल, अशी चिन्हे आहेत. बारामतीत पत्रकार परिषद घेऊन त्यांनी सोमेश्वरची निवडणूक लढविणार असल्याचे सोमवारी (ता. 7) जाहीर केले. पक्षाचे अनेक पदाधिकारी या प्रसंगी उपस्थित होते.
युगेंद्र पवार म्हणाले, सोमेश्वर कारखान्याच्या निवडणूकीसंदर्भात नुकत्याच झालेल्या मेळाव्यात सभासद व कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या, बारामती, पुरंदर व खंडाळा तालुक्यातील गावात जाऊन सभासदांशी आम्ही चर्चा केली. त्यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशीही माझी चर्चा झाली. सभासदांची भावना अशी आहे की पवारसाहेबांचे आता कारखान्यावर लक्ष असायला हवे. अजितदादा होते तेव्हाची गोष्ट वेगळी होती, पण आता साहेबांचे लक्ष हवे असे सर्वांना वाटत आहे. दादा होते तेव्हाही ते साहेबांचे मार्गदर्शन घेत होते.
पॅनेल करताना आम्ही सर्वसमावेशक करण्याचा प्रयत्न करणार असून अनुभवी, नवीन व योग्य उमेदवारांना संधी देऊ असे त्यांनी नमूद केले. पवारसाहेबांशी चर्चा करुनच हा मोठा निर्णय घेतल्याचेही ते म्हणाले. तेच तेच चेहरे सोमेश्वरमध्ये असल्याने नवीन चेह-यांना संधी द्यावी अशी सभासदांचीच भावना असल्याने त्याचा आदर करुन पॅनेल करणार असल्याचे ते म्हणाले. कारखाना, सभासदांचे हित डोळ्यासमोर ठेवून आम्ही पॅनेल उभे करण्याचा निर्णय घेतला आहे, नवीन चेह-यांना संधी मिळावी आणि कारखाना अधिक सक्षम करण्याचा या मागचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
येत्या दोन तीन दिवसात मुलाखती घेऊन योग्य ते उमेदवार आम्ही देऊ. बिनविरोधबाबत समोरुन काही प्रस्ताव अजूनही आलेला नाही, त्यांच्याकडून जर प्रस्ताव आला तर तो पवारसाहेबांसमोर आम्ही तो मांडू, साहेब जो निर्णय देतील तो आम्हाला मान्य असेल, असे त्यांनी सांगितले.
बारामती विधानसभा मतदारसंघात अजित पवार विरुध्द युगेंद्र पवार यांच्यामध्ये लढत झाली होती. माळेगावच्या निवडणूकीतही संघर्ष झाला होता, आता सोमेश्वरच्या निमित्ताने सुनेत्रा पवार यांच्या विरोधात युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलच्या माध्यमातून लढत होईल, अशी चिन्हे आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.