Gokul Chairman Election; Satej Patil And Hasan Mushrif Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Gokul Chairman Election : 'नविदच्या चेअरमनपदाचे पाकीट मीच दिले, त्यावेळी जातीय वादी नव्हता का?'; मुश्रीफांवर सतेज पाटील भडकले

Satej Patil Hits Back Hasan Mushrif : कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदावरून वाद निर्माण झाला आहे. सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीने बहुमताचा दावा करत शशिकांत चुयेकर यांच्या निवडीची घोषणा केली आहे.

Rahul Gadkar

Kolhapur News : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडीत आज (ता. २९) नाट्यमय घडामोडी घडल्या. महायुतीच्या १२ संचालकांनी कोरम सभेकडे पाठ फिरवली. मात्र, समविचारी आघाडीच्या संचालकांनी समांतर सभा घेत शशिकांत पाटील-चुयेकर यांची अध्यक्षपदी निवड केल्याचे जाहीर केले. अध्यक्षपदाच्या निवडीसाठी १४ संचालकांचा कोरम आवश्यक असल्याचे सांगत निवडणूक अधिकाऱ्यांनी अधिकृत सभा तहकूब केली होती.

त्यामुळे समांतर सभेत झालेल्या निवडीची अधिकृत आणि कायदेशीर स्थिती स्पष्ट झाल्यानंतरच गोकुळचा अध्यक्ष कोण, याचे चित्र स्पष्ट होणार आहे. दरम्यान, काँग्रेस नेते आणि आमदार सतेज पाटील यांनी या घडामोडींवरून महायुतीवर जोरदार टीका केली. त्यांनी आजचा दिवस सहकार क्षेत्रासाठी ‘काळा दिवस’ असल्याचे म्हटले. तसेच मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलेला जातीय राजकारणाचा आरोपही त्यांनी फेटाळून लावला.

कोरमअभावी अधिकृत सभा तहकूब

गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी आज (ता. २९) कोरम सभा आयोजित करण्यात आली होती. २५ संचालकांपैकी समविचारी आघाडीचे १३ संचालक सभेला उपस्थित होते. मात्र, महायुतीच्या १२ संचालकांनी सभेला उपस्थिती लावली नाही. त्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी कोरमअभावी सभा तहकूब केली.

यानंतर काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडीने समांतर सभा घेत शशिकांत पाटील-चुयेकर यांची अध्यक्षपदी निवड केल्याचे जाहीर केले. ही निवड कायदेशीर असल्याचा दावाही आघाडीच्या नवनिर्वाचित संचालकांनी केला. या घडामोडींनंतर गोकुळच्या राजकीय पटावर पुढे काय होणार, याबाबत जिल्ह्यात चर्चा सुरू झाली आहे. त्याचदरम्यान सतेज पाटील यांनी पत्रकार परिषद घेत महायुतीवर हल्लाबोल केला. मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलेल्या आरोपांचेही त्यांनी खंडन केले.

‘सहकारातील आजचा काळा दिवस’

“सहकारातील आजचा काळा दिवस आहे. कोरम सभेला महायुतीच्या संचालकांनी उपस्थित राहायला हवे होते. तशी अपेक्षाही आम्हाला होती. मात्र, राज्यात कुठेही घडले नाही, असे येथे घडले. हे दुर्दैवी आहे,” अशी टीका सतेज पाटील यांनी केली. कोरम सभेच्या वेळीच समविचारी आघाडीच्या संचालकांनी निवडणूक अधिकाऱ्यांना कोरम लागू होत नसल्याबाबत माहिती दिली होती.

यासाठी सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाचे दाखलेही सादर केले होते. तरीही कोरमअभावी अध्यक्ष निवडीची प्रक्रिया थांबवण्यात आली, असे पाटील यांनी सांगितले. त्यानंतर बहुमत आमच्याकडे असल्याने संचालकांनी त्याच सभागृहात बैठक घेतली. या बैठकीत बाबासाहेब चौगुले यांची सभेच्या अध्यक्षस्थानी निवड करून शशिकांत पाटील-चुयेकर यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड केल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.

‘प्रशासक आणून गोकुळ बुडवायचे आहे का?’

“आता सरकारला आमची विनंती आहे. आणखी किती दिवस थांबायचे? प्रशासकाच्या कार्यकाळात २४ कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. पुन्हा एकदा प्रशासक आणून हा संघ बुडवायचा आहे का?” असा सवाल सतेज पाटील यांनी उपस्थित केला. पुढील सभेची तारीख कधी जाहीर होईल, याची माहिती नसल्याचे सांगत त्यांनी तातडीने पत्र देणार असल्याचेही स्पष्ट केले. “आमचे बहुमत आहे आणि आमचा अध्यक्ष निवडला गेला आहे. आता कारभार त्यांच्या हातात द्यावा,” अशी मागणी त्यांनी केली.

यापूर्वी महायुतीच्या नेत्यांशी आणि संचालकांशी चर्चा करून कोरम सभेला उपस्थित राहण्याची विनंती केली होती. मात्र, साडेपाच लाख शेतकऱ्यांनी विजयाचा कौल दिल्यानंतरही महायुतीने ही विनंती नाकारली, असे पाटील म्हणाले. अध्यक्ष निवडीसंदर्भातील सर्व बाबी लेखी स्वरूपात अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. हा मुद्दा निवडणुकीशी संबंधित असून, बहुमताच्या आधारे अध्यक्ष निवडला जावा, एवढीच आमची मागणी होती. मात्र, आता चुकीचा पायंडा पडत असल्याचे दिसत आहे, असेही त्यांनी नमूद केले.

मुश्रीफांच्या जातीय राजकारणाच्या आरोपाला प्रत्युत्तर

यावेळी सतेज पाटील यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावरही निशाणा साधला. “मुश्रीफ आज सभेला आले असते, तर शशिकांत पाटील-चुयेकर यांना आजच अध्यक्ष करता आले असते,” असा टोला त्यांनी लगावला. मुश्रीफ यांनी सतेज पाटील यांच्यावर जातीय राजकारणाचा आरोप केला होता. आपल्या मुलाला, नविद मुश्रीफ यांना पाडण्यासाठी पाटील यांनी जातीय राजकारण केल्याचे मुश्रीफ म्हणाले होते.

या आरोपाला प्रत्युत्तर देताना पाटील यांनी नविद मुश्रीफ यांच्या निवडीसाठी आपणच ‘पाकीट’ दिल्याचा दावा केला. “नविद मुश्रीफ यांच्या निवडीचे पाकीट मी दिले होते. मग त्यावेळी मी जातीयवादी नव्हतो का? त्यावेळी ते पाकीट अबाजींकडे होते, हे सर्वांना माहिती आहे. नविद यांना चेअरमन करावे म्हणून पाकीट मीच दिले होते. त्यामुळे आता असे आरोप करणे त्यांनी टाळायला हवे,” असे पाटील म्हणाले.

हा छत्रपती शाहू महाराजांचा पुरोगामी जिल्हा आहे. येथे अशा प्रकारचा जातीयवाद केला जात नाही, असे सांगत त्यांनी मुश्रीफ यांच्यावर पलटवार केला. “मुश्रीफ यांनी ज्यांनी त्यांची कोंडी केली, त्यांच्याबाबत बोलायला हवे. मात्र, ते वेगळ्याच मुद्द्यांवर बोलत आहेत,” अशी टीकाही पाटील यांनी केली. दरम्यान, समांतर सभेत झालेल्या अध्यक्ष निवडीला अधिकृत मान्यता मिळते का, याकडे आता गोकुळच्या सभासदांचे आणि जिल्ह्यातील सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT